वाई:-व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, वाई चा दिमाखदार ‘प्रोजेक्ट डे’ संपन्न.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

1) व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, वाई चा दिमाखदार ‘प्रोजेक्ट डे’ संपन्न.

वाई : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, अनुभवाधारित शिक्षण आणि मूल्यसंस्कार यांना केंद्रस्थानी ठेवत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचलित व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, वाई येथे शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘प्रोजेक्ट डे’ उत्साहात व दिमाखात पार पडला. मराठी राजभाषा गौरव दिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम ज्ञान, संस्कार आणि सृजनशीलतेचा सुंदर संगम ठरला.
इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी “विविधतेत एकता” हा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावी प्रात्यक्षिकांद्वारे सादर केला. मराठी महिन्यांची ओळख व त्या-त्या महिन्यांनुसार साजरे होणारे सण यांची माहिती त्यांनी आत्मविश्वासाने मांडली. स्पष्ट उच्चार, अभ्यासपूर्ण मांडणी आणि सादरीकरणातील निपुणता यामुळे उपस्थित पालक व पाहुणे भारावून गेले.
इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी युनेस्कोप्राप्त किल्ल्यांची माहिती ओजस्वी शब्दांत उलगडली. प्रत्येक किल्ल्याची ऐतिहासिक गाथा जिवंत करताना त्यांनी स्वराज्याच्या पराक्रमाची साक्ष देणारा इतिहास समोर उभा केला. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय कार्याचा संदर्भ देत स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा जागवली.
इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले विज्ञान विषयक लघु प्रयोग हे कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण ठरले. वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशक्ती आणि संशोधनवृत्ती यांचे उत्कृष्ट दर्शन घडवत विद्यार्थ्यांनी विविध संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगातून स्पष्ट केल्या. पाहुण्यांच्या प्रश्नांना त्यांनी अभ्यासपूर्ण व नेमकी उत्तरे देत आपली तयारी सिद्ध केली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, पंचायत समिती वाई माननीय श्री. शरद गायकवाड व श्री. राहुल हजारे उपस्थित होते. शाळा समिती सदस्या माननीय सौ. घैसास मॅडम यांचीही उपस्थिती लाभली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ. विद्या राव यांच्या कुशल नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.
आपल्या मनोगतात मान्यवरांनी शाळेच्या उपक्रमशीलतेचे आणि विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचे मनःपूर्वक कौतुक केले. उपस्थित मातांना संबोधित करत त्यांनी सांगितले की, ज्या प्रकारे राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर संस्कारांची भक्कम पायाभरणी केली, तसेच मूल्याधिष्ठित शिक्षण आजच्या पिढीला देणे ही काळाची गरज आहे. सेवा, समर्पण आणि प्रामाणिकपणा या गुणांची शिदोरी घेऊन विद्यार्थ्यांनी आदर्श नागरिक बनावे, असे प्रेरणादायी आवाहनही त्यांनी केले.
ज्ञानार्जनासोबत संस्कारांची जोड देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची वाटचाल दृढ करणारा हा ‘प्रोजेक्ट डे’ शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची ठळक साक्ष ठरला.
2) वाई:-“तलावात खळाळलं स्वप्न!” कवठे-केंजळला सिंचनाचं वरदान; बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद.

वाई दि. ०१ : अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! कवठे-केंजळ उपसा सिंचन योजनेचे पाणी पहिल्यांदाच कवठे तलावात दाखल होताच संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. शेतीसाठी जीवनदायी ठरणाऱ्या या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षांना आता नवे पंख मिळाले आहेत.
दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आल्याने कवठे, केंजळ व आसपासच्या गावांतील शेतजमिनींचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे. पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या या भागाला आता शाश्वत पाणीपुरवठा मिळणार असल्याने बळीराजा सुखावला आहे.
राज्याचे मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले की, “ही योजना केवळ सिंचन प्रकल्प नसून शेतकऱ्यांच्या समृद्धीचा पाया आहे. नियमित पाणीपुरवठ्यामुळे पिकांची उत्पादकता वाढेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न उंचावेल.”
योजना पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या अधिकारी, अभियंते व कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. भविष्यात जलसंधारण व सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देऊन ग्रामीण विकासाला गती दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
3) वाई:-विकासासाठी ‘कमाई’चा नवा फॉर्म्युला; वाई पालिकेचे बजेट जिल्हाधिकाऱ्यांकडे, थकीतदारांना इशारा!
उत्पन्नवाढीवर नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा ठाम भर; अपूर्ण कामांवरही आक्रमक भूमिका.
वाई दि. ०१ : वाई नगरपालिका चे सन २०२५-२६ चे सुधारित व सन २०२६-२७ चे मूळ अंदाजपत्रक मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याच्या विशेष सभेत विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडण्यात आला. “उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करून वाईचा सर्वांगीण कायापालट करू,” असा विश्वास नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी व्यक्त केला.
सभेला उपनगराध्यक्ष घन:श्याम चक्के, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, आर्थिक सल्लागार सीए प्रविणा ओसवाल व विनय लोखंडे उपस्थित होते.
पालिकेचे उत्पन्न केवळ घरपट्टी व पाणीपट्टीपुरते मर्यादित न ठेवता अन्य पर्यायांचा शोध घेतला जाणार आहे. डेपोत कचरा टाकणाऱ्या ग्रामपंचायतींकडील थकीत रक्कम वसूल करण्यासाठी नोटिसा बजावल्या जाणार आहेत. पाचगणी व महाबळेश्वर च्या धर्तीवर पर्यटन कर आकारणीचा प्रस्तावही विचाराधीन आहे. थकीतदारांकडून १०० टक्के वसुली करण्याचे निर्देश देण्यात आले.
अर्धवट विकासकामांबाबत कडक पवित्रा घेत, मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करण्याचा इशारा नगरसेवक प्रसाद बनकर यांनी दिला. ठेकेदारांनी २० मार्चपर्यंत कामे पूर्ण करण्याची ग्वाही दिली असून गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणार नसल्याचे सचिन सावंत यांनी स्पष्ट केले.
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गणपती आळी ते जुनी नगरपालिका रस्त्यावरील विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. जुन्या भाजी मंडईच्या जागेवर तात्पुरते स्टॉल उभारून शिस्त लावली जाईल. ‘पे अँड पार्क’ योजना आणि भाजी मंडईचे विकेंद्रीकरण करण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला.
कृष्णा नदी चे प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक ७ कोटी रुपयांचा पालिकेचा वाटा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी दळवी यांनी दिली.
सभेच्या प्रारंभी नगरसेविका डॉ. जीविता जमदाडे यांनी ‘मराठी भाषा दिना’च्या शुभेच्छा देत पालिकेचे कामकाज मराठीतूनच व्हावे, अशी मागणी केली. सभेला सर्व नगरसेवक व विभाग प्रमुख उपस्थित होते. विषय पत्रिकेचे वाचन नारायण गोसावी यांनी केले.




