भुईंज:-चेन्नई ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी भुईंज पोलिसांच्या जाळ्यात; आनेवाडी टोलनाक्यावर थरारक कारवाई!
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) भुईंज:-चेन्नई ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी भुईंज पोलिसांच्या जाळ्यात; आनेवाडी टोलनाक्यावर थरारक कारवाई!

“गोपनीय माहितीच्या आधारे सापळा; NDPS प्रकरणातील फरार आरोपी अखेर जेरबंद”
भुईंज, दि. २५ : तमिळनाडूतील चेन्नई येथे दाखल असलेल्या अंमली पदार्थ (ड्रग्स) प्रकरणातील मुख्य आरोपीला भुईंज पोलिसांनी आनेवाडी टोलनाक्यावर सापळा रचून अटक करत मोठी कामगिरी बजावली आहे. सातारा जिल्हा पोलिसांच्या सतर्कतेमुळे आंतरराज्य गुन्हेगारीविरोधातील लढ्यात आणखी एक महत्त्वाचे यश मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई येथील ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी कारमधून साताऱ्याकडून पुण्याकडे जात असल्याची गोपनीय माहिती भुईंज पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे भुईंज पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वाहतूक शाखेच्या पथकाने आनेवाडी टोलनाका येथे सापळा रचून संशयित वाहन अडविले.
वाहनाची तपासणी आणि चौकशी केली असता संबंधित व्यक्तीने आपले नाव शंमूगम श्रीनिवास (रा. गणपती नगर, चेन्नई, तमिळनाडू) असे सांगितले. त्याची पडताळणी केल्यानंतर तो चेन्नई येथील जी-1 विपेरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या NDPS कायद्याअंतर्गत गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पुढील तपासासाठी त्याला पोलीस निरीक्षक रविचंद्रन एम. व चेन्नई पोलिसांच्या पथकाच्या स्वाधीन करण्यात आले.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक निखिल इंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे तसेच पोलीस अंमलदार सुशांत धुमाळ, सोमनाथ बल्लाळ, अजित पवार आणि रोहन चव्हाण यांनी मोलाची भूमिका बजावली.
भुईंज पोलिसांच्या तत्परतेमुळे आंतरराज्य स्तरावरील फरार आरोपीला पकडण्यात यश आले असून, या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.
2) “ब्रेक फेल… समोर दरी! पाचगणी घाटात चालकाच्या प्रसंगावधानामुळे कुटुंबाचा थरारक बचाव”

सातारा |
पाचगणी दि. २४ : महाबळेश्वरहून पर्यटन करून तेलंगणाकडे परतणाऱ्या एका कुटुंबाच्या कारचे पाचगणी घाटात अचानक ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात झाला. मात्र चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि सर्वांनी सीट बेल्ट लावल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात महिला व लहान मूल किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तेलंगणा राज्यातील सैनिकपूर येथील रहिवासी सबूजित रॉय हे पत्नी व लहान मुलासह महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी आले होते. सोमवारी दुपारी परतीच्या प्रवासादरम्यान पाचगणी घाटातील बुवासाहेब मंदिराजवळ त्यांच्या कारचे अचानक ब्रेक निकामी झाले. घाटातील तीव्र उतार आणि धोकादायक वळणामुळे काही क्षणांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले.
समोरून येणाऱ्या वाहनांना धडकू नये आणि कार दरीत कोसळू नये म्हणून चालक सबूजित रॉय यांनी क्षणाचाही विलंब न करता गाडी उजव्या बाजूला वळवली. मात्र वेग आणि उतारामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्यालगतच्या डोंगरातील मोठ्या दगडांवर जाऊन आदळले. या धडकेत कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
अपघातावेळी कारमधील तिघांनीही सीट बेल्ट लावलेले होते. धडकेनंतर एअरबॅग्स तत्काळ उघडल्याने मोठी जीवितहानी टळली. स्थानिक नागरिक आणि इतर वाहनचालकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत कारमधील सर्वांना बाहेर काढले.
रॉय यांच्या पत्नी आणि मुलाला किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना तातडीने वाई येथील Belle Air Hospital येथे दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
या घटनेमुळे घाटरस्त्यावर प्रवास करण्यापूर्वी वाहनांची तांत्रिक तपासणी आणि सीट बेल्टचा वापर किती महत्त्वाचा आहे, याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे. चालकाच्या धाडस आणि प्रसंगावधानामुळे एकाच कुटुंबातील तिघांचे प्राण वाचल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
3) वाई:-शिरगाव येथे एकल महिला दिन उत्साहात साजरा.

वाई | प्रतिनिधी
मुक्काम पोस्ट शिरगाव, ता. वाई, जि. सातारा येथे दि. २१ जून रोजी एकल महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन एकल महिला समितीच्या वाई तालुका अध्यक्षा सारिका गवते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी ग्रामसखी सुरेखा भोसले व ॲड. रती पवार यांनी महिलांना मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, कौशल्य विकास, स्वयंरोजगाराच्या संधी तसेच कायदेशीर सल्ला व हक्कांविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमात नवचेतना उपक्रमाची माहिती देऊन एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.
महिलांच्या सन्मानार्थ आयोजित या कार्यक्रमाला कमल कांबळे, शीला घाडगे, विमल भोसले, सविता घाडगे, शुभांगी सुतार यांच्यासह परिसरातील सुमारे ५० महिला उपस्थित होत्या. उपस्थित महिलांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमामुळे एकल महिलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली असून त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीर सक्षमीकरणासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
4) वाई:-३२६ कोटींच्या सुरूर–पोलादपूर मार्गात ३४ कोटींचा ‘दलाली घोटाळा’?; रयतराज संघटनेची फॉरेन्सिक ऑडिट, ACB-SIT चौकशीची मागणी.

वाई, दि. २४ : सुरूर–वाई–पाचगणी–महाबळेश्वर–पोलादपूर या महत्त्वाच्या पर्यटन मार्गाच्या रुंदीकरण व काँक्रीटीकरण प्रकल्पावर गंभीर आरोपांची छाया पडली आहे. तब्बल ३२६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात ३४ कोटी रुपयांच्या कथित दलालीसह मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप रयतराज संघटनेने केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
रयतराज संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष संदीप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप करत प्रकल्पाची फॉरेन्सिक ऑडिट, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) आणि विशेष तपास पथक (SIT) मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
शिंदे यांनी सांगितले की, प्रकल्पाची कामे नियमबाह्य पद्धतीने करण्यात आली असून अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा संशय आहे. घाटरस्त्यावर वाढलेल्या अपघातांमागे याच निकृष्ट कामांचा संबंध असल्याचा दावा करत, काही अपघातांमध्ये तरुणांना जीव गमवावा लागल्याचे त्यांनी नमूद केले. या घटना म्हणजे “प्रशासकीय निष्काळजीपणातून घडलेली शोकांतिका” असल्याचा आरोपही त्यांनी केला.
याशिवाय, मुख्य कंत्राटदाराने उपकंत्राटे देताना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत प्रकल्पाशी संबंधित ५० हून अधिक बँक खात्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेत काही अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे, बदल्यांचे रॅकेट चालवणे तसेच राजकीय प्रभावाचा वापर करून यंत्रणा प्रभावित केल्याचेही गंभीर आरोप करण्यात आले. मात्र, या सर्व आरोपांबाबत संबंधित अधिकारी, कंत्राटदार किंवा संस्थांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
रयतराज संघटनेने रस्त्याच्या गुणवत्तेची खातरजमा करण्यासाठी ‘कोर टेस्ट’ आणि ‘क्यूब टेस्ट’ करण्याची मागणी केली आहे. दोषी आढळल्यास संबंधित कंत्राट रद्द करून संबंधित कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे, अशीही मागणी करण्यात आली.
दरम्यान, कोट्यवधी रुपयांच्या या प्रकल्पावर झालेले गंभीर आरोप, तसेच घाटातील अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि तपास यंत्रणा कोणती भूमिका घेतात, याकडे आता सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
5) वाई:-जोर गावात सर्वोदय सेवा ट्रस्टकडून १५० केसर आंबा रोपांचे मोफत वाटप.

‘घर तेथे झाड’ उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पर्यावरण संवर्धनासह समाजसेवेचा संदेश.
सातारा | वाई, दि. २५ :
वाई तालुक्यातील ‘मिनी काश्मीर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पश्चिम भागातील दुर्गम जोर गावात सर्वोदय सेवा ट्रस्टच्या वतीने ‘घर तेथे झाड’ या उपक्रमांतर्गत १५० केसर आंबा रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाबरोबरच ग्रामीण कुटुंबांना फळझाडांचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संजय जेधे-देशमुख यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना जोर गावातील लोकांच्या साधेपणा, प्रेमळ स्वभाव आणि माणुसकीचे विशेष कौतुक केले. “आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगातही जोर गावातील लोकांमध्ये जिव्हाळा, प्रेम आणि परस्परांबद्दलचा आदर जिवंत आहे. हीच खरी संपत्ती आहे,” असे ते म्हणाले. तसेच ग्रामस्थांनी निर्व्यसनी राहून आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्यावे, यासाठी सर्वोदय सेवा ट्रस्ट कायम सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रकाश वाडकर यांनी संस्थेच्या शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सचिव संतोष वाडकर, संचालक आनंद गायकवाड, गोळेवाडीचे माजी सरपंच सुनील गोळे, दहयाटचे माजी सरपंच व संचालक शिवाजी धनावडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान जोर गावचे सरपंच नारायण सपकाळ यांच्या हस्ते केसर आंबा रोपांचे प्रतीकात्मक रोपण करण्यात आले. त्यानंतर ट्रस्टच्या सुमारे ३० सदस्यांनी परिसरातील निसर्गरम्य जंगल सफारीचा आनंद घेत रानमेव्याचाही आस्वाद घेतला.
“झाडे वाटली, माणुसकीची बीजेही रुजवली” अशी भावना या उपक्रमातून व्यक्त झाली. केवळ रोपांचे वाटप न करता पर्यावरण संरक्षण, सामाजिक बांधिलकी आणि दुर्गम भागातील ग्रामस्थांशी स्नेहाचे नाते दृढ करण्याचा संदेश सर्वोदय सेवा ट्रस्टने दिला.
या उपक्रमाला ट्रस्टचे खजिनदार ज्ञानदेव वाशिवले, संचालक किशोर महागडे, नितीन शिंदे, विजय वाडकर, मारुती फणसे, बापू फणसे, अशोक मराठे, पत्रकार पी. एस. भिलारे, रामदास राऊत, नवीन कांबळे, राजेंद्र महागडे, माणिक बनसोडे, दत्ता मांढरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
6) वाई:-कर्तव्यनिष्ठ शिक्षिका शालिनी कांबळे यांना भावपूर्ण निरोप; चार दशकांच्या शैक्षणिक सेवेचा गौरव.

सातारा | वाई, दि. २५ : जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक केंद्रशाळा, कवठे येथील वरिष्ठ मुख्याध्यापिका शालिनी संपत कांबळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित गौरव व कृतज्ञता समारंभ भावनिक वातावरणात उत्साहात पार पडला. तब्बल चार दशकांच्या समर्पित शैक्षणिक सेवेला मानवंदना देण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप बाबर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य हर्षदा फरांदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रास्ताविकात शिक्षक जितेंद्र चव्हाण यांनी कांबळे मॅडम यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
अध्यक्षीय भाषणात दिलीप बाबर यांनी, “शिक्षक हा समाजपरिवर्तनाचा केंद्रबिंदू असतो. शालिनी कांबळे यांनी विद्यार्थीकेंद्री शिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता आणि संस्कारमूल्यांची जोपासना करत आदर्श शिक्षिकेची भूमिका यशस्वीपणे पार पाडली,” असे गौरवोद्गार काढले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वृषसेन पोळ, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर वेंदे, गजानन वारागडे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तानाजी खंडागळे, कांतीलाल पवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अभिमन्यू पवार, ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षक सुरेशजी शिंगटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
समारंभात शालिनी कांबळे व त्यांचे पती संपत कांबळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व विद्यार्थीहिताच्या कार्याचा विशेष गौरव केला.
आपल्या सेवाकाळात शालिनी कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, संस्कार, मूल्यशिक्षण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी शाळेची शैक्षणिक उंची वाढवली. त्यांच्या नेतृत्वामुळे कवठे येथील शाळेला परिसरात विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव कोदे व शिवाजी पवार यांनी केले. शेवटी उपस्थितांनी शालिनी कांबळे यांना निरोगी, आनंदी व समाधानमय आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
“सेवानिवृत्ती हा सेवाप्रवासाचा शेवट नसून नव्या सामाजिक योगदानाची सुरुवात आहे. शालिनी कांबळे यांचा अनुभव आणि मार्गदर्शन समाजाला पुढेही लाभत राहील,” अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
7) “स्मार्ट मीटरला वाईकरांचा ठाम विरोध; महावितरणाला लेखी इशारा”

“परवानगीशिवाय मीटर बदलल्यास MERC, ग्राहक मंच आणि पोलिसांकडे धाव घेणार”
वाई :
वाई शहरात महावितरणच्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला आता नागरिकांकडून विरोध होऊ लागला आहे. वाई येथील रहिवासी तथा ग्राहक संरक्षण परिषद, सातारा जिल्ह्याचे सदस्य दादासाहेब तुकाराम काळे यांनी महावितरण प्रशासनाला लेखी निवेदन देत स्मार्ट मीटर बसविण्यास स्पष्ट नकार दर्शविला आहे.
महावितरणकडून १३ जून २०२६ रोजी एसएमएसद्वारे ४८ तासांची पूर्वसूचना देण्यात आली होती. मात्र ही प्रक्रिया नियमबाह्य व ग्राहकांच्या अधिकारांचे उल्लंघन करणारी असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.
आपल्या निवेदनात त्यांनी केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अधिसूचनेचा संदर्भ देत ती केवळ धोरणात्मक स्वरूपाची असून ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती करण्याचा अधिकार देत नसल्याचा दावा केला आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेचा उल्लेख करत ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविणे योग्य नसल्याचे नमूद केले आहे.
काळे यांनी सध्या कार्यरत असलेले पारंपरिक वीजमीटर बीआयएस प्रमाणित असून ते व्यवस्थित कार्यरत असल्याने त्यांची अदलाबदल करण्याची गरज नसल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) वीज पुरवठा संहितेनुसार मीटर बदलण्यासाठी किमान १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना आवश्यक असताना केवळ एसएमएसद्वारे ४८ तासांची नोटीस देणे ग्राह्य धरता येणार नाही, असा आक्षेपही त्यांनी घेतला आहे.
देशातील विविध भागांत स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिलांच्या तक्रारी समोर आल्याचा दावा करत या योजनेमुळे ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आपल्या लेखी परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC), ग्राहक तक्रार निवारण मंच तसेच संबंधित पोलिस ठाण्याकडे तक्रार दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा काळे यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे.
या निवेदनानंतर वाई शहरात स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून महावितरण प्रशासन यावर कोणती भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
8) खंडाळा तालुक्याला विकासाची मोठी भेट! भोर-अतीत-खंडाळा-लोणंद रस्त्यास ३५२ कोटींची मंजुरी.

खंडाळा |
खंडाळा तालुक्याच्या विकासाला नवी गती देणाऱ्या भोर-अतीत-खंडाळा-लोणंद रस्त्याच्या रुंदीकरण व विकास प्रकल्पाला तब्बल ३५२ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. राज्य शासनाने प्रजिमा-३ अंतर्गत कि.मी. ०/००० ते ४३/७५० या टप्प्यातील कामास हिरवा कंदील दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत सुमारे ४३ किलोमीटर लांबीचा रस्ता १० मीटर रुंद करण्यात येणार असून, त्यामुळे वाहतूक अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुलभ होणार आहे. पुणे, सातारा तसेच ग्रामीण भागाला जोडणाऱ्या या मार्गामुळे व्यापार, उद्योग, पर्यटन आणि शेतीमाल वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे.
रस्त्याच्या विकासामुळे खंडाळा तालुक्यातील नागरिकांचा प्रवासाचा वेळ कमी होणार असून अपघातांचे प्रमाणही घटण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच स्थानिक आर्थिक घडामोडींना वेग मिळून रोजगार आणि विकासाच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
या प्रकल्पासाठी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले जात असून, त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा महत्त्वाचा प्रकल्प मंजुरीपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळत आहे.
स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत काम तातडीने सुरू करून वेळेत पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
“भोर-अतीत-खंडाळा-लोणंद रस्ता प्रकल्प हा खंडाळा तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय ठरणार असून, परिसराच्या आर्थिक प्रगतीसाठी हा खऱ्या अर्थाने विकासाचा महामार्ग ठरेल,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
9) एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषदेचा मोठा पुढाकार; १.५७ लाख महिलांच्या उन्नतीसाठी प्रशासन सज्ज!

सातारा | दि. २५
जिल्ह्यातील एकल महिलांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी जिल्हा परिषदेकडील विविध शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्याचा निर्धार करण्यात आला असून, यासाठी जिल्हा परिषद पूर्णतः कटीबद्ध असल्याची ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात ‘एकल महिला दिन’ निमित्त आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी संतोष पाटील, याशनी नागराजन, प्रियदर्शनी वाघमारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. प्रिया शिंदे यांनी सांगितले की, ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात बचत गटांचे मजबूत जाळे निर्माण झाले असून, एकल महिलांना या बचत गटांशी जोडून आर्थिक स्वावलंबनाकडे नेण्याचे काम सुरू आहे. तसेच महिला शेतकरी गटांना जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी माहिती दिली की, मिशन वात्सल्य अंतर्गत नोव्हेंबर २०२५ पासून सुरू असलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात तब्बल १ लाख ५७ हजार एकल महिला आढळून आल्या आहेत. या महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ, आवश्यक दाखले व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सक्रियपणे कार्यरत आहे. एकल महिला शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र काढावे तसेच मालमत्ता नोंदींमध्ये नाव नसलेल्या महिलांची नावे प्रॉपर्टी कार्डवर समाविष्ट करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी ‘विधवा’ या शब्दाऐवजी ‘एकल महिला’ असा सन्मानजनक उल्लेख करण्याचे आवाहन केले. तसेच जिल्हा परिषदेच्या विविध योजनांमधून एकल महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेत ‘एकल महिलांचा सन्मान, स्वावलंबन आणि हक्कांसाठी प्रशासनाचा पुढाकार’ हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. यावेळी शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना, बालसंगोपन योजना आदी विविध योजनांचा लाभ प्रातिनिधिक स्वरूपात एकल महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
जिल्ह्यातील हजारो एकल महिलांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडलेला हा कार्यक्रम महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि आशादायी पाऊल ठरला.




