वाई एमआयडीसीत परप्रांतीयांचा वाढता वावर; स्थानिकांमध्ये अस्वस्थता वाढली! रोजगार, सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर; पडताळणी मोहिमेची जोरदार मागणी.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई एमआयडीसीत परप्रांतीयांचा वाढता वावर; स्थानिकांमध्ये अस्वस्थता वाढली!
रोजगार, सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर; पडताळणी मोहिमेची जोरदार मागणी.

सातारा प्रतिनिधी |
वाई दि. २० : वाई शहर आणि तालुक्यातील एमआयडीसी परिसरात गेल्या काही वर्षांत परप्रांतीय नागरिकांचे वाढते वास्तव्य आता स्थानिकांसाठी चिंतेचा विषय बनू लागले आहे. बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणावर कामगार व व्यावसायिक वाईत दाखल होत असल्याने रोजगार, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये याबाबत तीव्र अस्वस्थता निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
एमआयडीसी परिसरासह शहरातील अनेक भागांमध्ये बाहेरील नागरिक मोठ्या संख्येने भाड्याने राहत असल्याचे दिसून येत आहे. मात्र या भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे नोंदवण्यात आली आहे का, त्यांची ओळख आणि पार्श्वभूमी तपासण्यात आली आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष पडताळणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
वाईच्या मुख्य बाजारपेठेतही परप्रांतीय व्यावसायिकांची संख्या वाढत असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. “जास्त भाडे” या कारणामुळे काही गाळे परप्रांतीयांना दिले जात असल्याचा आरोप व्यापारी करत आहेत. परिणामी किरकोळ व्यवसाय, वाहनभाडे आणि मजुरी क्षेत्रात स्थानिकांना स्पर्धेला सामोरे जावे लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, एमआयडीसीतील काही कंपन्यांमध्ये ठेकेदारांकडून बाहेरील कामगारांची भरती करून त्यांच्याकडून कमी मजुरीत दीर्घकाळ काम करून घेतले जात असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. या कामगारांना पीएफ, ईएसआय, आरोग्य सुविधा किंवा अन्य कायदेशीर लाभ दिले जातात का, याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
स्थानिक तरुणांमध्ये रोजगाराच्या संधी कमी होत असल्याची भावना तीव्र होत असून, “स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे” अशी मागणी पुढे येत आहे. प्रशासन, पोलीस आणि कामगार विभागाने संयुक्त मोहीम राबवून परिस्थिती नियंत्रणात ठेवावी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा वाईकर व्यक्त करत आहेत.
2) वाई:-मांढरदेवमध्ये जातीय द्वेषाचा संतापजनक प्रकार; पूजा साहित्याचे दुकान फोडून चोरी
चार जणांविरोधात वाई पोलिसांत गुन्हा दाखल; उपविभागीय पोलिस अधिकारी स्वतः तपासात.
सातारा प्रतिनिधी |
वाई दि. २० : जातीय द्वेष आणि भेदभावातून एका महिलेचे पूजा साहित्याचे दुकान फोडून आर्थिक नुकसान केल्याची तसेच दुकानातील साहित्य चोरून नेल्याची धक्कादायक घटना वाई तालुक्यातील मांढरदेव येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाई पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार छाया प्रमोद माने (वय ४७, रा. सिद्धनाथवाडी, वाई) या मांढरदेव गावाच्या हद्दीत पूजा साहित्याचे दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या दुकानाशेजारीच संग्राम विलास मांढरे याचेही दुकान आहे.
तक्रारीनुसार, संशयित आरोपी संग्राम विलास मांढरे, विलास मांढरे, विकास मांढरे यांनी जातीय द्वेष आणि भेदभावातून संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला उपजीविकेपासून वंचित ठेवण्याचा कट रचला. यासाठी त्यांनी दुकानातील कामगार गोविंद शिंदे यालाही हाताशी धरल्याचा आरोप आहे.
दि. २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आरोपींनी छाया माने यांचे दुकान तोडून त्यातील पूजा साहित्य चोरून नेले व मोठे आर्थिक नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी दि. १९ मे २०२६ रोजी रात्री उशिरा वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे स्वतः या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास वाई पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




