तिसगाव प्रवरातील महिलांची यशोगाथा “सिद्धेश्वरी सेंद्रिय हळद पावडर”ला जिल्हाभरातून मोठी मागणी.
पत्रकार आदिनाथ कडून अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) तिसगाव प्रवरातील महिलांची यशोगाथा
“सिद्धेश्वरी सेंद्रिय हळद पावडर”ला जिल्हाभरातून मोठी मागणी.

राहाता प्रतिनिधी :
राहाता तालुक्यातील तिसगाव प्रवरा येथील महिला शेतकरी गटाने सेंद्रिय शेती आणि उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून यशाची नवी उंची गाठली आहे. सौ. रुपाली आदिनाथ कडू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या “सिद्धेश्वरी सेंद्रिय हळद पावडर” उद्योगाला आज संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी मागणी निर्माण झाली आहे.
सौ. रुपाली कडू या ईश्वरी गटाच्या अध्यक्ष, प्रभाग संघाच्या माजी अध्यक्ष तसेच आत्मा अंतर्गत सिद्धेश्वरी शेतकरी गटाच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा गट डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान योजनेत सहभागी असून या गटामध्ये ५१ महिला शेतकरी एकत्रितपणे कार्य करत आहेत.
आर्थिक अडचणींवर मात करत उमेद अभियानाच्या सहकार्याने त्यांनी “सिद्धेश्वरी सेंद्रिय हळद पावडर” हा उद्योग व्यवसाय उभारला. हळद शेतातून काढल्यानंतर तिची प्रक्रिया करण्यासाठी बॉयलर, पॉलिश मशीन, कांडप मशीन, गिरणी तसेच पॅकेजिंग मशीन, छोटा व मोठा काटा आदी आवश्यक साहित्य खरेदी करण्यात आले.
या उद्योग उभारणीसाठी कृषी सखी सौ. अनिता गणपत रांधवणे, सीसी राणी साळवे मॅडम, रवींद्र खलाटे साहेब, श्री. किशोर कडू सर तसेच कृषी विभागाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच एम. अमोल खांडेभराड यांच्या मार्गदर्शनाखाली उमेद अभियानाच्या माध्यमातून ईश्वरी गटाला आरएफ निधी ३० हजार रुपये, सीआयएफ ६० हजार रुपये, बीज भांडवल ४० हजार रुपये तसेच दोन लाख ४० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध झाले.
या आर्थिक मदतीमुळे उद्योगाला मोठी चालना मिळाली आणि आज “सिद्धेश्वरी सेंद्रिय हळद पावडर” जिल्हाभर प्रसिद्ध झाली आहे. दरवर्षी सुमारे १५ टन हळद पावडरची विक्री होत असून गटातील १० ते १२ महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
महिलांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सौ. रुपाली आदिनाथ कडू पाटील यांना नवी दिल्ली येथे “चॅम्पियन फार्मर” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हाभरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सौ.रुपाली आदिनाथ कडू पाटील
रा.तिसगाव प्रवरा, ता. राहाता, जि. अहिल्यानगर.
2) राहाता:-“नैसर्गिक शेतीकडे महिलांचा वाढता कल; तिसगाव येथे आत्मा अंतर्गत शेतीशाळेत मार्गदर्शन”

राहता | दि. १५/०५/२०२६ प्रतिनिधी
कृषी विभागाच्या आत्मा (ATMA) अंतर्गत नैसर्गिक शेती अभियानाला चालना देण्यासाठी राहता तालुक्यातील मौजे तिसगाव येथे साईसिद्धेश्वरी सेंद्रिय शेती गटाच्या माध्यमातून नैसर्गिक शेती शाळेचे आयोजन करण्यात आले. सदर शेतीशाळेचे आयोजन व प्रवेश प्रेरक म्हणून सौ. रुपाली आदिनाथ कडू यांनी आपल्या वस्तीवर हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.
या शेतीशाळेमध्ये नैसर्गिक शेतीचे उद्देश व महत्त्व याविषयी शेतकरी महिलांना सविस्तर माहिती देण्यात आली. रासायनिक शेतीमुळे वाढणारा खर्च आणि जमिनीची घटती सुपीकता लक्षात घेता नैसर्गिक शेती ही काळाची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान बीज प्रक्रिया, नैसर्गिक पद्धतीने बियाण्यांची उगवण क्षमता वाढविण्याच्या उपाययोजना तसेच दशपर्णी अर्क निर्मितीचे प्रत्यक्षिक घेण्यात आले. यामुळे उपस्थित महिलांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली.

यावेळी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक किशोर कडू यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन आरोग्यदायी अन्ननिर्मिती शक्य होत असल्याचे सांगितले. तसेच शेतकरी महिलांनी गटशेती व सेंद्रिय उत्पादनाकडे अधिक लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.
या शेतीशाळेस परिसरातील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमामुळे नैसर्गिक शेतीबाबत महिलांमध्ये जागरूकता निर्माण होऊन शेतीत नव्या संकल्पनांचा प्रसार होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.




