आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-‘अजितदादांची कार्यतत्परता आजही प्रेरणादायी’; वाई नगरपालिकेत प्रतिमेचे भावपूर्ण अनावरण.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-‘अजितदादांची कार्यतत्परता आजही प्रेरणादायी’; वाई नगरपालिकेत प्रतिमेचे भावपूर्ण अनावरण.

सातारा | वाई, दि. ३० :
वाई शहराच्या विकासासाठी मोलाचे योगदान देणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. ना. अजित पवार यांच्या प्रतिमेचे वाई नगरपरिषदेच्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात भावपूर्ण वातावरणात अनावरण करण्यात आले. नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात स्व. अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी स्व. अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, “राज्याच्या पायाभूत सुविधा, जलसंपदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणात अजितदादांचे योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या कार्यशैलीतून प्रेरणा घेत वाई शहराचा सर्वांगीण विकास, नागरिकाभिमुख सुविधा आणि पारदर्शक प्रशासन देण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे.”
ते पुढे म्हणाले, “उपमुख्यमंत्री म्हणून जेव्हा जेव्हा अजितदादा वाईमध्ये आले, तेव्हा त्यांनी शहरातील विकासकामांचा बारकाईने आढावा घेतला. प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांच्या कार्यपद्धतीचा जवळून अभ्यास करण्याची संधी मिळाली. वाई शहराच्या हिताचे कोणतेही काम त्यांनी तत्काळ मार्गी लावले. त्यांचा कामाचा झपाटा आणि लोकाभिमुख दृष्टिकोन कायम प्रेरणादायी राहील.”
यावेळी नगरसेवक प्रसाद बनकर, नीलिमा खरात, भारत खामकर, शैलेंद्र देवकुळे आणि विजय ढेकणे यांनीही स्व. अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाबाबत शहरातही चर्चा रंगली. स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेच्या अनावरणावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी व सदस्यांचा सहभाग अपेक्षेपेक्षा कमी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
या प्रसंगी वाई नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी तसेच पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

2) वाई:-गरजू विद्यार्थ्यांसाठी सचिन सावंतांचा शिक्षणाला हातभार; शेकडो विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप.

वाई, दि. ३० : शिक्षणाच्या प्रवासात आर्थिक अडचणी आड येऊ नयेत, या सामाजिक भावनेतून वाई नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन सावंत यांनी सोनगिरवाडी प्रभागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविला. ज्योतिबा मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात शेकडो विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या आणि पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष अनिल सावंत, जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गवळी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्ष डॉ. सतीश बाबर, नगरसेविका नूतन मालुसरे, दिपाली सावंत, सरिता सावंत, तेजल सावंत, युवा नेते श्रीकांत सावंत, प्रकाश जाधव, लक्ष्मण सावंत, अर्जुन मगर, गणेश पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नगरसेवक सचिन सावंत यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. “शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा देणारा आहे,” असे त्यांनी सांगितले.
युवा नेते श्रीकांत सावंत यांनी विद्यार्थी आणि पालकांना शालेय शिक्षणासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
प्रास्ताविकात नगरसेवक सचिन सावंत यांनी, “शिक्षणापासून कोणताही गरजू विद्यार्थी वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. हा उपक्रम दरवर्षी सातत्याने राबविण्यात येईल,” अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाची सुरुवात तेजल सावंत यांच्या स्वागतपर मनोगताने झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आवश्यक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमाचे वाई शहरासह संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत असून, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समाजाने पुढे येण्याची गरज या उपक्रमातून अधोरेखित झाली.

3) वाई:-“२३ कोटींचा ‘मलाई’चा खेळ? वाई पालिकेच्या सभेतच फुटलं भांडं; नगराध्यक्षांचा अधिकारी-ठेकेदारांवर घणाघाती हल्ला!”

“जनतेचा पैसा गिळायला लाज वाटली नाही का?” सभागृहातच अधिकाऱ्यांची कानउघाडणी; STP प्रकल्पावरून वाई पालिकेत जोरदार राडा.

वाई, दि. ३० : वाई नगरपरिषदेची विशेष सभा म्हणजे सोमवारी अक्षरशः धुरळाच उडाला! तब्बल २२ कोटी ८४ लाखांच्या सांडपाणी (STP) प्रकल्पात ‘मलाई’ खाल्ली गेली, असा थेट आणि सणसणीत आरोप करत नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना भरसभेतच धारेवर धरले. “जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून कोणाचं भलं चाललंय?” असा सवाल करत त्यांनी प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली.
सभेत STP प्रकल्पातील ८३ लाखांच्या कन्सल्टंट फीपैकी ७० लाख रुपये नियम धाब्यावर बसवून दिल्याचा आरोप झाला. जागाच नाही, तरी टाकी मंजूर; पाईपलाईनचं काम अर्धवट, पण मशीन बसवायची घाई! असा संतप्त सवाल नगराध्यक्षांनी उपस्थित करत संबंधितांवर कारवाईचा इशाराच दिला.
यावर नगरसेवक शैलेंद्र देवकुळे यांनीही जोरदार पलटवार करत, “मंत्री निधी आणतात, पण त्याचं नीट नियोजन करणं तुमचंच काम!” असे सुनावत सभागृहात वातावरण तापवले.
नगरसेवक भारत खामकर यांनीही “इतक्या बारीक पाईपमध्ये शहराचं सांडपाणी जाणार तरी कसं?” असा थेट प्रश्न उपस्थित केला. ही योजना भविष्यात फसणार असल्याचा इशारा देत त्यांनी नागरिकांसमोर खुली बैठक घेण्याची मागणी केली.
नगरसेवक प्रसाद बनकर यांनी कन्सल्टंटवर गंभीर आरोप करत “७० लाख रुपये वसूल करा, नदीघाट उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कारवाई करा,” अशी मागणी लावून धरली. काळेश्वरी मंदिर आणि मारुती मंदिर परिसराची तोडफोड झाल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, २४ तास पाणीपुरवठा योजनेला पुन्हा ७ ते ८ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. नगरसेविका जागृती पोरे यांनी खोदकामानंतर तुटलेले नळजोड अनेक दिवस दुरुस्त होत नसल्याबद्दल ठेकेदाराला चांगलाच जाब विचारला.
सभेतील ठळक निर्णय
CSR अंतर्गत बावधान नाका ते हॉटेल चतुर्थी मार्गावर मोफत स्ट्रीट लाईट.
शाळा व मैदानासाठी जमीन संपादनासाठी जिल्हास्तरावर निधी मागविण्याचा निर्णय.
रखडलेल्या घनकचरा प्रकल्पावर नगराध्यक्षांचा संताप.
नगरसेवक शैलेंद्र देवकुळे यांचा बैठकीचा भत्ता शाळा क्रमांक ५ ला देण्याचा निर्णय.
एकंदरीत, वाई नगरपरिषदेची ही सभा म्हणजे विकासकामांपेक्षा आरोप, संताप आणि भ्रष्टाचाराच्या चर्चेनेच जास्त गाजली. आता या गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण वाईकरांचे लक्ष लागले आहे.

4) भुईंज:-“खाकीतील माणुसकीचा पुन्हा प्रत्यय! भुईंज पोलिसांच्या तत्परतेने हरवलेली मौल्यवान बॅग काही मिनिटांत मालकाच्या हाती”

सातारा | भुईंज, दि. ३० :
“पोलीस म्हणजे फक्त कायद्याची अंमलबजावणी नव्हे, तर संकटात धावून येणारा खरा आधार!” याचा प्रत्यय भुईंज पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा दिला. कोल्हापूरहून मुंबईकडे दुचाकीवरून प्रवास करत असताना तरुणाची लाखमोलाची कागदपत्रे आणि HP कंपनीचा लॅपटॉप असलेली बॅग रस्त्यात पडली. मात्र भुईंज पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता शोधमोहीम राबवून ती बॅग सुरक्षितपणे मालकाच्या ताब्यात दिली.
कागल (जि. कोल्हापूर) येथील प्रथमेश संजयकुमार घोरपडे (वय २७) हे २९ जून रोजी सकाळी कोल्हापूरहून मुंबईकडे जात असताना आनेवाडी टोलनाक्याजवळ त्यांच्या पाठीवरील बॅग रस्त्यात पडली. बॅगमध्ये HP कंपनीचा लॅपटॉप, पाकीट, वाहन परवाना, आर.सी. बुक, बँकेची ATM कार्डे तसेच इतर महत्त्वाची मूळ कागदपत्रे होती.
घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सुशांत धुमाळ यांनी तत्काळ हालचाली करत शोधमोहीम सुरू केली. अल्पावधीतच बॅग आणि त्यातील सर्व साहित्य सुरक्षित अवस्थेत शोधून काढत ते प्रथमेश घोरपडे यांच्या ताब्यात सुपूर्द केले.
या कामगिरीमुळे मोठा आर्थिक व मानसिक फटका बसण्यापासून प्रथमेश घोरपडे यांची सुटका झाली. त्यांनी भुईंज पोलिसांचे मनापासून आभार मानत त्यांच्या तत्परतेचे आणि प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
ही कारवाई भुईंज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एपीआय पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे व पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस नाईक सुशांत धुमाळ यांच्यासह चव्हाण, पवार, निंबाळकर, कुंभार, भोसले, कदम आणि पोळ-कदम या पोलीस कर्मचाऱ्यांनीही मोलाची भूमिका बजावली.

सकारात्मक काम करणाऱ्या पोलिसांचाही गौरव व्हायलाच हवा. भुईंज पोलिसांनी दाखवलेली तत्परता, प्रामाणिकपणा आणि नागरिकांप्रती असलेली संवेदनशीलता ही खाकी वर्दीवरील विश्वास अधिक दृढ करणारी ठरली आहे.

5) वाई:-वटपौर्णिमेची अनोखी भेट! महिलांच्या हस्ते ‘हरित मोहिमे’चा श्रीगणेशा; वाईत ३५०० वृक्ष लागवडीचा संकल्प.

सातारा | वाई, दि. ३० : वटपौर्णिमेच्या पवित्र दिवशी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सार्वजनिक बांधकाम विभागाने वाई तालुक्यातील चांदक येथे स्थानिक महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करून ‘हरित मोहिमे’चा शुभारंभ केला. चालू वर्षात तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कडेला तब्बल ३५०० वृक्षांची लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प विभागाने हाती घेतला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे आणि उपअभियंता महेश गोंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. भारतीय संस्कृतीत वृक्षांना पूजनीय स्थान असलेल्या वटपौर्णिमेच्या दिवशीच या मोहिमेची सुरुवात करून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
यावेळी कनिष्ठ अभियंता संजय सैदाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी, स्थानिक महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या उपक्रमाचे वाई तालुक्यात सर्व स्तरांतून स्वागत होत असून, लावण्यात येणाऱ्या झाडांचे संगोपनही नियोजनबद्ध पद्धतीने केले जाणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
“निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि रस्त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी हा वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. वाई उपविभागाच्या कार्यक्षेत्रातील विविध रस्त्यांच्या कडेला येत्या जुलैअखेरपर्यंत सर्व ३५०० झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.”
– महेश गोंजारी, उपअभियंता, वाई उपविभाग

6) रहिमतपूर:-“साताऱ्याच्या साहित्यविश्वाला मोठा मान! वेळूचे कवी विक्रम शिंदे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीसपदी”.

सातारा | रहिमतपूर, दि. ३० :
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. वेळू (रहिमतपूर) येथील ज्येष्ठ कवी, लेखक आणि साहित्यसेवक विक्रम मालन आप्पासो शिंदे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीसपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी अधिकृतपणे ही घोषणा केली.
या निवडीमुळे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून विक्रम शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी यावेळी सांगितले की, “मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या लेखक-कवींना नेतृत्वाची संधी मिळणे आवश्यक आहे. युवा साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विक्रम शिंदे यांचे योगदान महत्त्वाचे असून त्यांच्या नेतृत्वामुळे परिषदेच्या कार्याला महाराष्ट्रात नवी दिशा मिळेल.”
या प्रसंगी उपाध्यक्षा शुभांगी काळभोर, महाराष्ट्र प्रदेश संघटक अमोल कुंभार, पुणे जिल्हाध्यक्ष रमेश रेडेकर आणि पश्चिम महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष ॲड. सुमेध गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन शिंदे यांचा सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कवी विक्रम शिंदे यांनी आपल्या प्रभावी लेखणीतून कष्टकरी, कामगार आणि सामान्य माणसाच्या भावना साहित्याच्या माध्यमातून मांडल्या आहेत. त्यांचे ‘श्वास ओला’, ‘अस्वस्थ’, ‘ज्ञानज्योत’ आणि ‘अक्षरदीप’ हे साहित्यसंग्रह वाचकांच्या पसंतीस उतरले आहेत.
साहित्य लेखनाबरोबरच त्यांनी अनेक साहित्य संमेलने, प्रकाशन उपक्रम आणि नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे मोठे कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात ४० हून अधिक साहित्य व प्रकाशन संस्था उभ्या राहिल्या असून, शेकडो नवोदित साहित्यिक घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

7) कराड:-“रोजगार शोधू नका, रोजगार द्या!” रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या ‘स्टार्ट-अप कट्टा’त उद्योजकतेचा नवा मंत्र; मान्यवरांचा व्यावसायिक गौरव.

कराड | प्रतिनिधी
कराड, दि. ३० : रोटरी क्लब ऑफ मलकापूर (ता. कराड) यांच्या वतीने आयोजित ‘स्टार्ट-अप कट्टा’ आणि व्यावसायिक गौरव पुरस्कार सोहळा २०२५-२६ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. वेणूताई चव्हाण सभागृह, शिवाजी स्टेडियमसमोर झालेल्या या कार्यक्रमाला उद्योजक, शेतकरी, युवक, महिला बचत गट, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील होते. त्यांनी युवकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत स्वावलंबी बनण्याचे आणि “रोजगार शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक बना,” असा प्रेरणादायी संदेश दिला.
प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा उद्योग केंद्र, सातारा येथील उद्योग निरीक्षक धनाजी गुजर यांनी उद्योग उभारणीसाठी उपलब्ध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी PMFME योजनेसह कृषीपूरक उद्योगांच्या संधी उलगडून सांगितल्या, तर कर सल्लागार विकास पाटील यांनी ‘स्टार्ट-अप – स्वप्न ते वास्तव’ या विषयावर मार्गदर्शन करत यशस्वी उद्योजकतेसाठी नियोजन, धैर्य आणि सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी मलकापूर रोटरी अवॉर्ड २०२५-२६ प्रदान करून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कला क्षेत्रात वासू पाटील, शेती क्षेत्रात स्वप्नील पाटील, उद्योग क्षेत्रात मनोज पाटील आणि सामाजिक क्षेत्रात संदीप फुके यांना सन्मानचिन्ह, मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. पुरस्कारार्थींचा उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात गौरव केला.
कार्यक्रमात नवउद्योजकांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शासकीय अनुदान व कर्ज योजनांची माहिती, कृषी आधारित उद्योगांच्या संधी आणि व्यवसाय वृद्धीसाठी उपयुक्त मार्गदर्शन देण्यात आले. त्यामुळे युवक आणि स्टार्ट-अप सुरू करण्याची इच्छा असलेल्या नवउद्योजकांना या उपक्रमाचा मोठा लाभ झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप संकपाळ, आमले सर आणि उमेश यादव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ मलकापूरचे अध्यक्ष राहुल जामदार, सचिव विजय दुर्गावळे, व्होकेशनल डायरेक्टर विकास थोरात, पब्लिक इमेज डायरेक्टर विलासराव पवार तसेच सर्व रोटरी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button