वाई:-“श्रद्धेच्या नावाखाली वसुली, सुविधांचा पूर्ण बोजवारा!” धावजी पाटील मंदिरात भाविकांचा संताप; पार्किंगचे पैसे, पण सुविधा कुठे?
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-“श्रद्धेच्या नावाखाली वसुली, सुविधांचा पूर्ण बोजवारा!” धावजी पाटील मंदिरात भाविकांचा संताप; पार्किंगचे पैसे, पण सुविधा कुठे?

सातारा | वाई, दि. १४ : वाई तालुक्यातील सुरूर येथील प्रसिद्ध धावजी पाटील मंदिर परिसरातील अस्वच्छता, मूलभूत सुविधांचा अभाव आणि पार्किंग शुल्काच्या वसुलीवरून भाविकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांतून हजारो भाविक दर्शनासाठी येत असताना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, स्वच्छ परिसर आणि सुरक्षित वातावरण यांसारख्या अत्यावश्यक सुविधांचा पूर्ण अभाव असल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. मात्र, दुसरीकडे पार्किंगच्या नावाखाली सर्रास शुल्क आकारले जात असल्याने “श्रद्धेच्या नावाखाली लूट सुरू आहे का?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
मंदिर परिसरातील विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा साचल्याने परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे. या विहिरीलगतच प्रसादाची दुकाने असल्याने डास, माशा आणि अस्वच्छतेचा प्रचंड त्रास होत असून भाविकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत असून, “महाप्रसाद घ्यायचा की आजारपण?” असा संतप्त सवाल भाविक विचारत आहेत.
नारळ फोडण्याच्या ठिकाणीच नैवेद्य दाखवला जात असल्याने भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. त्यामुळे एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच मंदिर व्यवस्थापन जागे होणार का, असा सवालही भाविक उपस्थित करत आहेत.
मंदिराच्या पूर्व बाजूस मोठ्या प्रमाणात कचरा साचून उकिरड्याचे स्वरूप आले आहे. दुर्गंधीयुक्त आणि अस्वच्छ वातावरणामुळे अनेक भाविकांना नाक मुठीत धरून दर्शनासाठी जावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दुचाकीसाठी १० रुपये आणि चारचाकीसाठी ५० रुपये पार्किंग शुल्क आकारले जात असले, तरी त्याबदल्यात कोणतीही मूलभूत सुविधा दिली जात नसल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. पंचक्रोशीतील नागरिकांनाही कोणतीही सूट नसल्याने स्थानिकांमध्येही नाराजी वाढली आहे. “व्यवस्थापनाला भाविकांची सेवा महत्त्वाची की केवळ महसूल?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्थानिक दुकानदारांच्या माहितीनुसार, मंदिरासाठी अद्याप अधिकृत ट्रस्ट स्थापन झालेला नसून त्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या मंदिराची व्यवस्था पुजारी आणि पाटील कुटुंबीयांकडून पाहिली जात असल्याचे सांगण्यात आले.
वाढत्या तक्रारी आणि भाविकांचा रोष लक्षात घेता मंदिर परिसरात तातडीने स्वच्छता, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, पार्किंग व्यवस्थेतील पारदर्शकता आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा धर्मादाय आयुक्तांकडे पुराव्यांसह अधिकृत तक्रार दाखल करण्याचा इशारा काही भाविकांनी दिला आहे.
2) वाई:-धोक्याचा पूल, झोपलेला विभाग! वाई-वाठार रस्त्यावर मृत्यूला खुले आमंत्रण; शांतीनगर पुलाचे कठडे वर्षभरापासून गायब.

सातारा | वाई दि. १४ : वाई-वाठार या अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील शांतीनगर येथील ओढ्यावरील पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक बनली असून, पुलाचे संरक्षण कठडे (पाईप) गेल्या तब्बल वर्षभरापासून तुटलेल्या अवस्थेत आहेत. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारे ठरत असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.
या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा होते. शाळकरी विद्यार्थी, पादचारी, एसटी बस, खासगी वाहने, एमआयडीसीकडे जाणारे कामगार तसेच अवजड मालवाहू ट्रक या पुलावरून नियमित प्रवास करतात. अशा महत्त्वाच्या मार्गावरील पुलाचे कठडेच नसल्याने दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसमोर मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अपुरा अंदाज आल्यास वाहन थेट ओढ्यात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी करूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. काही वेळा दुरुस्तीचे आश्वासन किंवा निधी मंजूर झाल्याच्या चर्चा होतात; मात्र प्रत्यक्षात कामे रखडलेलीच दिसतात. जेव्हा दुरुस्ती केली जाते, तेव्हाही ती अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याने काही दिवसांतच कठडे पुन्हा तुटून पडतात, अशी नागरिकांची तक्रार आहे.
“मोठी दुर्घटना घडल्याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार नाही का? रोज नागरिक जीव मुठीत धरून या पुलावरून प्रवास करत आहेत,” असा संतप्त सवाल शांतीनगर परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
संभाव्य अपघात आणि जीवितहानी टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या पुलावरील तुटलेले कठडे हटवून त्याजागी मजबूत आणि टिकाऊ सिमेंट-काँक्रीट किंवा उच्च दर्जाचे लोखंडी संरक्षण कठडे बसवावेत, अशी जोरदार मागणी नागरिक आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
3) वाई:-बावधनला आधुनिक आरोग्य सेवेची मोठी भेट!; अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्र साकारणार – सभापती ऋतुजा शिंदे

सातारा | वाई दि. १४ : बावधन गटातील नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी असून, लवकरच बावधन येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, आधुनिक आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, बावधन येथे सातारा जिल्हा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ऋतुजा विराज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘जन आरोग्य समिती’ची बैठक पार पडली. बैठकीत आरोग्य केंद्रातील सुविधा, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, शासकीय आरोग्य योजनांची अंमलबजावणी तसेच भविष्यातील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी बोलताना सभापती ऋतुजा शिंदे म्हणाल्या, “बावधन प्राथमिक आरोग्य केंद्राचे आधुनिकीकरण करून ते संपूर्ण जिल्ह्यातील आदर्श आणि ‘नंबर वन पीएचसी’ म्हणून विकसित करण्याचा आमचा संकल्प आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला शहरांप्रमाणे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळावी, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील.”
बैठकीत आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला. आयडीबीआय बँकेच्या सीएसआर निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्राला अत्याधुनिक एक्स-रे मशीन, एआय आधारित संगणक प्रणाली आणि १६ ऑटो-क्लेव्ह मशीन उपलब्ध करून देण्यात आली. या आधुनिक उपकरणांमुळे रुग्णांचे निदान अधिक जलद व अचूक होण्यास मदत होणार असून उपचार सेवेची गुणवत्ता उंचावणार आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिनकर शिंदे, हिंदुराव पिसाळ, सागर मांढरे, सुरज निकम, तुषार पिसाळ, ज्ञानेश्वर गाढवे, गटातील सरपंच, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भोईटे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका तसेच आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन इमारत, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि लोकाभिमुख आरोग्य सेवेमुळे बावधनसह परिसरातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा मिळणार असून, हा उपक्रम जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
4) वाई:-“स्मृतीतून समाजसेवेचा रक्तसंकल्प! कै. अजय थोरवेंच्या पुण्यस्मरणी ५० रक्तदात्यांनी दिले जीवनदानाचे दान”

व्याहळीत ‘मोरया रे ग्रुप’चा स्तुत्य उपक्रम; सलग आठव्या वर्षी रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.
सातारा | वाई दि. १४ :
कै. अजय दिगंबर थोरवे यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त व्याहळी कॉलनी येथील श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात ‘मोरया रे ग्रुप’च्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत पार पडलेल्या या शिबिरात ५० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली.
कै. अजय थोरवे यांच्या मनमिळावू स्वभावाची आणि समाजसेवेच्या विचारांची प्रेरणा जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने सुरू झालेला हा उपक्रम यंदा सलग आठव्या वर्षी पार पडला. त्यांच्या स्मृतीला पुष्पांजली वाहण्याऐवजी रक्तदानासारख्या समाजोपयोगी कार्यातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
परिसरातील युवक, नागरिक आणि मित्रपरिवाराने मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याचा आयोजकांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी कै. अजय थोरवे यांचे मोठे बंधू निलेश थोरवे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “अजयच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू झालेला हा समाजोपयोगी उपक्रम भविष्यातही दरवर्षी अधिक व्यापक स्वरूपात आणि त्याच सेवाभावाने राबविण्यात येईल.”
मोरया रे ग्रुपच्या सर्व सदस्यांनी या शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले. “माणूस जातो, पण त्याची समाजसेवेची प्रेरणा कायम जिवंत राहते,” हा संदेश देणारा हा उपक्रम वाई तालुक्यातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरला असून परिसरातून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
5) सातारा:-कूपरबागमध्ये रक्तरंजित टोळीयुद्ध! जुन्या खुन्नसवरून तरुणांवर जीवघेणा हल्ला; ६ जण गंभीर जखमी.

सातारा, दि. १४ : सातारा शहरातील कूपरबाग परिसरात जुन्या खुन्नसच्या कारणावरून झालेल्या रक्तरंजित हाणामारीने शहरात खळबळ उडाली आहे. एका तरुणाच्या टोळीने लोखंडी धारदार हत्यारे, लाकडी दांडके, ऊस आणि दगडांच्या सहाय्याने तरुणांवर जीवघेणा हल्ला केल्याने ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले असून, काहींचे हात-पाय फ्रॅक्चर झाले आहेत. या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी ७ जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.
तक्रारदार धीरज प्रदीप चोगरे (वय १९, रा. लक्ष्मीटेकडी, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १० जुलै रोजी रात्री नकुल धारवाडकर यांच्या गाडीची तोडफोड झाली होती. त्यानंतर नकुल, धीरज आणि ऋतिक जाधव हे वाढे फाटा येथील एका हॉटेलमध्ये झोपले असताना मुख्य आरोपी सुश्रीत सावंत व त्याच्या साथीदारांनी त्यांना जबरदस्तीने उठवून कूपरबाग परिसरात नेले.
तेथे “माझ्या मित्रांकडे खुन्नसने का बघता?” असा जाब विचारत सुश्रीत सावंत याने ऋतिक जाधव यांच्या डोक्यावर व कानावर धारदार हत्याराने वार केला. धीरज, अथर्व आणि नकुल हे मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले असता आरोपींनी त्यांच्यावर लाकडी दांडके, ऊस आणि दगडांनी बेदम मारहाण केली.
या हल्ल्यात धीरज चोगरे यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला असून ऋतिक जाधव, नकुल धारवाडकर आणि अथर्व माने यांच्यासह अन्य तरुण गंभीर जखमी झाले आहेत. आरोपींनी जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सोडून “गाडीवरून पडून जखमी झालो असे सांगा, नाहीतर परिणाम भोगावे लागतील,” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
घटना इथेच थांबली नाही. आरोपींनी नकुल धारवाडकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांना व भावालाही मारहाण केली तसेच घरासमोरील कारची तोडफोड केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी सुश्रीत सावंत, अक्षय शिवगण उर्फ बाप्या, अविनाश पवार उर्फ गोट्या, करण लांदे, फरीद शेख, आदित्य सागर आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश गवळी या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
6) सातारा:-अपघातांना लगाम घालण्यासाठी साताऱ्यात मोठे निर्णय!; ‘ब्लॅकस्पॉट’ हटवा, ट्रॉमा केअर सक्षम करा – खा.उदयनराजे भोसले

सातारा दि. १४ : सातारा जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात खा. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत रस्ता सुरक्षेबाबत विविध विभागांना स्पष्ट निर्देश देण्यात आले.
बैठकीत नवीन महामार्गांमुळे शेतांमध्ये साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याची तातडीने व्यवस्था करणे, पेट्रोलपंपांजवळ तोडण्यात आलेले डिव्हायडर पूर्ववत जोडणे तसेच जिल्ह्यातील अपघातप्रवण (ब्लॅकस्पॉट) ठिकाणांचा तालुकास्तरावर शोध घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना खा. उदयनराजे भोसले यांनी दिल्या.
तसेच, ट्रॉमा केअर सेंटरमध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचे निर्देश देत वाहतूक नियमांच्या काटेकोर पालनासाठी व्यापक जनजागृती आणि प्रभावी अंमलबजावणीची गरज त्यांनी अधोरेखित केली.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांनी रस्त्याच्या डाव्या बाजूनेच प्रवास करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करत नियमभंगामुळे अपघात आणि वाहतूक कोंडी वाढत असल्याचे सांगितले. महामार्गालगतच्या पोलीस ठाण्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जड वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विश्वास सातपुते, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रस्ता सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
7) सातारा:-१०% परताव्याचे आमिष; माजी सैनिकालाच ४.५ लाखांचा गंडा! विश्वासाचा गैरफायदा घेत शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक.

शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये दरमहा १० टक्के भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवत एका निवृत्त लष्करी जवानाची तब्बल ४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार सातारा शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी वाई तालुक्यातील धनकमवाडी येथील माजी सैनिक विकास किसन धनकम (वय ४९) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून राहुल मधुकर गुजर (रा. दौलतनगर, सातारा) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार विकास धनकम हे ३० जून २०२३ रोजी भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झाले आहेत. आरोपी राहुल गुजर हा एलआयसी एजंट म्हणून परिचित असल्याने त्याचे धनकम यांच्या घरी येणे-जाणे होते. याच ओळखीचा गैरफायदा घेत त्याने “मी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो, पैसे गुंतवा… दरमहा १० टक्के परतावा मिळवून देतो,” असे आमिष दाखवले.
विश्वास ठेवून धनकम यांनी २५ जुलै २०२३ रोजी आरटीजीएसद्वारे ५ लाख रुपये आरोपीच्या अॅक्सिस बँक खात्यावर वर्ग केले. त्यानंतर २० महिन्यांचा करारनामा देखील नोटरी कार्यालयात करण्यात आला. सुरुवातीला करारानुसार आरोपीने ५० हजार रुपयांचा पहिला परतावा दिला; मात्र त्यानंतर कोणतीही रक्कम न देता वारंवार “एका महिन्यात देतो” असे सांगत टाळाटाळ केली.
अखेरीस फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर धनकम यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र पाटोळे करत आहेत.




