सातारा:-साताऱ्याच्या ५३ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ₹५६९ कोटींची कर्जमाफी, ₹१,०६८ कोटींची वीज बिल माफी.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सातारा:-साताऱ्याच्या ५३ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ₹५६९ कोटींची कर्जमाफी, ₹१,०६८ कोटींची वीज बिल माफी.

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’चा लाभ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची घोषणा.
सातारा | प्रतिनिधी
राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील ५३ हजार ७३६ खातेदार शेतकऱ्यांचे ₹५६९ कोटींचे पीक कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
योजनेअंतर्गत कर्जमाफीची रक्कम डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी वीज पंपांची थकीत वीज बिले माफ करण्याच्या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना ₹१,०६८ कोटींचा लाभ मिळणार असल्याचेही मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, गटनेते अविनाश कदम आणि विकास गोसावी उपस्थित होते.
रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, राज्यभरातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ₹३६,५८५ कोटींच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यावेळी सरकारने पूर्वीच्या जाचक अटी शिथिल केल्या असून, ₹२ लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफी, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी असलेली अट आणि ₹५० हजार प्रोत्साहनपर लाभाची मर्यादा रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेवर नगरसेवकांनी बहिष्कार टाकल्याच्या चर्चेबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, सभेला २८ नगरसेवक उपस्थित होते. काही सदस्य वैयक्तिक कारणांमुळे अनुपस्थित होते. बहिष्काराचा दावा निराधार असून भाजपचे सर्व नगरसेवक विकासाच्या मुद्द्यावर एकसंघ आहेत.
नीट पेपरफुटी प्रकरणावर बोलताना रविंद्र चव्हाण यांनी विरोधकांवर टीका करत, दोषींवर फास्टट्रॅक न्यायालयात खटले चालविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले.
2) लोणंद:-कोर्टातील जमिनीच्या वादाचे पडसाद; तरुणी व भावावर जीवघेणा हल्ला.

सातारा | लोणंद, दि. २६ : न्यायालयात सुरू असलेल्या जमिनीच्या जुन्या वादातून तरुणी व तिच्या भावावर लोखंडी गज, दगड तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना तरडगाव हद्दीत घडली. या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबाळवाडी (ता. फलटण) येथील वैशाली शंकर कोकरे (वय ३२) या आपल्या लहान भाऊ नाथा रामदास येळे यांच्यासोबत दुचाकीवरून घरी जात होत्या. त्यावेळी तरडगाव हद्दीतील हॉटेल शिवारसमोर पाठीमागून कारमधून आलेल्या दत्तात्रय महादेव कोळेकर याने त्यांच्या दुचाकीला कट मारून अडवले.
जमिनीच्या जुन्या वादाचा तसेच न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाचा राग मनात धरून आरोपीने वैशाली कोकरे यांना शिवीगाळ करत लोखंडी गज व दगडाने मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या नाथा रामदास येळे यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार आहे.
या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार राहुल वाघ करीत आहेत.
3) खंडाळा:-खंबाटकी घाटात इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसची धडक; रस्ते कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू.

खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी सुरू असलेल्या कामादरम्यान एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंबाटकी घाटात रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक पत्रे बसविण्याचे काम सुरू होते. काम सुरू असल्याची सूचना देण्यासाठी रस्त्यावर सेफ्टी बोर्ड व सेफ्टी कोन लावण्यात आले होते. त्यावेळी पुण्याकडून घाट चढून येणारी एसटी महामंडळाची इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बस चालक कृष्णात विठ्ठल लांडगे (रा. वाशी नाका, कोल्हापूर) याने भरधाव वेगाने बस चालवत सेफ्टी कोन उडवले आणि रस्त्यावर काम करत असलेल्या सागर विष्णू जाधव (वय ३०, रा. गोवे, ता. व जि. सातारा) यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सागर जाधव यांच्यावर प्रथम सातारा, त्यानंतर फलटण आणि पुढे ससून रुग्णालय, पुणे येथे उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान २२ जुलै २०२६ रोजी सकाळी त्यांचे निधन झाले.
या घटनेप्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक संतोष सुभाष्री मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
4) कराड:-आषाढी एकादशी निमित्त याग सेवा संस्थेकडून भाविकांना फळवाटप.

सामाजिक सेवेचा अनोखा उपक्रम; संस्थापक सुभाष यादव यांचा विशेष सत्कार.
कराड | दि. २६ : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त याग सेवा संस्था, येरवळे यांच्या वतीने कोळे येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शाखेत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना फळांचे वाटप करण्यात आले. समाजसेवेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला भाविक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
याग सेवा संस्थेमार्फत सातत्याने विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविले जात असून, आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या फळवाटप उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. या उपक्रमातून समाजाप्रती सेवाभाव आणि मानवतेचा संदेश देण्यात आला.
यावेळी याग सेवा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाष यादव यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने त्यांचा लक्ष्मी-नारायणांची प्रतिमा भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी कांचन बहेन, वैष्णवी बहेन, सचिनभाई गुजर, शकुंतला भिसे, उषा काटवटे, वैजयंता माने, पारुबाई शिंगण, मायावती शिंगण, रघुनाथ निकम, आत्माराम शिंगण यांच्यासह मान्यवर व सेवाभावी कार्यकर्ते उपस्थित होते.
5) भुईंज:-स्व.अजितदादा पवारांना किसन वीर कारखान्यात भावपूर्ण अभिवादन; वृक्षारोपणातून जयंती साजरी.

सातारा | वाई, दि. २६ :
भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव केला. “निर्भीड नेतृत्व, दूरदृष्टी आणि सहकार, शिक्षण, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील भरीव योगदानामुळे अजितदादांनी राज्याच्या विकासात मोलाची भूमिका बजावली. पक्षीय राजकारणापेक्षा विकासकामांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. त्यांच्या कार्याचा ठसा कायम स्मरणात राहील,” असे ते म्हणाले.
किसन वीर व किसन वीर-खंडाळा सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक मदत करून उभारी देण्यात स्व. अजितदादा पवार यांचे मोठे योगदान असल्याचे सांगत, त्याचे श्रेय त्यांनाच जाते, असेही शिंदे यांनी नमूद केले. नामदार मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादांनी दाखविलेल्या आदर्शावर पुढील वाटचाल करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
जयंतीनिमित्त कारखाना परिसरात सप्तपर्णी व पिंपळ या वृक्षांचे रोपण करण्यात आले. कार्यक्रमास संचालक रामदास गाढवे, संजय कांबळे, प्रकाश धुरगुडे, आत्माराम सोनावणे, निवास शिंदे, पोपट जगताप, कांतीलाल पवार, राजेंद्र सोनावणे, नितीन निकम, शामराव गायकवाड, विजय शिंगटे, अमृत गोळे, प्रमोद वारागडे, रघुनाथ भोसले, राम पोळ, सर्जेराव पवार यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
6) शिरवळ:-भरधाव लक्झरी बसची ट्रकला भीषण धडक; १५ ते १६ प्रवासी जखमी, चालक ताब्यात.

सातारा | शिरवळ, दि. २६ : कागलहून साखरेची पोती भरून वाशी मार्केट (मुंबई) येथे जाणाऱ्या ट्रकला मागून भरधाव वेगाने आलेल्या ‘धनलक्ष्मी’ ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसने जोरदार धडक दिल्याने बसमधील १५ ते १६ प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये काहींची प्रकृती गंभीर असून, अनेकांना किरकोळ दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगातील बस थेट ट्रकवर जाऊन आदळली. धडकेचा जोर इतका होता की, झोपेत असलेले प्रवासी एकमेकांवर आदळल्याने त्यांना दुखापत झाली. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
अपघातानंतर बसचालक वैभव तात्याबा पवार (रा. पाटण) हा घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, शिरवळ पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून त्याला ताब्यात घेतले.
याप्रकरणी ट्रकचालक रमाकांत चुडामन यादव यांच्या फिर्यादीवरून शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ननवरे करीत आहेत.
7) खंडाळा:-ट्रान्सफार्मर फोडून तांब्याच्या तारांवर डल्ला; अजनुज-धावडवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ.

खंडाळा, दि. २६ : खंडाळा तालुक्यातील अजनुज व धावडवाडी (यादव वस्ती) येथे अज्ञात चोरट्यांनी दोन ट्रान्सफार्मर खाली पाडून फोडत त्यामधील सुमारे ४० हजार रुपये किमतीच्या ११ किलो तांब्याच्या तारांची चोरी केली. तसेच ट्रान्सफार्मरमधील १० हजार रुपयांचे ऑईल सांडवून नुकसान केल्याने एकूण ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार जॅक्सन लिमिटेड कंपनीतर्फे सातारा सर्कलमध्ये नवीन ट्रान्सफार्मर बसवून ते महावितरणकडे हस्तांतरित करण्याचे काम सुरू आहे. याच दरम्यान अजनुज व धावडवाडी येथील ट्रान्सफार्मर चोरट्यांनी लक्ष्य करत त्यांची तोडफोड केली. ट्रान्सफार्मरमधील तांब्याच्या तारांवर हात साफ करताना ऑईलही बाहेर सांडवून नुकसान करण्यात आले.
याप्रकरणी अवधेशकुमार इंद्रमोहन चौधरी (रा. बारामती, मूळ रा. मधबुनी, बिहार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खंडाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार चंद्रकांत ढापटे करीत आहेत.
8) लोणंद:-कापसे ढाब्यासमोर भरधाव दुचाकीची धडक; पती-पत्नी गंभीर जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा.

लोणंद, दि. २६ : लोणंद येथील कापसे ढाब्यासमोर भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या दुचाकीच्या धडकेत पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी संबंधित दुचाकी चालकाविरुद्ध लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणंद येथील कुमार आनंदराव चव्हाण हे आपल्या पत्नीसमवेत दुचाकीवरून जात असताना कापसे ढाब्यासमोर रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यावेळी मागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात कुमार चव्हाण यांच्या उजव्या पायाच्या नडगीचे हाड फ्रॅक्चर झाले असून त्यांच्या पत्नीलाही दुखापत झाली आहे. अपघातानंतर वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालविल्याप्रकरणी रोहित यशवंत धुमाळ (रा. सोनके, ता. कोरेगाव) याच्याविरुद्ध लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार रामचंद्र तांबे करीत आहेत.
9) कराड:-मलकापूरमध्ये बनावट सौंदर्यप्रसाधनांचा मोठा भंडाफोड; ३१.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा.

कराड, दि. २६ : अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मलकापूर येथील मे. राजलक्ष्मी टेलीकम्युनिकेशन या दुकानावर छापा टाकून बनावट सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रीचा मोठा भंडाफोड केला. या कारवाईत ३१ लाख ७८ हजार ८३५ रुपये किमतीचा संशयास्पद व प्रतिबंधित कॉस्मेटिक्सचा साठा जप्त करण्यात आला असून, दोन जणांविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, रेहमान शरिफ (रा. बेंगळुरू) व निखिल प्रमोद शाह (रा. मलकापूर, ता. कराड) यांनी संगनमत करून ‘नेचर्स कॉस्मेटिकल्स इंडिया’ या नामांकित कंपनीच्या नावाचा गैरवापर केला. बनावट सौंदर्यप्रसाधने तयार करून त्यावर खोटे लेबल लावण्यात आले आणि ती उत्पादने अस्सल असल्याचा भास निर्माण करून ग्राहकांना व बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक मनोज नंदकुमार अय्या यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ₹३१,७८,८३५ इतकी असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय भगवत गोडसे करत आहेत.
10) फलटण:-भरधाव दुचाकीची धडक; चारा घेऊन परतणारे वृद्ध गंभीर जखमी.

फलटण तालुक्यातील टाकळवाडा येथे भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीच्या धडकेत चारा घेऊन घरी परतणारे दुचाकीस्वार वृद्ध गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांच्या उजव्या पायाचा खुबा फ्रॅक्चर झाला असून त्यांच्यावर बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, निंबळक येथील बाळासो हरिभाऊ भोईटे (वय ६५) हे टाकळवाडा येथील शेतातून जनावरांसाठी चारा घेऊन आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात भोईटे गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी अपघातास कारणीभूत ठरलेल्या प्रीतम उर्फ शंभू दत्तात्रय जाधव (रा. गुणवरे) याच्याविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार सागर अभंग करत आहेत.
11) कराड:-विवाहितेचा छळप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध कराड शहर पोलिसांत गुन्हा.

सातारा | कराड, दि. २६ : कराड परिसरातील विरवडे येथील माहेरवाशीण व सध्या मिरज येथे वास्तव्यास असलेल्या ३१ वर्षीय विवाहितेला लग्नानंतर शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तिच्या पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, पती तोसिफ रज्जाक पटेल, सासू शाबनबी रज्जाक पटेल, सासरे रज्जाक दस्तगीर पटेल आणि नणंद आमीशा रज्जाक पटेल यांनी विवाहितेला वारंवार त्रास देत माहेरहून सोने व पैसे आणण्याची मागणी केली. तसेच, “तुला स्वयंपाक नीट येत नाही, तू आमच्या घरात राहण्याच्या लायकीची नाहीस,” असे म्हणत तिचा मानसिक छळ केला. याशिवाय, लाथाबुक्क्यांनी व बेल्टने मारहाण करून शारीरिक छळ केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सततच्या छळाला कंटाळून पीडित महिलेने कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पतीसह चार जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सपना साळुंखे करीत आहेत.
12) सातारा:-काशीळमध्ये भरधाव शिवशाही बसची पादचाऱ्याला धडक; रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकाचा जागीच मृत्यू.

सातारा दि. २६ : सातारा-कराड राष्ट्रीय महामार्गावरील काशीळ ग्रामीण रुग्णालयासमोर रस्ता ओलांडत असलेल्या पादचाऱ्याला भरधाव शिवशाही बसने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत सुधीर सदाशिव जाधव (वय ३९, रा. काशीळ) यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याकडून कराडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने सुधीर जाधव यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ते रस्त्याच्या दुभाजकाजवळ फेकले गेले. त्यांच्या डोक्याला व उजव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी बसचालक नितीन उद्धव मोरे (रा. सांगली, मूळ रा. बुलढाणा) याच्याविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कराळे करीत आहेत.
13) माण:-शासकीय कर्तव्यावर जाताना पोलीस पाटलाचा भीषण अपघातात मृत्यू; माण तालुक्यावर शोककळा.

माण तालुक्यातील मनकर्णवाडीचे पोलीस पाटील रमेश किसन गेंड (वय ४२) यांचा शासकीय कर्तव्यावर जात असताना झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी पळशीजवळ घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण माण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदार गणनेच्या शासकीय विशेष कामासाठी रमेश गेंड हे शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मोटारसायकलवरून मनकर्णवाडीहून पळशीकडे निघाले होते. पळशी हद्दीतील रस्त्यावर समोरून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांना म्हसवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी संबंधित दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
रमेश गेंड यांनी दीर्घकाळ पोलीस पाटील म्हणून प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा बजावली होती. मनमिळाऊ स्वभाव, कर्तव्यदक्षता आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना तत्परतेने धावून जाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे ते परिसरात लोकप्रिय होते. त्यांच्या अकाली निधनामुळे गेंड कुटुंबीयांसह मनकर्णवाडी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
म्हसवड ग्रामीण रुग्णालयात महसूल व पोलीस विभागातील अधिकारी, विविध गावांतील पोलीस पाटील, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत रमेश गेंड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
14) वाई:-सुरूरमध्ये तलवारीची दहशत मोडीत; एलसीबीच्या सापळ्यात मकश्या काळे जेरबंद.

सातारा | वाई, दि. २६ :
सुरूर (ता. वाई) येथे धावजी पाटील मंदिर परिसरात हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या संशयित मकश्या काळे याला सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने धाडसी कारवाई करत जेरबंद केले. गेल्या काही दिवसांपासून गावात वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना, या कारवाईमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मकश्या काळे हा मंदिर परिसरात तलवार फिरवत असल्याचे दिसून आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
यापूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी चोरीच्या घटना आणि वाढत्या दहशतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी पोलिसांनी तातडीने कारवाईचे आश्वासन दिले होते.
तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव यादव व त्यांच्या पथकाने बनवडी (ता. कोरेगाव) येथील चंदन-वंदन डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पारधी वस्तीवर सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला भुईंज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मकश्या काळे हा खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून सध्या जामिनावर बाहेर आहे. धावजी पाटील मंदिरासारख्या श्रद्धास्थानी तलवार घेऊन दहशत निर्माण केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे सुरूर गावातील नागरिकांमध्ये दिलास्याचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या तत्पर कारवाईचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे.




