वाई एमआयडीसीत कामगारांची पिळवणूक? शिव कामगार सेनेचा इशारा; चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई एमआयडीसीत कामगारांची पिळवणूक? शिव कामगार सेनेचा इशारा; चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन.

सातारा प्रतिनिधी सारिका गवते
कामगार आयुक्तांकडे तक्रार; किमान वेतन, सुरक्षितता आणि स्थानिक रोजगारावर प्रश्नचिन्ह.
वाई, दि. १३ : वाई एमआयडीसीतील विविध नामांकित कंपन्यांमध्ये कामगारांच्या हक्कांचे सर्रास उल्लंघन होत असून त्यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप शिव कामगार सेनेने केला आहे. या संदर्भात संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष योगेश आनंदराव फाळके यांनी सातारा येथील कामगार आयुक्तांकडे लेखी निवेदन देत तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित कंपन्यांनी आपल्या कामगार धोरणात सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शिव कामगार सेनेने दिलेल्या निवेदनात वाई एमआयडीसीतील अथर्व फाऊंड्री, गरवारे वॉल रोप्स, गरवारे जेल, मालाज फूड, भारत पेट्रोलियम, फुल्ट्रोन यांसह काही कंपन्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या कंपन्यांमध्ये शासनाने ठरवून दिलेले किमान वेतन अनेक कामगारांना दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी कामगारांकडून दिवसाला १२ ते १८ तास काम करून घेतले जात असून ओव्हरटाईमचा मोबदला दिला जात नाही, अशी तक्रार करण्यात आली आहे.
निवेदनानुसार अनेक कामगारांना ईएसआय (ESI) आणि पीएफ (Provident Fund) यांसारख्या अत्यावश्यक सुविधांपासून वंचित ठेवले जात असून कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साधनांचीही कमतरता असल्याने कामगारांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे.
याशिवाय कमी पगारात जास्त वेळ काम करून घेण्यासाठी कंपन्या स्थानिक तरुणांऐवजी परप्रांतीय कामगारांना प्राधान्य देत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे वाई परिसरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आपल्या भागातच रोजगार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तक्रार करणाऱ्या कामगारांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचे समोर आले आहे.
या तक्रारीमुळे वाई औद्योगिक वसाहतीत खळबळ उडाली असून आता कामगार विभाग या प्रकरणी काय कारवाई करतो, याकडे कामगारांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
चौकट :
“वाई एमआयडीसीमधील कामगारांवर होणारा अन्याय आता सहन केला जाणार नाही. प्रशासनाने संबंधित कंपन्यांची तातडीने चौकशी करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा. अन्यथा शिवसेना व शिव कामगार सेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
— योगेश आनंदराव फाळके, जिल्हाध्यक्ष, सातारा
2) वाई:-पगारातून कपात, पण औषधांचा तुटवडा; वाईतील ईएसआय सेवांचा बोजवारा.

वाई, दि. १३ : वाई तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी असलेली ईएसआय (ESI) सेवा सध्या अक्षरशः ढासळलेली असल्याचे चित्र समोर येत आहे. औषधांचा तीव्र तुटवडा आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कामगारांना उपचाराविना रिकाम्या हाताने परतावे लागत असून कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
वाई तालुक्यातील विविध कंपन्यांमधील कामगारांच्या पगारातून दरमहा भविष्य निर्वाह निधी (PF) आणि ईएसआय योजनेसाठी ठराविक रक्कम कपात केली जाते. या बदल्यात कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात ईएसआय दवाखान्यांमध्ये साध्या तापाच्या किंवा अंगदुखीच्या गोळ्याही उपलब्ध नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून कामगार औषधांसाठी दवाखान्याचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, “गोळ्या उपलब्ध नाहीत, बाहेरून विकत घ्या,” असे सांगून कर्मचाऱ्यांकडून रुग्णांची बोळवण केली जात असल्याची तक्रार समोर येत आहे. आर्थिकदृष्ट्या बेताची परिस्थिती असलेल्या कामगारांना खासगी औषध दुकानातून महागडी औषधे खरेदी करणे परवडत नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे.
कामगारांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पगारातून नियमितपणे पैसे कपात होत असतानाही वेळेवर उपचार मिळत नसल्याने ही योजना केवळ नावापुरती उरल्याची भावना निर्माण झाली आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही कामगारांनी केला आहे.
दरम्यान, ईएसआय दवाखान्यातील औषधांच्या तुटवड्याची तात्काळ चौकशी करून आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, तसेच कामगारांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी कामगारांकडून होत आहे. “पगारातून पैसे कापले जातात, मग औषधे का मिळत नाहीत?” असा सवाल उपस्थित करत प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही कामगारांनी दिला आहे.
सध्या या प्रकरणी वरिष्ठ पातळीवरून काय दखल घेतली जाते आणि कामगारांना न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
3) महाबळेश्वर–पाचगणी वाहतूक याच मार्गावर; ग्रामस्थांचा तातडीच्या दुरुस्तीचा इशारा.

वाई, दि. १३ : ओझर्डे (ता. वाई) येथील चंद्रभागा ओढ्यावरील पुलाचे कठडे मागील पाच-सहा महिन्यांपासून तुटलेल्या अवस्थेत असून, त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या कोपऱ्यावरील संरक्षक कठडे कोसळल्यामुळे वाहन थेट ओढ्याच्या पात्रात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र या गंभीर प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या वाई–सुरूर रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे सातारा–पुणे महामार्गावरून महाबळेश्वर व पाचगणीकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर ओझर्डे मार्गे वळवली जात आहे. त्यामुळे या पुलावरून पर्यटकांची वाहने, एसटी बसेस तसेच अवजड कंटेनर आणि गॅस टँकरची दिवसरात्र वर्दळ सुरू आहे. वाढलेल्या रहदारीच्या पार्श्वभूमीवर पुलावरील तुटलेले कठडे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पुलाचे कठडे तुटून अनेक महिने उलटले तरी अद्याप दुरुस्तीचे कोणतेही काम हाती घेतलेले नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी नवीन चालक किंवा पर्यटकांना या धोक्याची कल्पना नसल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. पुलाच्या कोपऱ्यावर संरक्षण भिंत नसल्याने वाहनाचा ताबा सुटल्यास ते थेट ओढ्याच्या पात्रात कोसळू शकते.
“या पुलावरून शालेय बस, टँकर तसेच मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची ये-जा सुरू असते. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कठड्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे,” अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रशासनाने या प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन पुलावरील तुटलेले कठडे दुरुस्त करावेत, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
4) कराड:-‘जनहिताय’च्या महिला गौरव सोहळ्यात ३३ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; कराडमध्ये उत्साहपूर्ण वातावरण.

कराड, दि. १३ : समाजाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे असून त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी असल्याचा सूर जनहिताय फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘महिला गौरव व पुरस्कार वितरण’ समारंभात उमटला. कराड येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३३ कर्तृत्ववान महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन कराड नगरपरिषदेच्या नगरसेविका वैष्णवी रमेश वायदंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. तर पंचायत समिती सदस्या रूपाली प्रशांत यादव यांनी अध्यक्षस्थान भूषवले.
यावेळी व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, तहसीलदार, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विन्दा गुरावे, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महिला विषयक कायद्याचे अभ्यासक ॲड. प्रमोद तडाखे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
जनहिताय फाऊंडेशनच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांना वीर पत्नी पुरस्कार, अनाथांची माय माऊली, आदर्श मुख्याध्यापिका, आदर्श प्रशासकीय अधिकारी, पोलीस व आरोग्य विभागातील उत्कृष्ट कामगिरी, आदर्श माता, सासू, सून, पत्नी, मुलगी तसेच उत्कृष्ट सरपंच आणि पोलीस पाटील या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
यामध्ये रेखा सूर्यवंशी, विद्या माने, वृषाली तांबवेकर, जयश्री देशपांडे, वैशाली सोनावले, मुस्कान शेख, अस्मिता देशमुख, अश्विनी पाटील, सुरेखा गोरे, प्रसन्ना धामणे, रजनी पाटोळे, शबनम मुजावर, सोनाली माने, गौरी आवळे, विजया माने, सोनाली पिसाळ, पुष्पा चव्हाण, अश्विनी सूर्यवंशी, तृप्ती वीर, प्रतिभा कणसे, अश्विनी सरकाळे, रुबीना मुलाणी, सविता ढवळे, अनिता जाधव, सुरेखा सूर्यवंशी, प्रतिभा साखरे, रेशमा मिस्त्री, कल्पना पाटील, कल्पना खामकर, रंजना जामदार, राजश्री पाटील, अर्चना खताळ आणि साक्षी माने यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
मान्यवरांनी आपल्या भाषणातून महिलांच्या धैर्य, जिद्द आणि कर्तृत्वाचे कौतुक करत समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. जनहिताय फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे कराड शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाला कल्पना ढवळे-भंडारे, सरपंच भारती मदने, निर्मला जिरगे, दिलीप चव्हाण, नगरसेवक अख्तरहुसेन आंबेकरी, राहुल भोसले, अशोक आण्णा भोसले, अमर तुपे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




