वाई:-“रस्ता नाही, मृत्यूचा सापळाच!” वाई पालिकेच्या निष्काळजीपणाने भाविकांची ट्रॅव्हलर गटारात; ९ जण थोडक्यात बचावले.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-“रस्ता नाही, मृत्यूचा सापळाच!” वाई पालिकेच्या निष्काळजीपणाने भाविकांची ट्रॅव्हलर गटारात; ९ जण थोडक्यात बचावले.

वाई, दि. २९ : वाई नगरपालिकेच्या हलगर्जी कारभारामुळे रविवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडता घडता टळली. स्वामी समर्थ मठाजवळील तिकाटणे येथे पाणी योजनेच्या व्हॉल्वच्या कामासाठी रस्ता खोदून ठेवण्यात आला होता. मात्र, त्या ठिकाणी ना इशारा फलक, ना बॅरिकेड, ना कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. परिणामी पुण्याहून मांढरदेव दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची टेम्पो ट्रॅव्हलर थेट गटारात कोसळून शेजारील घरावर आदळली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाहनातील ९ भाविकांचा जीव थोडक्यात बचावला.
सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडलेल्या या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. हा रस्ता वाई एमआयडीसीला जोडणारा प्रमुख मार्ग असल्याने येथे दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. तरीही खोदलेल्या खड्ड्याभोवती कोणतीही सुरक्षा उपाययोजना करण्यात आली नव्हती. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
अपघातानंतर क्रेनच्या मदतीने ट्रॅव्हलर बाहेर काढण्यात आली. वाहनाचे मोठे नुकसान झाले असून चालक व मालकावर आर्थिक भुर्दंड पडला आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, या ठिकाणी पाणी योजनेच्या व्हॉल्व दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार रस्ता खोदला जातो. “व्हॉल्व रस्त्याच्या कडेला हलवा,” अशी अनेकदा मागणी करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला. स्थानिक लोकप्रतिनिधीही या गंभीर प्रश्नाकडे डोळेझाक करत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
धक्कादायक बाब म्हणजे, अपघातानंतरही खड्डा तसाच उघडा असून कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी आणखी एखादी मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे.
“गाडी क्रेनने बाहेर काढली; पण खड्डा अजूनही तसाच आहे. आता तरी पालिकेला जाग येणार का, की एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासन हलणार?” असा संतप्त सवाल वाईकरांनी उपस्थित केला आहे. तातडीने खड्डा बुजवून संबंधितांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.




