वाई:- छत्रपती शाहू महाराज हे द्रष्टे राजे होते : प्रा.(डॉ.) सुभाष वाघमारे
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई. दि. २९
छत्रपती शाहू महाराज हे द्रष्टे राजे होते : प्रा.(डॉ.) सुभाष वाघमारे

वर्तमानकालीन जीवन जगताना, भविष्यकाळाचा वेध घेणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे द्रष्टे राजे होते, असे प्रतिपादन प्रा. (डॉ.) सुभाष वाघमारे त्यांनी केले. येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयामध्ये मराठी विभाग, स्टाफ वेल्फेअर कमिटी व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘ राजर्षी छत्रपती शाहू महाराज जीवन आणि कार्य’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.(डॉ.) विनोद वीर, मराठी विभागप्रमुख प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. (डॉ.), शिवाजी कांबळे स्टाफ वेल्फेअर कमिटीचे सचिव डॉ. शिवाजी ताटे यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या व्याख्यानात डॉ. वाघमारे पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज ही मराठी माणसांची अस्मिता असून, छत्रपती शाहू महाराज, म.फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे इ. महापुरुषांनी समतेची बीजे पेरली असल्यामुळे आपल्याला माणुसकी मिळाली आहे. राज्यकारभार करण्यापूर्वी शाहू महाराजांना सर्व प्रकारची प्रशिक्षणे मिळाली असल्यामुळे, ते विवेकी बनले. प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन त्यांनी त्यांची कामे केली. सर्व जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी त्यांनी अनेक शाळांची निर्मिती केली. विद्यार्थी वसतिगृहाचे ते आद्य जनक होते. शासनकर्ता म्हणून केवळ अठ्ठावीस वर्षांची त्यांना कारकीर्द मिळाली, परंतु एवढ्या अल्पकाळातही सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व कला जीवनावर त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा गहिरा ठसा उमटविला. ‘लोकराजा’ ही त्यांना जनतेने दिलेली उपाधी होती. सामाजिक अन्याय आणि विषमतेची त्यांना प्रचंड चीड होती. ते राजवाड्यातून महारवाड्यात जाणारे पहिले राजे होते. त्यांनी केलेले कार्य हे केवळ कोल्हापूर, महाराष्ट्र तसेच भारतापुरते मर्यादित नसून ते परदेशापर्यंत पोहचले आहे. मानवावर केवळ मानव म्हणून प्रेम करणारे ते लोकोत्तर राजे होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. फगरे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज हे केवळ राजेच नव्हते, तर ते एक थोर विचारवंत होते. आपल्या कृतीतून त्यांनी समतेचा आदर्श घालून दिला. सर्व समाजाचा विचार करणारा तो जाणता राजा होता. कोल्हापूर संस्थानमध्ये उद्यमनगरीची स्थापना करून त्यांनी लोकांना उद्योग निर्माण करून दिले. वडिलांच्या नावाने जयसिंगपूरला व्यापारी पेठा वसविल्या. शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण दिले. आजच्या आधुनिक काळात छत्रपती शाहू महाराज यांचे विचार महत्त्वाचे आहेत. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांचे समाजावर अनंत उपकार असून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची जयंती सर्वांनी दिवाळीसारखी साजरी केली पाहिजे. पाहुण्यांचा परिचय डॉ. शिवाजी ताटे यांनी करून दिला, तर आभार प्रा. (डॉ.) शिवाजी कांबळे यांनी मानले. डॉ. संदीप वाटेगावकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, डॉ. धनंजय निंबाळकर, डॉ. संग्राम थोरात, डॉ. सुमित कोरडे, डॉ. अमोल कवडे, श्री. राहुल तायडे, कार्यालयीन प्रमुख श्री. बाळासाहेब टेमकर यांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




