सातारा:-महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी!
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा:-महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी!

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायरीवर चटणी-भाकर खाऊन सरकारचा तीव्र निषेध.
सातारा प्रतिनिधी | दिनांक ८ नोव्हेंबर २०२६
सातारा : वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा अन्याय याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी, जिल्हा सातारा यांच्या वतीने रविवार, दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने ‘काळी दिवाळी’ साजरी करण्यात आली.
सत्ताधारी सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध नोंदवत पदाधिकाऱ्यांनी चटणी-भाकर खाऊन शासनाच्या कार्यपद्धतीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून महागाई आणि बेरोजगारीच्या अंधारात जनतेची दिवाळी काळवंडली आहे, असा संतप्त सूर यावेळी उमटला.
विशेष म्हणजे, लोकशाही मार्गाने निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पदाधिकारी पोहोचले असता निवेदन स्वीकारण्यासाठी साधा शिपाईसुद्धा उपस्थित नसल्याचा अनुभव आंदोलकांना आला. ही बाब प्रशासकीय असंवेदनशीलतेचे गंभीर उदाहरण असल्याची टीका करण्यात आली.
अखेर सातारा जिल्हा पूर्व जिल्हा अध्यक्ष रामदास भाई कांबळे पश्चिम विभागाचे अध्यक्ष दयानंद माने जेष्ठ नेते चंद्रकांत आप्पा खंडाईत आहेत तसेच जिल्ह्यातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायरीवर निवेदन सादर करून शासनाच्या धोरणांचा व जनतेच्या प्रश्नांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा तीव्र निषेध नोंदविला.
लोकशाहीत जनतेचे प्रश्न ऐकणे ही सरकार आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी असते, जनतेला वाऱ्यावर सोडण्यासाठी नाही. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकाराचा वापर करून वंचित बहुजन आघाडीने सरकारला जनतेच्या प्रश्नांची जाणीव करून दिली.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अन्याय, महागाई, बेरोजगारी आणि शेतकरीविरोधी धोरणांविरोधात संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.




