“वाई पालिकेचा निर्लज्ज कारभार! जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदाराला सभागृहात ‘मुदतवाढ’; वाईकर संतप्त”
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) “वाई पालिकेचा निर्लज्ज कारभार! जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदाराला सभागृहात ‘मुदतवाढ’; वाईकर संतप्त”

२४ तास पाणी योजनेच्या नावाखाली शहरातील रस्ते उद्ध्वस्त; खड्डे, तुटलेली नळजोडणी, अपघातांची मालिका… ठेकेदारावर कारवाईऐवजी मुदतवाढ मंजूर!
सातारा | वाई, दि. ०५ :
धोम धरणातून वाई शहरासाठी राबविण्यात येणाऱ्या २४ तास पाणीपुरवठा योजनेच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी खड्डे तसेच अर्धवट काम कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, कामात झालेल्या विलंबाबाबत संबंधित ठेकेदाराकडून स्पष्टीकरण मागविणे किंवा दंडात्मक कारवाई करण्याऐवजी पालिकेच्या विशेष सभेत त्याला मुदतवाढ मंजूर करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे यांनी याला विरोध नोंदविल्याचे सांगितले जात आहे.
पाईपलाईनच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले असून पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. काही नागरिकांच्या पाणीपुरवठ्याच्या नळजोडण्या तुटल्याचा आरोप असून, त्या वेळेत दुरुस्त न झाल्याने नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत असल्याची तक्रार आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचा दावा नागरिकांनी केला असून, ठेकेदाराकडून तातडीने रस्ते दुरुस्त करून काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त वाईकरांनी दिला आहे.
2) वाई:-राज्य गुणवत्ता यादीत वाईची दमदार छाप! महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश.
सातारा | वाई : इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वाई प्रकल्पाने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप उमटवली आहे. व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल आणि कन्या शाळा, वाई येथील विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत उल्लेखनीय स्थान मिळवत संस्थेचा नावलौकिक उंचावला आहे.
इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत कन्या शाळेची विद्यार्थिनी आदिती वनारसे हिने ९४.०० टक्के गुणांसह राज्य गुणवत्ता यादीत ८ वा क्रमांक मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले. तसेच वैष्णवी पिसाळ हिने २४८ गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत १४५ वा क्रमांक पटकावला.
व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या वैष्णवी जायगुडे हिने ९२.६१ टक्के गुणांसह राज्यात ११ वा क्रमांक, तर अथर्व जायगुडे याने ९१.९४ टक्के गुणांसह राज्यात १३ वा क्रमांक मिळविला. ईशान पोतदार याने ८७.२४ टक्के गुणांसह जिल्हा गुणवत्ता यादीत ७६ वा क्रमांक पटकावला.
इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत इरा चौंडे हिने ८३.८९ टक्के गुणांसह जिल्ह्यात ७३ वा क्रमांक, तनया कोठावळे हिने ८१.२० टक्के गुणांसह १०६ वा क्रमांक, तर सावेरी सोहनी हिने ८०.५३ टक्के गुणांसह १२० वा क्रमांक मिळवत विद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली.
या उल्लेखनीय यशामागे वाई प्रकल्पाच्या अध्यक्षा मा. सौ. उमाताई जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका व आजन्म सेविका सौ. विद्या राव आणि कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता आगाशे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
या यशाबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे अभिनंदन करत भविष्यातही अशीच उज्ज्वल परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वाई प्रकल्पाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा लौकिक अधिक दृढ झाला आहे.
3) वाई:-“डोंगर खचला… शाळेवर संकट! दत्तनगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका; तातडीच्या उपाययोजनांची ग्रामस्थांची आर्त मागणी”

सातारा | वाई दि. ०५ :
वाई तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका दत्तनगर (पिराचीवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बसला आहे. शाळेच्या पाठीमागील डोंगराचा उतार मोठ्या प्रमाणात खचल्याने मातीचा भराव व दगड-गोटे थेट संरक्षण भिंतीपर्यंत येऊन पोहोचले आहेत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून पालक व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरड कोसळल्यामुळे शाळेतील मुला-मुलींच्या शौचालयाचे तसेच किचनशेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे डोंगराचा आणखी भाग खचण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, वेळेत उपाययोजना न झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर शाळेच्या पाठीमागे तातडीने मजबूत संरक्षण भिंत उभारावी, खचलेली माती व दगड-गोटे त्वरित हटवावेत आणि नुकसानग्रस्त शौचालय व किचनशेडची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या गंभीर परिस्थितीची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन घटनास्थळी पाहणी करावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी मागणी पिराचीवाडी ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्ते युवराज कोंढाळकर यांनी केली आहे.
4) वाई:-पाटबंधाऱ्याचा हट्ट; हजारोंचा जीव धोक्यात!
व्याहाळी-धोम रस्त्यावर गुडघाभर खड्डे; अपघातानंतरच प्रशासन जागे होणार?

सातारा | वाई, दि. ०५ :
वाई तालुक्यातील पश्चिम भागाला जोडणारा व्याहाळी–धोम हा महत्त्वाचा रस्ता पाटबंधारे विभागाच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. धरणाखाली कोट्यवधी रुपये खर्चून पूल उभारण्यात आला, रस्त्याचे बहुतांश कामही पूर्ण झाले; मात्र कालव्यालगतच्या अवघ्या एक किलोमीटर रस्त्याला मंजुरी नाकारल्याने हजारो नागरिकांना आजही गुडघाभर खड्ड्यांतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत असून कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षांपासून रस्त्याची ना दुरुस्ती, ना देखभाल; त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
हा रस्ता पश्चिम भागातील अनेक गावांसाठी जीवनवाहिनी आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, व्यापार आणि दैनंदिन दळणवळणासाठी हजारो नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र केवळ प्रशासकीय अडथळ्यांमुळे सर्वसामान्यांना रोज हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
धोम येथील ऐतिहासिक मंदिरे पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येतात. मात्र रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे अनेक पर्यटक हा मार्ग टाळत असून स्थानिक पर्यटन आणि व्यवसायालाही मोठा फटका बसत आहे.
स्थानिक नागरिकांनी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून कालव्यालगतच्या रस्त्याला मंजुरी द्यावी आणि संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी केली आहे. “मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?” असा संतप्त सवाल आता पश्चिम भागातील नागरिक विचारत आहेत.
पर्यटकांनाही मनस्ताप
“धोम धरण उभारल्यापासून हा रस्ता दोन्ही भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. धोमच्या प्राचीन मंदिरांकडे जाणारे पर्यटकही याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने तातडीने परवानगी द्यावी.”
— सचिन मानकुंबरे, ग्रामस्थ, व्याहाळी
5) खंडाळा:-“महिला सक्षमीकरणाचा नवा संकल्प! ज्ञानमुद्रा महिला प्रभागसंघाच्या वार्षिक सभेत आर्थिक स्वावलंबनाचा रोडमॅप”

सातारा | खंडाळा दि. ०५ :
महिला बचत गटांना अधिक सक्षम करून एकल महिलांच्या आर्थिक उन्नतीला चालना देण्याचा निर्धार ज्ञानमुद्रा महिला प्रभागसंघ, भादे (ता. खंडाळा) यांच्या पाचव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला. गुरुवार (दि. २ जुलै) रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सभेत महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि आरोग्य जनजागृतीशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
सभेस जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ऋषीकेश धायगुडे-पाटील, पंचायत समिती खंडाळा उपसभापती संतोष वीर, सदस्य यशवंत खुंटे, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, तालुका अभियान व्यवस्थापक प्रविण खुडे, तालुका व्यवस्थापक (एफआय) काशिनाथ कुंभार, तालुका व्यवस्थापक (एमआयएस) राजेश चव्हाण तसेच ब्लॉक अँकर मनोज माने यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभागसंघाच्या अध्यक्षा विदुला भालेराव होत्या.
सभेत मागील इतिवृत्ताला मंजुरी देत वार्षिक कामकाज व आर्थिक अहवाल संमत करण्यात आला. आगामी वर्षात महिला बचत गट अधिक सक्षम करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे, उद्योग-व्यवसायाला चालना देणे आणि महिलांचे आर्थिक स्वावलंबन वाढविण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी प्रभागातील एकल महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. वैयक्तिक अर्थसाहाय्याच्या माध्यमातून उद्योग उभारणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला, तर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बचत गटांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
‘सेकंड चान्स’ उपक्रमात अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे, एकल महिलांना दोन उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळवून द्यावे आणि महिलांसाठी नवीन विकासात्मक उपक्रम राबवावेत, असे महत्त्वपूर्ण ठरावही मंजूर करण्यात आले.
एफएनएचडब्ल्यू उपक्रमांतर्गत आरोग्य विभागाच्या सहकार्याने महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सभेची सांगता आभार प्रदर्शनाने झाली. प्रभाग समन्वयक रेश्मा धायगुडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मान्यवर, महिला बचत गट आणि सदस्यांचे आभार मानले.
6) कोरेगावात ‘उमेद’चा जागर! हजारो महिलांच्या उपस्थितीत सक्षमीकरणाचा नवा संकल्प; बचत गट, आरोग्य आणि स्वावलंबनाचा संगम.

सातारा | कोरेगाव, दि. ०४ : महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद’ अभियानांतर्गत आयोजित चौथी सर्वसाधारण वार्षिक सभा शुक्रवार, दि. ३ जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. महिला सक्षमीकरणाचा नवा संदेश देणाऱ्या या सभेला ग्रामीण भागातील महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, धुमाळ सर, पंकज सर आणि धर्माधिकारी मॅडम यांचीही विशेष उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी महिलांनी स्वावलंबी बनून उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित महिलांना नव्या संधींची दिशा आणि आत्मविश्वास मिळाला.
सभेचे मुख्य आकर्षण म्हणजे महिला बचत गटांनी उभारलेले विविध उत्पादनांचे आणि उपजीविकेचे स्टॉल्स होते. या स्टॉल्समधून महिलांनी आपल्या उद्योजकीय कौशल्याचे प्रभावी दर्शन घडवले. महिलांच्या आरोग्याची काळजी घेत कार्यक्रमस्थळी विशेष हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शेकडो महिलांनी लाभ घेतला.
याशिवाय महिला भगिनींनी सादर केलेल्या सामाजिक आशय असलेल्या विशेष नाट्यप्रयोगाने उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणातून समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, सहकाऱ्यांचे आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या महिला भगिनींचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले. “एकजुटीच्या बळावर महिला सक्षमीकरणाचा प्रवास अधिक सक्षम आणि व्यापक होईल,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
7) माण:-“पाण्यासाठी नागरिकांची फरफट चालणार नाही! हलगर्जी अधिकाऱ्यांना मंत्री जयकुमार गोरे यांचा कडक इशारा”

सातारा | माण दि. ०५ :
माण-खटाव तालुक्यातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दहिवडी येथे ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. पाणीटंचाईग्रस्त गावांतील परिस्थितीचा सखोल आढावा घेत नागरिकांना अखंड व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
बैठकीत विविध गावांतील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, टँकरद्वारे सुरू असलेला पुरवठा, उपलब्ध जलस्रोतांचा वापर आणि आगामी नियोजनावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, “पाणीपुरवठ्यातील कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही, यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे.”
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून प्रत्येक गावापर्यंत वेळेत पाणी पोहोचविण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती व सदस्य, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
8) कराड:-“खड्डे, तुंबलेल्या गटारी आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा! मलकापूर फाट्यावर ६ जुलैला ‘रास्ता रोको’चा एल्गार”
कराड | दि. ०५ :
मलकापूर हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ लगतच्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था, मोठमोठे खड्डे आणि तुंबलेल्या गटरांमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून संतप्त नागरिकांनी सोमवार, ६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता मलकापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सलग तीन दिवसांच्या पावसामुळे सेवा रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दररोज लहान-मोठे अपघात घडत असून प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
तुंबलेल्या गटरांमुळे खंडोबानगर, थोरात मळा, सकपाळ मळा, जानवी मळा परिसरातील घरांमध्ये पावसाचे पाणी घुसत असून नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. पश्चिमेकडील शेतकऱ्यांच्या घरांमध्ये व शेतातही पाणी साचल्याने शेतीचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार आहे.
या प्रश्नावर गेली तीन वर्षे केंद्रीय मंत्री, संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि खासगी कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. शनिवारीही आमदार, खासदार, नगरपरिषदेचे अधिकारी आणि संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
४ आणि ५ जुलैपर्यंत खड्डे बुजवून गटारींची साफसफाई पूर्ण न झाल्यास ६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता नागरिक, विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने मलकापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग, तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.




