आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-अस्मिता शिर्के मृत्यू प्रकरणात घातपाताचा संशय; ‘सीडीआर’ आणि लोकेशन तपासण्याची रिपाइंची मागणी.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सातारा:-अस्मिता शिर्के मृत्यू प्रकरणात घातपाताचा संशय; ‘सीडीआर’ आणि लोकेशन तपासण्याची रिपाइंची मागणी.

सातारा प्रतिनिधी |
सातारा दि. २१ : वाई तालुक्यातील पसरणी येथील अस्मिता शिर्के हिच्या गूढ मृत्यू प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त करत रिपाइं (आठवले गट) चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पोलिसांकडे सखोल तपासाची मागणी केली आहे. अस्मिताच्या मोबाईलचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि लोकेशन तपासून या प्रकरणाची पाळेमुळे शोधावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी शेंदुरजणे येथील कालव्यात अस्मिता शिर्के हिचा मृतदेह आढळून आला होता. विशेष म्हणजे तिची दुचाकी अन्य ठिकाणी सापडल्याने संशय अधिक गडद झाला आहे. अस्मिता नियमितपणे कॉलेजला जात होती आणि तिचा नेहमीचा मार्ग वेगळा होता. मात्र तिची गाडी वेगळ्याच दिशेला सापडल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
अशोक गायकवाड यांनी म्हटले आहे की, “घरात वारकरी परंपरा असलेल्या अस्मिता शिर्के हिचा मृत्यू अत्यंत संशयास्पद आहे. ती शिक्षण घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालत होती. तिचे वडील दुबई येथे कामाला असून, कुटुंबाचा सन्मान वाढवण्यासाठी ती शिक्षण घेत होती. पसरणी गावासाठी ती भूषण होती.”
ते पुढे म्हणाले, “त्या दिवशी ती स्टँड परिसरातून बेपत्ता झाली. तिचा ज्या मार्गाशी काही संबंध नाही, त्या मार्गावर तिचा मृतदेह आढळून येतो. त्यामुळे घातपाताचा संशय निर्माण होत आहे. पोलिसांनी तिच्या फोनचे लोकेशन, सीडीआर आणि संबंधित सर्व तांत्रिक तपास करून आरोपींना शोधून कठोर शिक्षा करावी. तरच तिला खरी आदरांजली ठरेल.”

2) जिल्हा रुग्णालयात ‘लाचेचा खेळ’ उघड! ३० हजार घेताना सहाय्यक अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात.

सातारा प्रतिनिधी |
सातारा दि. २१ : सातारा जिल्हा रुग्णालय परिसरात बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) धडक कारवाईने एकच खळबळ उडाली. वडिलांच्या वैद्यकीय उपचारांची बिले मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक अधीक्षकाला एसीबीने रंगेहात पकडले.
श्रीनिवास गजानन जोशी (वय ५२) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, ते मूळचे ग्रामीण रुग्णालय काशिळ येथे वर्ग-३ चे सहाय्यक अधीक्षक आहेत. सध्या ते सातारा जिल्हा रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासकीय कर्मचारी असून त्यांच्या वडिलांवर साताऱ्यातील वेदांत हेल्थ केअर सेंटर, साईअमृत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि जरग हॉस्पिटल येथे उपचार झाले होते. उपचारांनंतर लाखो रुपयांची वैद्यकीय बिले झाली होती. ही बिले ‘वैद्यकीय प्रतिपूर्ती’साठी वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवणे आवश्यक होते.
हे काम करून देण्यासाठी आरोपी श्रीनिवास जोशी याने सुरुवातीला ३३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली. पडताळणीदरम्यान पंचांसमक्ष आरोपीने तडजोड करत ३० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
यानंतर बुधवारी जिल्हा रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील वैद्यकीय बिल कक्ष क्रमांक २२-ब मध्ये सापळा रचण्यात आला. आरोपी जोशी याने तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने झडप घालून त्याला रंगेहात अटक केली.
या कारवाईनंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार धनंजय खाडे, अजित पाटील आणि सुदर्शन पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे करत आहेत.

3) वाई:-“विचार भित्रे करतील आणि लढाया मूर्ख लढतील”; वाईत एअर मार्शल भागवतांचा राष्ट्रसुरक्षेवर परखड घणाघात!

सातारा प्रतिनिधी |
वाई दि. २१ : वाई वसंत व्याख्यानमालेत “विश्वगुरू भारत आणि विश्वयुद्ध” या विषयावर एअर मार्शल हेमंत भागवत यांचे परखड, अभ्यासपूर्ण आणि राष्ट्रसुरक्षेचा व्यापक दृष्टिकोन मांडणारे व्याख्यान उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मकरंद शेंडे होते.
एअर मार्शल हेमंत भागवत यांनी आपल्या भाषणात भारताच्या संरक्षण धोरणावर, जागतिक युद्धस्थितीवर आणि युवकांच्या राष्ट्रीय सुरक्षेतील भूमिकेवर भाष्य करताना स्पष्ट मत मांडले. “संरक्षण या विषयाकडे युवकांनी वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. ब्रिटिशांनी केवळ ‘डिव्हाईड अँड रूल’मुळे जगावर राज्य केले नाही, तर त्यांच्या समाजात सैनिक आणि सुरक्षादलांविषयी असलेल्या सन्मानामुळे त्यांची ताकद वाढली,” असे ते म्हणाले.
युक्रेनने १९९५ मध्ये अण्वस्त्रे सोडण्याचा घेतलेला निर्णय आज त्यांच्यासाठी घातक ठरत असल्याचे सांगत त्यांनी भविष्यातील धोके ओळखून वर्तमानातील निर्णय घ्यावे लागतात, असे नमूद केले. इस्रायलचे उदाहरण देत त्यांनी सक्षम संरक्षणव्यवस्थेमुळेच प्रतिकूल परिस्थितीतही राष्ट्र मजबूत राहते, असे स्पष्ट केले.
“भारताने हजारो वर्षांत कुणावर प्रथम आक्रमण केले नाही, ही आपली संस्कृती आहे; पण जग त्याच तत्त्वावर चालत नाही. गेल्या ७८ वर्षांत भारतावर अनेक युद्धे लादली गेली. त्यामुळे संरक्षण सज्जता अपरिहार्य आहे,” असे सांगताना त्यांनी इतिहासातील संरक्षणावरील दुर्लक्षामुळे भारताला पारतंत्र्य पत्करावे लागल्याची आठवण करून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय सभ्यतेच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःची मानली होती, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
पाकिस्तान आणि चीन या दोन वेगळ्या आव्हानांकडे भारताने वेगवेगळ्या दृष्टीने पाहिले पाहिजे, असे मत व्यक्त करताना “पाकिस्तानकडून सलोख्याची अपेक्षा वास्तववादी नाही; मात्र चीनसोबत संघर्षाऐवजी संतुलित संबंध आवश्यक आहेत,” असे ते म्हणाले.
भारताने संरक्षणावरील खर्च वाढवणे, शस्त्रास्त्रनिर्मितीत आत्मनिर्भर होणे आणि तंत्रज्ञानासह गुप्तचर यंत्रणा मजबूत करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. फायटर विमानांची कमतरता, परदेशी पुरवठ्यावर अवलंबित्व आणि उशिरा होणारा पुरवठा यामुळे राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
“ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स” हे धोरण लक्षात ठेवण्याची गरज अधोरेखित करताना त्यांनी राष्ट्रातील विद्वान आणि सैनिक या दोघांनाही समान सन्मान मिळाला पाहिजे, असे सांगितले. “अन्यथा विचार भित्रे लोक करतील आणि लढाया मूर्ख लोक लढतील,” या त्यांच्या विधानाने उपस्थितांमध्ये विशेष चर्चा रंगली.
प्रास्ताविक विठ्ठल माने यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय व आभार डॉ. रूपाली अभ्यंकर यांनी मानले. प्रायोजक श्रीमती विजया वसंत शेंडे आणि चेतन धारिया यांचा सत्कार एअर मार्शल भागवत यांच्या हस्ते करण्यात आला. व्याख्यानामुळे उपस्थितांना राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक सामरिक वास्तव आणि संरक्षण धोरणांचा व्यापक दृष्टिकोन मिळाला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button