वाई:-शिष्यवृत्तीत ‘दिशा’ची राज्यभर दिमाखदार झेप! राज्य गुणवत्ता यादीत सहा विद्यार्थ्यांची चमक; २५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717493

1) वाई:-शिष्यवृत्तीत ‘दिशा’ची राज्यभर दिमाखदार झेप! राज्य गुणवत्ता यादीत सहा विद्यार्थ्यांची चमक; २५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक.

तालुका गुणवत्ता यादीतील २६ पैकी तब्बल २३ विद्यार्थी दिशा स्टडी सेंटरचे; गुणवत्तेची परंपरा कायम.
वाई, दि. ०६ : शिष्यवृत्ती परीक्षेत सातत्यपूर्ण यशाची परंपरा जपत दिशा स्टडी सेंटर, वाईने यंदाही उल्लेखनीय कामगिरी करत शिक्षण क्षेत्रातील आपला दबदबा कायम राखला आहे. यंदाच्या परीक्षेत केंद्रातील २५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून, वाई तालुक्याच्या शहरी भागातील तालुका गुणवत्ता यादीतील २६ पैकी तब्बल २३ विद्यार्थी दिशा स्टडी सेंटरचे असल्याने संस्थेने गुणवत्तेचा नवा मानदंड निर्माण केला आहे.
निकालात अदिती वनारसे हिने २८२ गुण (९४ टक्के) मिळवत राज्यात आठवा, जिल्ह्यात अकरावा आणि तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच वैष्णवी जायगुडे (राज्यात ११ वी), अभिज्ञा दळवी (१२ वी), अथर्व जायगुडे (१३ वा), अनघा शिंदे (१४ वी) आणि सोहम बोंबले (१५ वा) यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवत दिशा स्टडी सेंटरच्या यशात मानाचा तुरा रोवला.
याशिवाय आस्था तनपुरे, प्रथमेश शिंदे, श्लोक मोकाशी, स्वरा गोळे, रसिका ताटे, शंभूराज धाडवे, साईश येवले, प्रांजल चव्हाण, आर्यन फरांदे, विदित तांबे, वैभवी जगताप, आदित्य जाधव, अक्षदा सोंडकर, वैष्णवी पिसाळ, यश यादव, हरिता मंचुके, श्रेयस ढगे आणि शार्दूल घाडगे यांनीही उल्लेखनीय गुणवत्तेसह शिष्यवृत्ती मिळवली. सर्वेश जवळे याने दिव्यांग गटात जिल्ह्यात प्रथम आणि ग्रामीण सर्वसाधारण गटात तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवत विशेष यश संपादन केले.
या यशामागे अनुभवी शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन, नियमित सराव परीक्षा, विषयनिहाय चाचण्या आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार केलेले वैयक्तिक मार्गदर्शन हे महत्त्वाचे घटक ठरले. मराठीसाठी अर्चना ढगे-जाधव व जयश्री फरांदे, गणितासाठी शुभांगी बोंबले व निरंजन पवार, बुद्धिमत्तेसाठी प्रवीण जगताप व नजहत मुजावर, तर इंग्रजीसाठी रेश्मा भगत यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. अकॅडमिक हेड प्रियांका येवले यांनी संपूर्ण शैक्षणिक नियोजनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.
संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आणि संचालिका प्रा. रूपाली कदम यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे दिशा स्टडी सेंटरने परिसरातील विश्वासार्ह शैक्षणिक संस्था म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यशाबद्दल प्रतिक्रिया देताना प्रा. रूपाली कदम म्हणाल्या, “विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण सराव, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि पालकांचे मोलाचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाले आहे. भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थ्यांना राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवून देण्यासाठी दिशा स्टडी सेंटर कटिबद्ध राहील.”
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम आणि संचालिका प्रा. रूपाली कदम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, दिशा स्टडी सेंटरने पुन्हा एकदा वाई तालुक्याचा शैक्षणिक झेंडा राज्यभर उंचावला आहे.
2) वाई:-“फक्त पोस्टबाजी… प्रत्यक्षात भोंगळ कारभार! ‘नो पार्किंग’ फलकांच्या नावाखाली जनतेच्या पैशाची उधळपट्टी?”

सोशल मीडियावर विकासाचे ढोल; प्रत्यक्षात पाया नसलेले फलक, गप्प पालिका आणि मौनधारी.
सातारा | वाई, दि. ०६ :
वाई शहरात बसविण्यात येत असलेल्या ‘नो पार्किंग’ व फेरीवाला पार्किंग फलकांच्या कामाचा काही लोकप्रतिनिधींनी सोशल मीडियावर मोठा गाजावाजा करत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्यक्षात या कामाचा दर्जा पाहिल्यानंतर वाई नगरपालिकेचा कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, जनतेच्या कररुपी पैशांची उघडपणे उधळपट्टी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
महागणपती पुलासह शहरातील अनेक ठिकाणी फलक मजबूत पाया न देता केवळ पत्र्याच्या कुंडीत सिमेंट भरून उभे करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे फलक जोरदार वाऱ्यात किंवा किरकोळ धक्क्यातही कोसळण्याची शक्यता व्यक्त होत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे, आवश्यक ठिकाणी मोठे व स्पष्ट दिसणारे फलक बसविण्याऐवजी अत्यंत लहान आकाराचे फलक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे “कामाचा आराखडा कोणी मंजूर केला? निकृष्ट साहित्य वापरण्याची परवानगी कोणी दिली? गुणवत्ता तपासणी झाली की नाही? आणि ठेकेदारावर कोणाचा वरदहस्त आहे?” असे सवाल नागरिक विचारत आहेत.
दरम्यान, निकृष्ट काम सुरू असतानाही सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील एकाही लोकप्रतिनिधीने जाब विचारला नाही. त्यामुळे “लोकप्रतिनिधी जनतेसाठी की ठेकेदारांसाठी?”, “विरोधी पक्ष नेमका कुठे आहे?” आणि “ही मिली-जुली व्यवस्था आहे का?” अशा संतप्त चर्चा शहरभर सुरू आहेत.
वाईकरांनी दर्जेदार विकासासाठी लोकप्रतिनिधींना निवडून दिले; मात्र विकासाच्या नावाखाली निकृष्ट कामे करून जनतेच्या पैशावर डल्ला मारला जात असेल आणि त्यावर सर्वच गप्प बसत असतील, तर हा जनतेच्या विश्वासघाताचा प्रकार असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
त्यामुळे महागणपती पुलासह शहरातील सर्व ‘नो पार्किंग’ व फेरीवाला पार्किंग फलकांच्या कामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच निकृष्ट काम करणाऱ्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शेवटी एकच प्रश्न — विकासाचे फोटो काढणाऱ्यांवर कारवाई होणार, की निकृष्ट काम करणाऱ्यांवर?
3) वाई:-शिक्षणासाठी आरंभचा आदर्श उपक्रम! एकसर केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य; विकासकामांचीही भक्कम साथ.

सातारा | वाई दि. ०६ :
जिल्हा परिषद केंद्र शाळा, एकसर येथे आरंभ संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्थेने केलेल्या या योगदानाचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मयूर चव्हाण, तज्ज्ञ मार्गदर्शक बाळकृष्ण तरडे तसेच मुख्याध्यापिका प्रभावती थोरवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आरंभ संस्थेच्या श्रीमती शोभामूर्ती यांच्या पुढाकारातून एकसर शाळेत यापूर्वी मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालय, शाळेचे रंगकाम, फरशी बसविणे, हँडवॉश स्टेशनची उभारणी, महिलांसाठी कौशल्य विकास कक्ष आणि आधुनिक अंगणवाडी अशा अनेक विकासकामांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आता शाळेत संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आल्यास विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
मुख्याध्यापिका प्रभावती थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणामुळे सातत्याने प्रगती करत आहे. एकसर गावाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी आरंभ संस्थेने दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल ग्रामस्थांनी श्रीमती शोभामूर्ती यांचे विशेष कौतुक करत कृतज्ञता व्यक्त केली.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी लोहारे शाळेचे मुख्याध्यापक शेखर जाधव यांचेही महत्त्वपूर्ण योगदान लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुनाथ राठोड यांनी केले, तर आभार फुलचंद महांगडे यांनी मानले. नियोजन सौ. घोडके यांनी केले. कार्यक्रमास ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
4) कराड:-“सहकारातून आर्थिक सक्षमीकरणाचा संदेश! आगाशिवनगरच्या सहकार मेळाव्यात सुरक्षित बँकिंग व शासकीय योजनांची जनजागृती”

कराड | दि. ०६ :
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., शाखा आगाशिवनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सहकार मेळाव्यास ग्राहक, सभासद, महिला बचत गट आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण भागात आर्थिक साक्षरता वाढवणे, सुरक्षित डिजिटल बँकिंगची माहिती देणे आणि शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता.
शाखाप्रमुख सुनिता साळुंखे यांनी डिजिटल बँकिंगचे महत्त्व सांगताना मोबाईल बँकिंग, एटीएम आणि यूपीआय व्यवहार करताना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले. कोणालाही ओटीपी, पासवर्ड किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती देऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच महिला बचत गटांच्या कामकाजाविषयीही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
विकास अधिकारी सुशील थोरवडे यांनी पीक, गृह, वैयक्तिक आणि वाहन कर्जासह विविध ठेव योजनांची माहिती देत विकास सेवा सोसायट्या आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी व सभासदांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. ‘अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती व कर्ज प्रोत्साहन योजना’ याबाबत पात्रता, लाभ आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती देऊन उपस्थितांच्या शंकांचे समाधान केले.
कार्यक्रमाचे आभार निलेश माने यांनी मानले. त्यांनी ग्रामस्थ, ग्राहक आणि सभासदांना बँकेच्या लोककल्याणकारी योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले.
आगाशिवनगर परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, विकास सेवा सोसायट्यांचे पदाधिकारी, सचिव, सभासद आणि महिला बचत गटांच्या प्रतिनिधींच्या मोठ्या उपस्थितीत हा सहकार मेळावा यशस्वी झाला. ग्रामीण भागात आर्थिक साक्षरता आणि सुरक्षित बँकिंगची जनजागृती करणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




