वाई:-सुरूर–पोलादपूर रस्त्याच्या रखडलेल्या कामावर वाईकरांचा संताप उफाळला – रास्ता रोको करून प्रशासनाला इशारा; “१५ दिवसांत कामाला गती नाही तर मोठं आंदोलन”
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

1) वाई:-सुरूर–पोलादपूर रस्त्याच्या रखडलेल्या कामावर वाईकरांचा संताप उफाळला – रास्ता रोको करून प्रशासनाला इशारा; “१५ दिवसांत कामाला गती नाही तर मोठं आंदोलन”

सातारा प्रतिनिधी सारिका गवते
वाई, दि. ११ : दीड-दोन वर्षांपासून रखडलेल्या सुरूर–पोलादपूर रस्त्याच्या कामामुळे वाई तालुका आणि शहरातील नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे. रस्त्यावर खोल खड्डे, उडणारी धूळ, निकृष्ट काम आणि प्रशासनाची ढिलाई यामुळे वाईकरांचे जगणे अक्षरशः त्रस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बंद आणि रास्ता रोको आंदोलन करत नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारला. या आंदोलनाची दखल मंत्रालयाने घेतल्याची माहिती असून यासंदर्भात तातडीची बैठक बोलावण्यात आल्याचे समजते.
रस्त्याच्या प्रश्नावर संबंधित मंत्र्यांची अनेकदा भेट घेऊनही काहीच फरक पडलेला नाही, अशी खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत कामाला वेग देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र मार्च उजाडला तरी रस्त्याची परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याने वाईकरांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुमारे ७० ते ८० किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पातील केवळ १२ किलोमीटरचे काम पूर्ण होण्यासाठी जवळपास दोन वर्षे लागली आहेत. आवश्यक परवानग्या आणि ‘एनओसी’ वेळेत न घेतल्यामुळेच काम रखडल्याचा आरोप नागरिकांनी केला. कामाचा दर्जाही अत्यंत निकृष्ट असल्याने संपूर्ण प्रकल्पाचे तांत्रिक ऑडिट करावे, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
धुळीने शेतीचा बोंब
वाई आणि महाबळेश्वर परिसरातील बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे. मात्र रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे स्ट्रॉबेरी, गहू आणि ज्वारीसारख्या पिकांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. धुळीमुळे नागरिकांमध्ये दमा आणि श्वसनविकार वाढत असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
रस्त्याच्या खोदकामामुळे किसन वीर महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. कामाच्या ठिकाणी रिफ्लेक्टर्स किंवा सूचना फलक नसल्याने अपघातांचा धोका वाढल्याची तक्रारही करण्यात आली.
पर्यटन व्यवसायालाही फटका
पाचगणी आणि महाबळेश्वर या पर्यटनस्थळांकडे जाणारा हा मुख्य मार्ग असल्याने रस्त्याच्या दुर्दशेचा फटका पर्यटन व्यवसायालाही बसत आहे. पर्यटकांची संख्या घटल्याने हॉटेल व्यावसायिक आणि छोटे स्टॉलधारक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बँकांचे हप्ते कसे भरायचे, असा सवालही व्यावसायिकांनी उपस्थित केला.
रास्ता रोकोने वाहतूक ठप्प
यशवंतनगर येथील सह्याद्रीनगर टिकाटने परिसरात नागरिकांनी रास्ता रोको करत काही काळ वाहतूक ठप्प केली. या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, १५ दिवसांत कामात सुधारणा दिसली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.
दरम्यान, खराब रस्त्यांमुळे पुणे–वाई एसटीच्या प्रवासाला सुमारे एक तास अधिक वेळ लागत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. आता मंत्रालयातील बैठकीत काय निर्णय होतो आणि प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला कधी वेग येतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
चौकट
‘बंद’च्या वेळेवर चर्चा; दुकाने उघडण्यापूर्वीच संपला बंद?
सुरूर–पोलादपूर रस्त्याच्या प्रश्नावर पुकारण्यात आलेल्या वाई तालुका बंदाबाबत काही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले. बंद सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत ठेवण्यात आला होता; मात्र वाईची बाजारपेठ साधारण ९ ते १० वाजता सुरू होते. त्यामुळे काही ठिकाणी दुकाने उघडण्यापूर्वीच बंद संपल्याची चर्चा शहरात रंगली.
किसनवीर चौकात आंदोलनाच्या घोषणा सुरू असताना शहरातील काही भागांत दुकाने सुरू असल्याचेही दिसून आले. त्यामुळे आंदोलनाचे नियोजन अधिक प्रभावी असायला हवे होते, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.
2) वाई:-गुन्हेगारांनो सावध! भुईंज पोलिसांचा दमदार डाव; २६ गावांत ‘ग्रामसुरक्षा दल’ सज्ज.

वाई, दि. ११ : ग्रामीण भागातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी भुईंज पोलिसांनी कडक पावले उचलली असून पोलीस ठाणे हद्दीतील तब्बल २६ गावांत ‘ग्रामसुरक्षा दल’ उभारून सुरक्षेचे जाळे अधिक भक्कम केले आहे. गावागावातील तरुणांच्या खांद्यावर आता सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली असून पोलिसांच्या साथीने गावात गस्त, संशयास्पद हालचालींवर नजर आणि गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचे काम हे दल करणार आहे.
मंगळवार, दि. १० मार्च २०२६ रोजी भुईंज पोलीस ठाण्यात हद्दीतील सर्व पोलीस पाटीलांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत गावातील धडाडीच्या तरुणांची ग्रामसुरक्षा दलासाठी निवड करण्यात आली. त्यांना कर्तव्य, अधिकार आणि जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामीण भागात वाढत्या चोऱ्या आणि संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक तरुणांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे पोलिसांनी यावेळी स्पष्ट केले. ग्रामसुरक्षा दलातील सदस्यांना ‘विशेष पोलीस अधिकारी’ म्हणून मिळणारे अधिकार आणि कायदेशीर संरक्षण याची माहितीही देण्यात आली.
भुईंज पोलीस ठाणे हद्दीतील अनवडी, खोलवडी, देगाव, आनेवाडी, पांडे, खडकी, गुळूम, भिवडी, धोम पुनर्वसन, चांदवडी, राऊतवाडी, केंजळ, वेळे, कवठे, सुरूर, रायगाव, उडतरे, वीरमाडे, चांदक, ओझर्डे, निकमवाडी, काळंगवाडी, पाचवड, महामूलकरवाडी, मापरवाडी आणि राऊतवाडी या २६ गावांमध्ये हे ग्रामसुरक्षा दल कार्यरत झाले आहे. उर्वरित गावांमध्येही ही प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गावागावात पोलिसांबरोबर गस्त घालणे, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आणि गुन्हेगारीला आळा घालणे या कामांमुळे ग्रामीण भागातील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत होणार, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
चौकट
“गावात कोणाही अनोळखी व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. ग्रामसुरक्षा दलामुळे पोलिसांचे हात अधिक बळकट होतील आणि गुन्हेगारांवर वचक बसेल.”
— पृथ्वीराज ताटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, भुईंज पोलीस ठाणे
चौकट
ग्रामसुरक्षा दलाची प्रमुख कामे
• पोलिसांच्या सोबतीने गावात नियमित रात्रगस्त
• चोरी, दरोडे किंवा कायदा-सुव्यवस्थेच्या घटनांत पोलिसांना तातडीने मदत.
• बेकायदा दारू निर्मिती व विक्रीबाबत गुप्त माहिती पोलिसांना देणे.
• नैसर्गिक आपत्ती किंवा संकटाच्या वेळी ग्रामस्थांच्या मदतीला धावून जाणे.
• गावात सतत गस्त आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे.




