वाई:-त.ल.जोशी विद्यालयाचा दणदणीत निकाल; स्वामी क्षीरसागरचे १०० टक्के गुणांनी सुवर्णयश!
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1)वाई:-त.ल.जोशी विद्यालयाचा दणदणीत निकाल; स्वामी क्षीरसागरचे १०० टक्के गुणांनी सुवर्णयश! 🏆
वाई : इयत्ता १० वी SSC फेब्रुवारी/मार्च २०२६ परीक्षेत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय, वाई यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले. विद्यालयाच्या या ऐतिहासिक यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निकालात विद्यालयाचा गुणवंत विद्यार्थी स्वामी शशिकांत क्षीरसागर याने तब्बल १०० टक्के गुण मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्याच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
📚 विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी :
🥇 प्रथम क्रमांक – क्षीरसागर स्वामी शशिकांत – १००.००%

🥈 द्वितीय क्रमांक – निकम मृणाली शिवाजी – ९९.४९%

🥉 तृतीय क्रमांक – दुबे सानवी विजय – ९९.२०%

🏅 चतुर्थ क्रमांक – पठाण नवमान फैय्याज – ९९.००%

🏅 पाचवा क्रमांक – ओम राहुल शिंदे – ९७.८०%

विशेष म्हणजे, विद्यालयातील तब्बल २८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत यशाची उंच गुढी उभारली आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा विश्वास, शिक्षकांचे मार्गदर्शन, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य तसेच मुख्याध्यापक, पदाधिकारी आणि संस्थेचे नियोजन महत्त्वाचे ठरले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय, वाई आणि यशवंत शिक्षण संस्था, सुरूर यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असून विद्यालयाची ही यशस्वी परंपरा अशीच कायम राहो, अशा सदिच्छा व्यक्त होत आहेत.
2) वाई:-“मराठी संगीत नाटकांची सुवर्ण परंपरा म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा अमूल्य ठेवा” — पंडित जयराम पोतदार

वाई, दि. ७ मे : मराठी संगीत नाटकांचा इतिहास, त्यातील सांगीतिक वैभव, दिग्गज कलाकारांची परंपरा आणि रंगभूमीचे सांस्कृतिक योगदान यांचा सुरेल मागोवा घेत वाई वसंत व्याख्यानमालेचे सातवे पुष्प रंगले. “मागोवा संगीत नाटकांचा” या विषयावर ज्येष्ठ संगीत अभ्यासक पंडित जयराम पोतदार यांची ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कृष्णाजी साखवळकर यांनी प्रकट मुलाखत घेतली.
कार्यक्रमात मराठी संगीत नाटकांच्या परंपरेचा ऐतिहासिक, सांगीतिक आणि सांस्कृतिक प्रवास रसिकांसमोर उलगडला. तबल्याला ओमकार देगलूरकर तर हार्मोनियमला संगीत महामहोपाध्याय शिवदास देगलूरकर यांनी साथ दिली.
पंडित जयराम पोतदार यांनी सांगितले की, विष्णुदास भावे यांचे ‘सीता स्वयंवर’ हे ५ नोव्हेंबर १८४३ रोजी रंगभूमीवर आलेले पहिले मराठी संगीत नाटक मानले जाते. मात्र व्यावसायिक मराठी संगीत नाटकाची खरी सुरुवात अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या *‘संगीत शाकुंतल’*पासून झाली. ३१ ऑक्टोबर १८८० रोजी सादर झालेल्या या नाटकाने मराठी रंगभूमीचा चेहरामोहराच बदलून टाकला.
तंजावरचे व्यंकोजी राजे, शहाजी राजे आणि सरफोजी राजे यांसारख्या विद्वान राजांनी दोनशे वर्षांपूर्वीच संगीत नाटके लिहिली होती. संस्कृत, तमिळ, मराठी आणि तेलुगू भाषांवर प्रभुत्व असलेल्या या राजांनी सुमारे पासष्ट नाटके लिहिली. त्यामध्ये १६९० मध्ये लिहिलेले ‘सीता कल्याण’ विशेष गाजले.
मराठी संगीत नाटकांवर संस्कृत नाट्यपरंपरा, शाहिरी वाङ्मय, लावण्या आणि पोवाड्यांचा प्रभाव असल्याचे सांगताना त्यांनी ‘अभिज्ञान शाकुंतल’ आणि ‘मृच्छकटिक’ या संस्कृत नाटकांचा उल्लेख केला. सुरुवातीला गद्य भाग सूत्रधार सादर करायचा आणि पात्रे मुखाभिनय करीत असत, अशी माहिती त्यांनी दिली.
गोविंद बल्लाळ देवल यांनी *‘शाकुंतल’*ची पहिली आवृत्ती लिहिल्याचा उल्लेख करताना, पहिल्या प्रयोगावेळी चुकून पडदा उघडल्याने इतिहासात प्रथमच उघड्या पडद्यावर नांदी सादर झाली, हा रंजक किस्साही त्यांनी सांगितला.
भाऊराव कोल्हटकर यांनी साकारलेली शकुंतला विशेष गाजली. पुढे बालगंधर्व यांनीही शकुंतलेची भूमिका साकारून रसिकांना मंत्रमुग्ध केले. ‘सौभद्र’ या नाटकाचा उल्लेख करताना त्यांनी म्हटले, “इंग्रजांनी कोहिनूर नेला, पण ‘सौभद्र’ नेता आले नाही.”
बालगंधर्वांच्या जीवनातील प्रसंग सांगताना त्यांनी नमूद केले की, लहान वयातच त्यांच्या गायनाची ख्याती झाली होती. लोकमान्य टिळक यांनी त्यांना “बालगंधर्व” ही उपाधी दिली. ‘मानापमान’ नाटकाच्या प्रयोगाच्या दिवशी मुलगी हिराचे निधन झाले असतानाही “माझ्या दुःखामुळे प्रेक्षकांचा आनंद हिरावून घेणार नाही,” असे म्हणत त्यांनी प्रयोग केला. ‘नाथ हा माझा’ या पदाला त्या दिवशी सहा वेळा ‘वन्स मोअर’ मिळाला, हा प्रसंग सांगताना सभागृह भारावून गेले.
काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, छोटा गंधर्व आणि वसंतराव देशपांडे यांच्यासह अनेक दिग्गजांनी मराठी संगीत नाटकांची परंपरा अधिक समृद्ध केल्याचे त्यांनी सांगितले.
मुलाखतीदरम्यान ‘नेसली पितांबरी जरी ग’, ‘वद जाऊ कुणाला शरण’, ‘फुलवनशेज साबरो’, ‘नाही मी बोलत नाथा’ यांसारखी अजरामर पदे सादर करण्यात आली आणि रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ. माया अभ्यंकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. रूपाली अभ्यंकर यांच्या हस्ते पंडित जयराम पोतदार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे प्रायोजक डॉ. शरद अभ्यंकर, वर्षा बेडेकर आणि विनीत पोफळे यांचाही गौरव करण्यात आला. वाईकर रसिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली.




