खंडाळा तालुक्यावर अवकाळीचा कहर! कण्हेरीत ढगफुटीसदृश पाऊस; अतिटमध्ये वीज कोसळून गाय ठार.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

खंडाळा तालुक्यावर अवकाळीचा कहर! कण्हेरीत ढगफुटीसदृश पाऊस; अतिटमध्ये वीज कोसळून गाय ठार.

सातारा प्रतिनिधी |
खंडाळा दि. २३ : खंडाळा तालुक्यातील पश्चिम भागाला शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. जोरदार वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले. कण्हेरी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले, तर अतिट येथे वीज पडून एका शेतकऱ्याची गाय दगावल्याची दुर्दैवी घटना घडली.
दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात मोठा बदल झाला आणि काही क्षणांतच काळेकुट्ट ढगांनी संपूर्ण परिसर व्यापला. त्यानंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रौद्ररूप धारण केले. कण्हेरी परिसरात पावसाचा जोर इतका प्रचंड होता की गावांमधील रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहू लागले. अनेक ठिकाणी रस्त्यांना अक्षरशः ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते.
दरम्यान, विजांच्या प्रचंड कडकडाटामुळे अतिट येथील शेतकरी रामदास राजाराम जाधव यांच्या गाईच्या अंगावर अचानक वीज कोसळली. या घटनेत गाईचा जागीच मृत्यू झाला. ऐन सुगीच्या दिवसांत पाळीव जनावर गमावल्याने जाधव कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महिनाभराच्या असह्य उकाड्यानंतर या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू होती.
वादळी वाऱ्यामुळे काही घरांची छपरे उडून गेल्याने नागरिकांचेही आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून बाधित नागरिक आणि पीडित शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी आता खंडाळा तालुक्यातून होत आहे.




