आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारक्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

फलटण:-दुधात विषाचा खेळ! फलटणमध्ये बनावट दूध बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाचा धडक छापा.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) दुधात विषाचा खेळ! फलटणमध्ये बनावट दूध बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाचा धडक छापा.

सातारा | फलटण दि. १४ : साताऱ्यातील अन्न व औषध प्रशासनाने फलटण तालुक्यातील होळ येथे मोठी धडक कारवाई करत भेसळयुक्त आणि मानवी आरोग्यास घातक ठरणारे बनावट दूध तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली खापणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
होळ–जिंती रस्त्यावरील दिलीप भीमराव भोसले यांच्या गोठ्याजवळील खोलीत ‘Whey Permeate Powder’ आणि ‘Non-Dairy Creamer’ या औद्योगिक वापराच्या पावडरींमध्ये पाणी मिसळून मिक्सरच्या साहाय्याने हुबेहूब दुधासारखा द्रव तयार केला जात होता. त्यानंतर हे बनावट दूध गोठ्यातील गाईच्या दुधात मिसळून बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील सोमनाथ डेअरीकडे पुरवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
कारवाईदरम्यान अन्न व औषध प्रशासनाने २ किलो Whey Permeate Powder, २ किलो Non-Dairy Creamer, बनावट दूध तयार करण्यासाठी वापरला जाणारा ‘वंडरशेफ’ कंपनीचा मिक्सर, भांडी तसेच रिफाइंड पामोलिन तेलाचे रिकामे बॉक्स असा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी मंगल दिलीप भोसले, दिलीप भीमराव भोसले, कुणाल दिलीप भोसले (रा. होळ, फलटण), पावडरीचा पुरवठादार मोरे (रा. नीरा, ता. पुरंदर) आणि वडगाव निंबाळकर येथील सोमनाथ डेअरीचे मालक/संचालक अशा पाच जणांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे करत आहेत.
जनतेच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या या भेसळ रॅकेटवर झालेल्या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

2) जेजुरी:-पालखी सोहळ्यावर काळाचा घाला!
भीषण अपघातात ३ वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रुग्णालयात, मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत.

पुणे
जेजुरी, दि. १४ : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान सासवड–जेजुरी मार्गावरील जेजुरी-बेलसर परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक वारकरी जखमी झाले. या घटनेने संपूर्ण वारी सोहळ्यावर शोककळा पसरली असून वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचारांची माहिती घेत प्रशासनाला कोणतीही हलगर्जी होऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच सर्व जखमींवर शासनाच्या खर्चाने मोफत उपचार केले जातील आणि आवश्यकतेनुसार अतिरिक्त आर्थिक मदतही दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
“जखमींच्या उपचारात कोणतीही कमतरता राहता कामा नये. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी. शासन प्रत्येक अपघातग्रस्त वारकरी आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
या दौऱ्यावेळी जेजुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, भावार्थ देखणे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महामार्गावरील वाहनचालकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आणि वारी मार्गावर वाहने चालविताना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले.
या भीषण दुर्घटनेमुळे जेजुरी परिसरासह संपूर्ण वारी मार्गावर शोककळा पसरली असून जखमी वारकऱ्यांवर युद्धपातळीवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

3) लोणंद:-रॉंग साईडचा थरार! भरधाव आयशरची एसटीला जोरदार धडक; काच फोडून चालकाचा पलायनाचा प्रयत्न.

सातारा | लोणंद दि. १४ : पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसला भरधाव आयशर टेम्पोने रॉंग साईडने ओव्हरटेक करत जोरदार धडक दिल्याची घटना खंडाळा तालुक्यातील शेडगेवाडी येथे घडली. या अपघातात एसटीच्या समोरील काच आणि डाव्या बाजूचा आरसा फुटून मोठे नुकसान झाले. धडक दिल्यानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसटी चालकाने प्रसंगावधान राखत पाठलाग करून त्याला गाठले. या प्रकरणी लोणंद पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर डेपोचे एसटी चालक मंगेश लक्ष्मण मडावी (वय ३७, मूळ रा. यवतमाळ) हे वाहक समाधान गायकवाड यांच्यासह शनिवारी रात्री पंढरपूर–स्वारगेट (पुणे) मार्गावरील बस घेऊन निघाले होते. रात्री सुमारे ११.४५ वाजता शेडगेवाडी गावच्या हद्दीत सिद्धनाथ हॉटेलसमोर समोरून येणाऱ्या एका आयशर टेम्पोने भरधाव वेगात चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी टेम्पोची मागील बाजू एसटीच्या डाव्या बाजूला घासल्याने बसची समोरील काच फुटली आणि आरशाचेही नुकसान झाले.
अपघातानंतर टेम्पो चालकाने पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केले. मात्र, एसटी चालक मडावी यांनी धाडस दाखवत एका कारच्या मदतीने टेम्पोचा पाठलाग करून त्याला थांबवले. चौकशीदरम्यान चालकाने आपले नाव समाधान भास्कर गोसावी (रा. दडशिंदे, ता. बार्शी, जि. पुणे) असल्याचे सांगितले.
एसटी चालकाच्या तक्रारीवरून लोणंद पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार महेश टेकावडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

4) लोणंद:-वारकऱ्यांसाठी ग्रामविकास विभागाची मोठी भेट! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी ₹५.९२ कोटींचा निधी मंजूर.

सातारा | लोणंद, दि. १४ :
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांच्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ग्रामविकास विभागाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना’ अंतर्गत खंडाळा आणि फलटण तालुक्यासाठी तब्बल ₹५ कोटी ९२ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
या निधीतून पाडेगाव, तरडगाव, बरड आणि लोणंद परिसरात वारकऱ्यांसाठी स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्ते, प्रकाशयोजना, पालखी तळ आणि इतर आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत. यामुळे लाखो वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुविधायुक्त होणार आहे.
राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी नुकतीच तरडगाव, लोणंद पालखी तळ, नीरा दत्तघाट तसेच पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, “राज्यातील संतांचे पालखी सोहळे, तीर्थक्षेत्रे आणि वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभाग कधीही कमी पडणार नाही. गतवर्षीपेक्षा यंदा अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, पालखी सोहळ्यात वारकरी आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.”
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या या भरीव आर्थिक तरतुदीमुळे वारकऱ्यांच्या सेवेला अधिक बळ मिळणार असून, यंदाचा पालखी सोहळा अधिक नियोजनबद्ध आणि सुविधायुक्त होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

5) कराड:-४० वर्षांची दमदार घोडदौड! श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेची एजीएम उत्साहात; सभासदांना १०% लाभांश जाहीर.

कराड | दि. १४ : श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा १२ जुलै रोजी आदर्श ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेत सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पतसंस्थेची वाटचाल अधिक सक्षम होत असल्याचे सांगितले. चेअरमन अजित थोरात यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना ३१ मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात संस्थेने ३१७ कोटी रुपयांचा व्यवसाय, ५.२८ कोटी रुपयांचा ढोबळ नफा आणि २.९९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवल्याची माहिती दिली.
संस्थेने एनपीएची १०० टक्के तरतूद केली असून आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थापनेपासून संस्थेने सातत्याने ‘अ’ वर्ग कायम राखला असून, यंदा २०७ कोटी रुपयांच्या ठेवींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच सर्व शाखांमध्ये लॉकर सुविधा उपलब्ध करण्याचाही मानस त्यांनी व्यक्त केला.
माजी चेअरमन अरुणादेवी पाटील यांनी संस्थेच्या ३९ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेत १९८७ मध्ये लावलेले रोपटे आज वटवृक्ष बनल्याचे सांगितले. सध्या मुख्य कार्यालयासह २२ शाखांमधून नागरिकांना बँकिंग सेवा दिली जात असून संस्थेचे ९,१९४ सभासद आहेत. संस्थेकडे १८० कोटी रुपयांच्या ठेवी, १३७ कोटी रुपयांचे कर्जवाटप, ७१ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी, १२.४८ कोटी रुपयांचे भागभांडवल आणि १५.३५ कोटी रुपयांहून अधिक राखीव निधी असल्याची माहिती त्यांनी दिली.
संस्थेत ७० कर्मचारी कार्यरत असून त्यांना आधुनिक सहकार व्यवस्थेचे नियमित प्रशिक्षण दिले जाते. तसेच एकूण शाखांपैकी १७ शाखा स्वमालकीच्या इमारतींमध्ये कार्यरत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमात सचिव सर्जेराव शिंदे व अनिल पवार यांनी नोटीस वाचन केले. सूत्रसंचालन शर्मिला श्रीखंडे व गौरी जाधव यांनी केले, तर संचालक शामराव पवार यांनी आभार मानले.
यावेळी ॲड. चंद्रकांत गायकवाड, सुभाष पाटील, शिवाजीराव धुमाळ, प्रभाकर नलवडे, मोहनराव माने, भारत तंत्रे, काकासाहेब कदम, सीए के. एल. सावंत, डॉ. स्वाती थोरात, ॲड. जाधव आणि शारदा वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.

6) फलटण:-पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! दगडफेक, मारहाण करून ७० हजारांची रोकड लंपास.

सातारा | फलटण, दि. १४ : पंढरपूरहून देवदर्शन करून परतणाऱ्या वारकऱ्यांवर काशीदवाडी (ता. फलटण) येथे अज्ञात चोरट्यांनी दगडफेक करून दहशत निर्माण केली. त्यानंतर दिंडी चालकाला मारहाण करत त्यांच्याकडील ७० हजार रुपयांची रोकड, मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांत अज्ञात ३ ते ४ चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्री संत ज्ञानराज पालखी सोहळ्याचे दिंडी चालक त्र्यंबक आश्रुबा कोळेकर (वय ७२, रा. बीड) हे वारकरी सहकाऱ्यांसह पंढरपूरहून आळंदीकडे निघाले होते. ६ जुलै रोजी मध्यरात्री १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास काशीदवाडी येथे गाडी थांबवून काही वारकरी पत्र्याच्या शेडमध्ये विश्रांती घेत असताना अचानक अज्ञातांनी दगडफेक सुरू केली.
या हल्ल्यामुळे वारकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. एका महिलेने भीतीने किंकाळी फोडल्याने त्र्यंबक कोळेकर यांना चक्कर येऊन ते खाली पडले. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांचा मोबाईल फोडला, त्यांना मारहाण केली आणि खिशातील पाकीट हिसकावून नेले. त्या पाकिटात ७० हजार रुपयांची रोकड, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे होती.
घटनेनंतर आळंदीच्या प्रस्थानाची घाई असल्याने तत्काळ तक्रार देता आली नाही. मात्र १२ जुलै रोजी सासवड मुक्कामी असताना फलटण ग्रामीण पोलिसांत लेखी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे पुढील तपास करत आहेत.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button