आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-“मी नाही तर मग कोण?” — वाईत तुकाराम मुंढेंचा नैतिकतेवर थेट सवाल; महागणपती घाटावर वाई वसंत व्याख्यानमालेच्या सांगता समारंभात मुंढेंचे परखड भाष्य.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-“मी नाही तर मग कोण?” — वाईत तुकाराम मुंढेंचा नैतिकतेवर थेट सवाल;
महागणपती घाटावर वाई वसंत व्याख्यानमालेच्या सांगता समारंभात मुंढेंचे परखड भाष्य.

सातारा प्रतिनिधी |

वाई दि. २३ : “नैतिकता ही खुंटीला टांगून ठेवण्याची किंवा शोपीस म्हणून मिरवण्याची वस्तू नाही, तर ती दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याची गोष्ट आहे. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन नैतिक मूल्ये जपणारा माणूस मूर्ख नसून खऱ्या अर्थाने धैर्यवान असतो,” असे परखड प्रतिपादन धडाडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले.
वाई येथील ऐतिहासिक महागणपती घाट येथे आयोजित प्रसिद्ध ‘वाई वसंत व्याख्यानमाले’च्या ११० व्या पुष्पाचा सांगता समारंभ उत्साहात पार पडला. “समाज आणि नैतिकता : आजची वास्तवता” या विषयावर मुख्य वक्ते म्हणून बोलताना मुंढे यांनी समाजातील नैतिक अधःपतनावर थेट बोट ठेवले.
संत साहित्य आणि इतिहासातील उदाहरणे देताना त्यांनी सांगितले की, “संत तुकाराम महाराज यांनी केवळ नैतिकतेपोटी इंद्रायणी नदीत कर्जाची कागदपत्रे बुडवली. तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने परत पाठवत सैन्यासाठी स्त्रियांविषयी आदर्श आचारसंहिता निर्माण केली. हिंदवी स्वराज्य म्हणजे सर्व धर्म आणि स्त्री-पुरुष समान मानणारे राज्य होते.”
आजच्या समाजातील उदासीनतेवर टीका करताना त्यांनी सांगितले की, “अपघात झाल्यावर मदत करण्याऐवजी लोक व्हिडिओ काढण्यात धन्यता मानतात. प्रत्येक जण जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतो. पण ‘मी नाही तर मग कोण?’ हा विचार प्रत्येकाने स्वीकारला, तर भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. प्रगती म्हणजे केवळ इमारतींची उंची वाढणे नव्हे, तर माणसाच्या नैतिकतेची उंची वाढणे होय.”
प्रशासनातील निर्णय प्रक्रियेविषयी बोलताना त्यांनी सांगितले, “मी कोणताही निर्णय घेताना स्वतःला तीन प्रश्न विचारतो — तो कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का? तो नैतिकदृष्ट्या योग्य आहे का? आणि त्याचा फायदा सर्वांना होणार आहे का? या तिन्ही प्रश्नांची उत्तरे ‘हो’ आली, तरच मी निर्णय घेतो.”
पंढरपूर मंदिर २४ तास खुले ठेवण्याच्या निर्णयाचा उल्लेख करत त्यांनी सार्वजनिक सेवेतून कधीही निवृत्त होणार नसल्याची ग्वाही दिली. तसेच आईच्या निधनानंतर कोणतेही कर्मकांड न करता तिच्या अस्थींवर झाड लावून पर्यावरणपूरक संदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. चिंतामणी केळकर होते. कार्यक्रमाची सुरुवात अनुराधा कोल्हापुरे यांच्या प्रास्ताविकाने झाली, तर तनुजा इनामदार यांनी मुख्य वक्त्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन आदित्य चौंडे यांनी केले आणि भद्रेश भाटे यांनी आभार मानले.
या ऐतिहासिक सांगता समारंभासाठी वाईकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. महागणपती घाटावर हजारो श्रोत्यांची उपस्थिती होती. व्याख्यानानंतर अनेकांनी समाजातील नैतिकतेच्या प्रश्नांवर नव्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली.

2) वाईत ‘लघु-कुंभमेळ्या’वरून राजकीय रणकंदन! संविधानप्रेमींचा एल्गार; प्रशासनाला कायदेशीर इशारा.

सातारा प्रतिनिधी |
वाई दि. २३ : वाई शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘साधुसंत लघु-कुंभमेळ्या’वरून आता राजकीय आणि सामाजिक संघर्ष उफाळून आला असून, संविधानप्रेमी, पुरोगामी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या आयोजनाविरोधात थेट आंदोलनाची घोषणा करण्यात आली असून, आज दुपारी ४ वाजता वाईचे प्रांताधिकारी, तहसीलदार आणि नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना कायदेशीर निवेदन देत तीव्र निषेध नोंदवला जाणार आहे.
वाई नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष हे या ‘लघु-कुंभमेळ्या’चे मुख्य निमंत्रक असल्याने आंदोलनकर्त्यांनी गंभीर आक्षेप घेतला आहे. घटनात्मक पदावर असलेल्या लोकप्रतिनिधींनी धार्मिक सोहळ्याचे मुख्य निमंत्रक होणे, हा भारताच्या धर्मनिरपेक्ष संविधानावरील उघड आघात असल्याचा आरोप संविधानप्रेमींनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केला आहे. नगरपरिषदेसारख्या घटनात्मक संस्थेने अशा धार्मिक आयोजनात थेट सहभाग घेऊन समाजस्वास्थ्य बिघडवू नये, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
वाईला स्वामी केवलानंद सरस्वती, आचार्य विनोबा भावे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासारख्या समाजसुधारकांचा पुरोगामी वारसा लाभला असल्याची आठवण आंदोलनकर्त्यांनी करून दिली. सोमनाथ मंदिर सर्वधर्मीयांसाठी खुले करताना सनातनी प्रवृत्तींना याच भूमीने वैचारिक उत्तर दिले होते, असे नमूद करत आजची राजकीय मंडळी त्याच सनातनी परंपरेतील संन्याशांना वाईत आणून ‘लघु-कुंभमेळा’ भरवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हा प्रकार वाईच्या वैचारिक, सांस्कृतिक आणि पुरोगामी परंपरेला तिलांजली देणारा असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या आयोजनाचा निषेध करण्यासाठी कोटेश्वर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आणि सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड. असीम सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन सादर करण्यात येणार आहे.
या आंदोलनात विजय दिवाण, विजय मांढरे, विशाल सपकाळ यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि जागरूक नागरिक सहभागी होणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून निवेदनाच्या प्रती वाई पोलीस ठाण्यातही सादर करण्यात आल्या आहेत.
“वाईच्या महान पुरोगामी आणि वैचारिक परंपरेला धक्का देऊन समाजस्वास्थ्य बिघडवण्याचा हा प्रयत्न निषेधार्ह आहे. नगरपरिषदेने धार्मिक सोहळ्यांचे आयोजक बनणे संविधानाच्या चौकटीत बसत नाही,” अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्ते आणि संविधानप्रेमी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या आंदोलनानंतर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची पुढील भूमिका काय असणार, याकडे आता संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

3) वाई तालुक्यात परखंदीचा डंका! ‘मुख्यमंत्री पंचायत अभियानात’ प्रथम क्रमांक; गावाला २५ लाखांचे बक्षीस.

सातारा प्रतिनिधी |
वाई दि. २३ : ‘मुख्यमंत्री पंचायत अभियाना’त वाई तालुक्यातील परखंदी गावाने विकासाचा आदर्श घालत संपूर्ण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल परखंदी गावाला तब्बल २५ लाख रुपयांचे भव्य बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. गावाच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सातारा जिल्ह्याच्या विकास नकाशावर परखंदीचे नाव अभिमानाने झळकू लागले आहे.
वाई तालुक्यातील एकूण ९९ ग्रामपंचायतींमधून अंतिम २० ग्रामपंचायतींची निवड करण्यात येत होती. अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत परखंदी गावाने विविध विकासकामे, स्वच्छता, लोकसहभाग आणि सामाजिक सलोखा यांच्या जोरावर अव्वल स्थान मिळवले.
भवानी माता आणि काळभैरव नाथसाहेबांच्या कृपेने परखंदी गाव आज विकास, एकता आणि लोकसहभागाचे प्रेरणादायी मॉडेल ठरले आहे. गावाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे गावात विविध विकासकामे प्रभावीपणे राबवण्यात आली.
गावात राबवण्यात आलेली स्वच्छता मोहीम, पायाभूत सुविधा आणि सामाजिक बांधिलकी जपत केलेली कामे ही इतर गावांसाठी आदर्शवत ठरत आहेत. गावकऱ्यांच्या अथक परिश्रमांचे आणि लोकसहभागाचे हे मोठे यश मानले जात असून, परखंदी गावाच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

4) “बकरी ईद शांततेत साजरी करा; कायद्याचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही” — जिल्हाधिकारी संतोष पाटील.

सातारा |
सातारा दि. २३ : येत्या २८ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायद्याचे पालन करून सण शांततेत आणि सलोख्याने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले. जनावरांच्या कुर्बानीसाठी उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या कत्तलखान्यांसाठी कुरेशी समाजाने शहरी भागात नगरपालिकेकडे, तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडे आवश्यक परवानग्यांचे अर्ज करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
बकरी ईद निमित्त प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटीची बैठक शिवतेज हॉल येथे पार पडली. बैठकीस पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव, जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील अधिकारी उपस्थित होते.
तात्पुरत्या कत्तलखान्यांमध्ये आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना करत जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की, सर्व नगर पालिका व नगर पंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ अंतर्गत कत्तलखान्यांसाठी आवश्यक नियम व सुविधांची माहिती द्यावी.
वाहतूक अधिनियम १९७८ मधील नियम ४७ नुसार जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी नजीकच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयात आरोग्य तपासणी करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सहायक आयुक्त पशुसंवर्धन तसेच तालुका व जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालयांनी वाहतुकीसाठी आवश्यक प्रमाणपत्रे द्यावीत, असे निर्देश देण्यात आले.
ईद निमित्त उभारण्यात येणाऱ्या कत्तलखान्यांना प्रशासनाने आवश्यक सहकार्य करावे. तसेच कत्तल प्रक्रियेनंतर नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाने गायी, वासरे, वळू, बैल तसेच उत्पादक म्हशी व रेडे यांच्या कत्तलीस निर्बंध घालण्यासाठी महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ लागू केला असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी संबंधित विभागाला दिल्या.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button