मुंबई:-जोगेश्वरीतील रामवाडी गणेशोत्सवात साकारला पांडवकालीन गुंफेचा हुबेहूब देखावा.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मुंबई:-जोगेश्वरीतील रामवाडी गणेशोत्सवात साकारला पांडवकालीन गुंफेचा हुबेहूब देखावा.

प्राचीन गणेशमूर्तीची प्रतिकृती ठरतेय भाविकांचे आकर्षण; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी.
मुंबई – जोगेश्वरी पूर्व :
जोगेश्वरी पूर्व येथील रामवाडी परिसरात गुंफा टेकडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त जोगेश्वरीतील प्राचीन पांडवकालीन गुंफेचा देखणा आणि आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्यात जोगेश्वरीच्या ऐतिहासिक वारशाची अनुभूती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, परिसरातील नागरिक आणि गणेशभक्तांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मंडपामध्ये जोगेश्वरीच्या प्राचीन गुंफेतील श्री गणेशाच्या प्राचीन मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गुंफेची रचना, परिसराचे वातावरण तसेच प्राचीन वास्तुशैलीचा बारकाईने विचार करून हा देखावा उभारण्यात आल्याने तो भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात पारंपरिक भक्तीबरोबरच आपल्या परिसरातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम या देखाव्याच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे हा देखावा पाहण्यासाठी तसेच मंडपातील श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांग लागत आहे.
यावेळी मंडपात श्री गणेशाचे दर्शन घेताना ज्येष्ठ पत्रकार श्री. शरद नामदेव बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते श्री. अरविंद छेड्डा तसेच कार्यकर्ते श्री. दीपक विश्वकर्मा उपस्थित होते. त्यांनी मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेल्या ऐतिहासिक देखाव्याची पाहणी करून आयोजकांचे कौतुक केले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धेसोबतच मुंबईच्या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि त्याची पुढील पिढीला ओळख करून देण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे. त्यामुळे रामवाडीतील गुंफा टेकडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हा देखावा गणेशभक्तांसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.




