श्रीरामपूर:-“मन निरोगी तर जीवन निरोगी”
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“मन निरोगी तर जीवन निरोगी”

श्रीरामपूर प्रतिनिधी संजय पगारे
श्रीरामपूर / माळेवाडी (RPs स्टार न्यूज प्रतिनिधी)
श्रीरामपूर येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त डॉक्टर ढोबळे हॉस्पिटलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोफत मानसिक आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजहिताच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात विविध वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले.
या शिबिरात अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मुकुल ढोबळे यांनी नागरिकांची मानसिक आरोग्य तपासणी केली. ताणतणाव, नैराश्य, चिंता, अनिद्रा, भावनिक अस्थिरता यांसारख्या वाढत्या मानसिक समस्यांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. अनेकांनी आपल्या वैयक्तिक अडचणी मांडत तज्ज्ञांचा सल्ला घेतला व त्यातून योग्य दिशा मिळाल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी बोलताना डॉ. मुकुल ढोबळे यांनी मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. “जसे शारीरिक आरोग्य महत्त्वाचे आहे, तसेच मानसिक आरोग्य देखील तितकेच आवश्यक आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण व्यायाम, संतुलित आहार व नियमित तपासण्या करतो; त्याचप्रमाणे मन निरोगी ठेवण्यासाठी सकारात्मक विचार, भावनांचे योग्य व्यवस्थापन आणि तणाव नियंत्रण गरजेचे आहे. तणावाकडे वेळेवर लक्ष न दिल्यास त्याचे परिणाम शारीरिक आरोग्यावरही होऊ शकतात,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या शिबिरामुळे नागरिकांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून, समाजात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अशा प्रकारचे शिबिर भविष्यातही आयोजित करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.




