सातारा:-शेतकऱ्यांना महायुती सरकारचा मोठा दिलासा; अवकाळीग्रस्तांसाठी ₹३३४.९८ कोटींची मदत मंजूर.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सातारा:-शेतकऱ्यांना महायुती सरकारचा मोठा दिलासा; अवकाळीग्रस्तांसाठी ₹३३४.९८ कोटींची मदत मंजूर.

सातारा | प्रतिनिधी
राज्यातील अवकाळी पाऊस व नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने ₹३३४ कोटी ९८ लाखांच्या मदतीला मंजुरी दिली आहे. मदत व पुनर्वसन विभागामार्फत हा निधी मंजूर करण्यात आला असून, विशेषतः कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सातारा येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री पाटील म्हणाले की, पंचनामे व प्रस्ताव प्राप्त होताच सरकारने अवघ्या एका दिवसात निधी मंजूर केला असून, त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणार आहे. मंजूर झालेल्या निधीपैकी ₹२०९ कोटींची तरतूद कोकणातील आंबा व काजू उत्पादकांसाठी करण्यात आली आहे.
यावेळी त्यांनी सांगितले की, महायुती सरकारने यापूर्वीच्या सरकारच्या काळातील सुमारे ₹५ हजार कोटींची थकीत मदत वितरित केली आहे. तसेच, गेल्या वर्षी मे महिन्यापासून अवकाळी पाऊस व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या राज्यातील सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹१६ हजार ५०० कोटींची मदत थेट जमा करण्यात आली आहे.
दरम्यान, यंदा **’अल निनो’**च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांसोबत आढावा बैठका घेऊन आवश्यक उपाययोजनांच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार असून, शेतीला पुन्हा उभारी देण्यासाठी ही मदत महत्त्वाची ठरणार असल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रवादीत ‘ऑपरेशन टायगर’ची शक्यता फेटाळली
पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘ऑपरेशन टायगर’सारखी परिस्थिती आहे का, असा प्रश्न विचारला असता मंत्री मकरंद पाटील यांनी तो स्पष्टपणे फेटाळला. “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी कोणतीही परिस्थिती नाही. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. आमच्या पक्षात असे होऊच शकत नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
2) वाई:-सद्रक्षणाय’ची खरी प्रचिती! खड्डा बुजवण्यासाठी ट्रॅफिक पोलिसाचा पुढाकार.

निकृष्ट रस्ते कामामुळे नागरिक संतप्त; ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी.
महाबळेश्वर–पाचगणी या प्रमुख पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या सुरूर–पोलादपूर महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून, कोट्यवधी रुपये खर्चूनही रस्ता खड्डेमयच राहिल्याने वाहनचालक आणि पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांनी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
रस्त्यावरील वाढत्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्याने वाई वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार गोरखनाथ दाभाडे यांनी स्वतः फावडे हाती घेत खडी टाकून धोकादायक खड्डा बुजवला. वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांनाच रस्त्याची डागडुजी करावी लागणे, ही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदारासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
गांधी पेट्रोल पंप परिसरात सुरू असलेल्या रस्ते कामाबाबतही नागरिकांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप होत असून, कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणावर एकाही लोकप्रतिनिधीने ठोस भूमिका न घेतल्याने नागरिकांचा संताप आणखी वाढला आहे.
प्रसारमाध्यमांनी वारंवार या रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करूनही संबंधित ठेकेदारावर कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही. त्यामुळे “या ठेकेदाराच्या पाठीशी नेमका कोणाचा वरदहस्त आहे?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. संपूर्ण कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
गेल्या वर्षी रस्ते कामादरम्यान उडालेल्या धुळीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत कोणतीही ठोस सुधारणा झालेली नसल्याचे चित्र आहे.
महाबळेश्वर–पाचगणीकडे जाणारे अनेक पर्यटक या रस्त्याची दुरवस्था पाहून पर्यायी मार्गांचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायावरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीदवाक्याला साजेसा आदर्श ठेवत अपघात टाळण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरून खड्डा बुजवणारे वाहतूक पोलीस हवालदार गोरखनाथ दाभाडे यांच्या कर्तव्यदक्षतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मात्र, रस्ते दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या यंत्रणा निष्क्रिय राहाव्यात आणि पोलिसांना ही जबाबदारी पार पाडावी लागावी, ही अत्यंत गंभीर बाब असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, संबंधित ठेकेदाराच्या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, संपूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीने पुन्हा बांधावा आणि या कामासाठी जबाबदार अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करावी, अशी जोरदार मागणी वाई शहरासह संपूर्ण तालुक्यातून होत आहे.
3) वाई:-पश्चिम भागातील रस्त्यांची दुरवस्था; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे अपघातांचा धोका वाढला.

गटारी तुंबल्या, रस्त्यांवर माती-वाळूचा थर, रिफ्लेक्टरविना स्पीड ब्रेकर; नागरिकांचा तीव्र संताप, जनआंदोलनाचा इशारा.
वाई | प्रतिनिधी
वाई, दि. २९ : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वाई तालुक्याच्या अतिदुर्गम पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गटारींची सफाई न होणे, साईड पट्ट्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण रखडणे, पाण्याच्या निचऱ्याची अपुरी व्यवस्था आणि रस्त्यांवरील सुरक्षाविषयक उपाययोजनांचा अभाव यामुळे अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
थोड्याशा पावसातही रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून डोंगर उतारावरील माती, वाळू व दगड थेट रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. पश्चिम भाग हा अतिवृष्टीसाठी ओळखला जात असतानाही यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही पूर्वतयारी केली नसल्याची टीका होत आहे.
सिद्धनाथवाडी ते एक्सर मार्गावर तब्बल १५ स्पीड ब्रेकर उभारण्यात आले आहेत. मात्र त्यावर पांढरे पट्टे, रिफ्लेक्टर किंवा इशारा फलक नसल्याने रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात वाहनचालकांना ते दिसत नाहीत. हे स्पीड ब्रेकर कोणत्या निकषांवर उभारण्यात आले, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
धोम परिसरातील चढ-उताराच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाळू व माती साचली असून मेणवली परिसरात गटारी तुंबल्या आहेत. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर झुकल्या असून त्यांची छाटणीही करण्यात आलेली नाही. संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, गेल्या दोन ते अडीच महिन्यांत पश्चिम भागातील विविध रस्त्यांवर झालेल्या अपघातांत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने संताप वाढला आहे. “अपघात होण्याची वाट पाहूनच विभाग जागा होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
निवडणुकीत आश्वासनांचा वर्षाव करणारे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याची टीकाही नागरिकांनी केली. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या साटेलोटेमुळे विकासकामांचा दर्जा घसरल्याचा आरोप करत, भविष्यात निष्काळजीपणामुळे जीवितहानी झाल्यास संबंधित अधिकारी व जबाबदार यंत्रणांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आसरे गावचे रहिवासी सागर सणस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ गटारींची सफाई, साईड पट्ट्यांची दुरुस्ती, रिफ्लेक्टर बसविणे, झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि रस्त्यावरील माती-वाळू हटविण्याची मोहीम हाती घ्यावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
तर धरणाच्या टोकावरील वासोळे गावचे राम दाणवले यांनी सांगितले की, पश्चिम भागातील अनेक युवक रोज रोजगारासाठी वाई शहर व एमआयडीसी परिसरात ये-जा करतात. मात्र अनेक ओढ्यांवरील पुलांना कठडे नाहीत, रिफ्लेक्टर नाहीत आणि रस्त्यालगतच्या गटारींची दुरवस्था आहे. “ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात येत नाही का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
4) वाई:-पहिल्याच पावसात मेणवलीतील नेहर ओढ्यावरील पुलाचे निकृष्ट बांधकाम उघडे.

रस्त्यावरून पाणी, अपघातांचा धोका वाढला!
रस्त्याची चुकीची उंची, गटारींचा अभाव, तीव्र वळण आणि झाडांमुळे दृष्टीआड रस्ता; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर नागरिकांचा संताप.
वाई | प्रतिनिधी
वाई दी. २९ :वाई तालुक्याच्या पश्चिम भागाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मेणवली येथील नेहर ओढ्यावरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे निकृष्ट नियोजन आणि दर्जाहीन काम पहिल्याच पावसात उघड झाले आहे. रस्त्याची चुकीची उंची, पाण्याच्या निचऱ्यासाठी आवश्यक गटारींचा अभाव आणि अपुऱ्या नियोजनामुळे ओढ्याचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत असून वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पूल बांधताना रस्त्याचे योग्य लेव्हलिंग करण्यात आले नाही. त्यामुळे पुलालगतचा रस्ता खोलगट झाला असून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे. दोन्ही बाजूंना निचऱ्याची व्यवस्था नसल्याने संपूर्ण पाणी रस्त्यावरून वाहत असून रस्ता जलमय होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
या मार्गावर आधीपासूनच तीव्र वळण असून पुलालगत वाढलेल्या झाडांमुळे समोरून येणारी वाहने वेळेत दिसत नाहीत. अशा परिस्थितीत रस्त्यावर वाहणारे पाणी आणि कमी झालेली दृश्यमानता यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, या परिसरात यापूर्वीही अनेक गंभीर अपघात झाले असून काहींना जीव गमवावा लागला आहे. तरीही संबंधित यंत्रणेकडून या धोकादायक ठिकाणाकडे आवश्यक ते गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पूर्वी येथे कमी उंचीचा पूल असल्यामुळे पावसाळ्यात ओढ्याचे पाणी पुलावरून वाहत असे आणि पश्चिम भागातील गावांचा संपर्क तुटत असे. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी नवीन पूल उभारण्यात आला. मात्र पुलाची उंची वाढवूनही रस्त्याचे योग्य लेव्हलिंग, पाण्याचा निचरा, संरक्षण भिंती आणि बाजूंचे मजबुतीकरण दर्जेदार पद्धतीने न केल्याने नागरिकांच्या अडचणी कायम असल्याचे चित्र आहे.
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेता या मार्गावरील वाहतुकीवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पुलाची पाहणी करून रस्त्याची उंची दुरुस्त करावी, पाण्याच्या निचऱ्यासाठी योग्य गटारी बांधाव्यात, संरक्षण भिंत उभारावी, खचलेले भाग दुरुस्त करावेत, झाडांची छाटणी करून इशारा फलक लावावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्वी संबंधित यंत्रणाच जबाबदार राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
5) ढेबेवाडी:-शाहू महाराजांच्या जयघोषाने ढेबेवाडी दुमदुमली; शाहू विद्यालयात जयंती उत्साहात साजरी.

ढेबेवाडी
कोयना एज्युकेशन सोसायटी संचलित राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, ढेबेवाडी येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, लेझीमचे सादरीकरण आणि ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय’च्या घोषणांनी संपूर्ण ढेबेवाडी परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयातून निघालेल्या भव्य मिरवणुकीने झाली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीम सादर करत ढोल-ताशांच्या तालावर आकर्षक संचलन केले. या मिरवणुकीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ढेबेवाडी खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक सचिन जाणूगडे यांच्या हस्ते गतवर्षी दहावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळवणारे विद्यार्थी, इयत्ता आठवीतील NMMS परीक्षेत पात्र ठरलेले १७ विद्यार्थी, सारथी शिष्यवृत्तीधारक, पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थी तसेच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना आकर्षक टिफिन बॉक्स देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आमिर डांगे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही शाहू महाराजांच्या कार्यावर प्रभावी मनोगते व्यक्त केली.
मुख्याध्यापक मोहन मोकाशी यांनी प्रास्ताविकात विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेत, वाढती पटसंख्या, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विभागातील शाळेची वाढती प्रतिष्ठा हीच शाहू महाराजांना खरी आदरांजली असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक महेश माने होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बळवंत पाटील, हिंदुराव पाटील, अजित मोहिते, प्रशांत घारगे, रविकुमार कांबळे, राजेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, संभाजी पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनिकेत कदम व मोडे यांनी आठ दिवस परिश्रम घेतले. झेंडे यांनी सूत्रसंचालन केले, तर लोहार यांनी रांगोळी व फलक लेखनातून कार्यक्रमाला आकर्षक स्वरूप दिले. भिंगारदेवे आणि शिकलगार यांनीही मोलाचे सहकार्य केले. आभारप्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका अनिता पाटील यांनी केले.
मुख्याध्यापक मोहन मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या जयंती सोहळ्याचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.
6) कराड:-आदर्श विद्यामंदिर, विंग येथे विद्यार्थ्यांसाठी लाखोंच्या शिष्यवृत्तीची घोषणा; गरजू विद्यार्थिनीचे संपूर्ण शैक्षणिक पालकत्व स्वीकारले.

कराड
कराड तालुक्यातील आदर्श विद्यामंदिर, विंग येथे शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रमाची घोषणा करण्यात आली. विंग गावचे रहिवासी स्वर्गीय अशोक काकासो माने यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव प्रसाद अशोक माने व नयन अशोक माने यांनी विद्यार्थ्यांसाठी लाखोंच्या प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजनेची घोषणा केली.
या उपक्रमांतर्गत दरवर्षी इयत्ता नववीतील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यास ₹११ हजार, द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यास ₹१० हजार, तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यास ₹९ हजार, तसेच गणित विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास ₹५ हजारांचे विशेष पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.
याशिवाय, शाळेतील गरजू विद्यार्थिनी कु. अनन्या बाळासो बडेकर हिचे इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे संपूर्ण शैक्षणिक पालकत्व प्रसाद माने व नयन माने यांनी स्वीकारले असून, तिच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलण्याचा संकल्प केला आहे. या निर्णयामुळे आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात खंड पडण्याची शक्यता दूर होऊन समाजासमोर सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण झाला आहे.
या उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल शाळेच्या वतीने प्रसाद माने यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुराव खबाले, सामाजिक कार्यकर्ते भागवतराव कणसे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संपतराव खबाले, माजी उपसरपंच सचिन पाचुपते, जनार्दन माने (एम.डी., कोयना सहकारी बँक, कराड), मुख्याध्यापक आर. टी. फकीर, उपमुख्याध्यापक सव्वा खांडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल प्रसाद माने व नयन माने यांचे शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद, कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.



