आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारक्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कराड:-ऐन मे महिन्यात उंडाळे-घोगाव तलाव तुडुंब; वाकुर्डेच्या पाण्याने शेतकऱ्यांना जीवनदान!

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) ऐन मे महिन्यात उंडाळे-घोगाव तलाव तुडुंब; वाकुर्डेच्या पाण्याने शेतकऱ्यांना जीवनदान!

कराड प्रतिनिधी |
कराड दि. २३ : कराड दक्षिण मतदारसंघातील दिवंगत माजी मंत्री विलासराव पाटील यांच्या महत्त्वाकांक्षेतून साकार झालेल्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या वाकुर्डे उपसा सिंचन योजनेचे दुसरे आवर्तन नुकतेच टाळगाव-घोगाव लघुपाटबंधारे प्रकल्पातून सोडण्यात आले. आ. डॉ. अतुल भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे आणि कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून लाईट बिलाचा प्रश्न मार्गी लागल्याने वाकुर्डेचे पाणी सोडण्यात आले असून उंडाळे आणि घोगाव तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. ऐन मे महिन्यात तलाव तुडुंब भरल्याने परिसरातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवत असताना योग्य वेळी उपलब्ध झालेल्या या पाण्यामुळे शेतीला मोठा आधार मिळाला आहे. ऊस, भाजीपाला, फळबागा तसेच अन्य पिकांसाठी या पाण्याचा मोठा फायदा होणार असून उन्हाळी पिके वाचण्याची आशा निर्माण झाली आहे.
तलाव भरल्यामुळे केवळ शेतीच नव्हे तर ग्रामीण भागातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार आहे. तलावात मुबलक पाणी साठल्याने परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्त्रोतांवरही सकारात्मक परिणाम होणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
उंडाळे तलाव सध्या तुडुंब भरून वाहू लागला असून हे पाणी लवकरच वाठारपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे उंडाळे, ओंड, नांदगाव, काले परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढील एक महिना तरी सुटणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
“मे महिन्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत होती. मात्र योग्य वेळी तलावात पाणी आल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न सुटला आहे,” अशी प्रतिक्रिया शेतकरी अशोक वसंतराव पाटील यांनी व्यक्त केली.

2) कराड दक्षिणेत गौण खनिजाची ‘खुली लूट’; प्रशासनाच्या आशीर्वादानेच सुरू आहे का मुरूम माफियांचा काळाबाजार?

कराड प्रतिनिधी |
कराड दि. २३ : कराड तालुक्यातील डोंगरी भागात सध्या अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीचा काळाबाजार खुलेआम सुरू असून महसूल विभागाने याकडे सोयीस्कर डोळेझाक केल्याचा गंभीर आरोप नागरिकांतून होत आहे. येवती, सवादे आणि म्हासोली परिसरात दिवस-रात्र सुरू असलेल्या अवैध उत्खननामुळे “या संपूर्ण रॅकेटला नेमके कोणाचे संरक्षण आहे?” असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
रस्ते बांधकामाच्या नावाखाली मुरूम उत्खननाचा केवळ दिखावा केला जात असून प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची अन्यत्र वाहतूक होत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. येवती, सवादे आणि म्हासोली भागातील कथित ‘आण्णासाहेब’ आणि ‘रावसाहेब’ यांनी नेमकी किती अधिकृत परवानगी घेतली, किती रॉयल्टी भरली आणि कोणत्या अटींवर उत्खनन सुरू आहे, याबाबत स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने प्रशासन आणि जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नैसर्गिक ओढे-नाले अतिक्रमणाने गुदमरलेले असताना आणि काही ठिकाणी नदीपात्रात खाजगी विहिरी उभारल्या जात असतानाही महसूल प्रशासन कारवाई करत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “महसूल विभागातील भ्रष्टाचार उघड दिसत असतानाही तहसील कार्यालय शांत का?” असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी आणि अवैध व्यावसायिक यांच्यातील कथित संबंधांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या सुरू असलेल्या या अवैध उत्खननामुळे डोंगर परिसर अक्षरशः पोखरला गेला असून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. आगामी पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून दुर्घटना होण्याचा धोका निर्माण झाला आहे. राज्य शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असतानाही संबंधित विभाग मात्र निष्क्रिय असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येवती, म्हासोली, सवादे मार्गासह तुळसण, ओंड आणि जिंती परिसरातून दररोज ५० हून अधिक टिप्पर आणि ट्रॅक्टरद्वारे विनापरवाना मुरूम वाहतूक होत असल्याचा आरोप आहे. विचारणा केल्यास “ही खाजगी मालमत्ता असून मालकाच्या संमतीने उत्खनन सुरू आहे,” असे उत्तर देत महसूल विभाग प्रकरणावर पांघरूण घालत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे.
“कराड दक्षिणेतील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या ढिसाळ कारभारामुळेच या अवैध धंद्याला खतपाणी मिळत आहे. स्थानिक प्रशासन निष्क्रिय असल्याने सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून वैध-अवैध उत्खननाची प्रत्यक्ष पडताळणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी कराड दक्षिण परिसरातील नागरिकांनी केली आहे.

3) कृष्णा कारखाना निवडणुकीत येळगाव गटात ‘शेवाळे’ यांना संधी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

कराड प्रतिनिधी |
कराड दि. २२ : कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास परवापासून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर येळगाव जिल्हा परिषद गटातील संजय बाबुराव शेवाळे यांच्या पत्नी सुनीता संजय शेवाळे यांनी महिला राखीव प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले तसेच कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुरेश भोसले यांनी येळगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देत कार्यकर्ते आणि सभासदांना आनंददायी आश्चर्याचा धक्का दिला. या निर्णयामुळे परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अर्ज दाखल करताना कराड पंचायत समितीच्या सभापती नंदा यादव, रेठरे जिल्हा परिषद सदस्या प्रियांका साळुंखे, विंग जिल्हा परिषद सदस्या शैलेजा शिंदे, शेरे पंचायत समिती सदस्या वर्षा निकम यांच्यासह विभागातील प्रमुख शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उमेदवारीमुळे येळगाव जिल्हा परिषद गटात नवचैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्ते व नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच संपूर्ण येळगाव जिल्हा परिषद गटाच्या वतीने आमदार डॉ. अतुल भोसले आणि चेअरमन सुरेश भोसले यांचे आभार मानण्यात आले.

4) कराड वाहतूक शाखेविरोधातील आंदोलन चौथ्या दिवशीही पेटलेलेच; मंडप हटवल्याने वातावरण तापले.

कराड प्रतिनिधी |
कराड दि. २३ : कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेमध्ये होत असलेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात तसेच वारंवार होणाऱ्या ट्राफिक जाममुळे वाहन चालकांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ भीम आर्मी भारत एकता मिशनचे सातारा जिल्हाध्यक्ष जालिंदर वाघमारे यांनी सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेसमोर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
वाहतूक कर्मचाऱ्यांच्या ड्युटी वाटपाची माहिती, वाहतूक क्रेनद्वारे करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील तसेच वाहतूक शाखेच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
दरम्यान, आंदोलनासाठी उभारण्यात आलेला मंडप आणि स्टेज वाहतुकीस अडथळा ठरत असल्याची तक्रार वाहतूक नियंत्रण शाखेकडून नगरपालिकेकडे करण्यात आली होती. त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने आज संबंधित मंडप आणि स्टेज हटवण्याची कारवाई केली. मात्र, त्याच परिसरातील फळ विक्रेते आणि अन्य अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करून केवळ आंदोलनस्थळीच कारवाई केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
“रितसर परवानगी घेऊन आंदोलनासाठी मंडप उभारण्यात आला होता. तरीही आंदोलन मोडून काढण्याच्या उद्देशानेच ही कारवाई करण्यात आली,” असा आरोप आंदोलकांनी केला. मागण्यांवर चर्चा करून माहिती देण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.
मंडप हटवण्यात आल्यानंतरही आंदोलकांनी त्याच ठिकाणी आंदोलन सुरू ठेवले असून, प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

5) कराड:-युवक काँग्रेसकडून इंधन दरवाढीविरोधात मेलोडी चॉकलेट वाटप करीत अनोखे आंदोलन.

कराड प्रतिनिधी |
कराड दि. २३ : केंद्र सरकारकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपावर वाहनधारकांना मेलोडी चॉकलेट वाटप करत अनोखे आंदोलन करण्यात आले. “मेलोडी इतकी चॉकलेटी का आहे?” या लोकप्रिय वाक्याचा संदर्भ घेत इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात आलेली कडवट परिस्थिती अधोरेखित करण्याचा प्रयत्न आंदोलनातून करण्यात आला.
या आंदोलनामध्ये सत्त्वशीला पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस सातारा जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजित पाटील चिखलीकर, युवक काँग्रेस सातारा जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस अमित जाधव, तालुका अध्यक्ष देवदास माने, सातारा जिल्हा उपाध्यक्ष समीर इनामदार, जिल्हा उपाध्यक्ष उदय जाधव, पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, पंचायत समिती सदस्य रविंद्र बडेककर, कराड उत्तर अध्यक्ष प्रविण वेताळ, कराड दक्षिण अध्यक्ष चैतन्य पाटील, सातारा जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष दिग्विजय जमाले, कराड उत्तर उपाध्यक्ष शहानूर देसाई, जिल्हा सरचिटणीस उमर फारूक, कराड दक्षिण उपाध्यक्ष खालीद पटेल, पाटण तालुका सोशल मीडिया अध्यक्ष रविराज पाटील यांच्यासह शिवाजीराव जमाले, तुषार लोंढे, दीलावर मुल्लानी, गणेश भोसले, सुरेश मदने, राहुल भिसे, मुकुंद पाटील, विक्रम पाटील, डॉ. दत्ता मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या धोरणावर तीव्र टीका करण्यात आली. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण झाले असून सरकारने तातडीने इंधन दर कमी करावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button