साताऱ्यात गुन्हेगारांचा उन्माद! करंजेत तरुणावर जीवघेणा हल्ला; ‘कोयता गँग’ पुन्हा सक्रिय.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

1) साताऱ्यात गुन्हेगारांचा उन्माद! करंजेत तरुणावर जीवघेणा हल्ला; ‘कोयता गँग’ पुन्हा सक्रिय.

सातारा प्रतिनिधी सारिका गवते
सातारा दि. २५ : सातारा शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी धुमाकूळ घालत दहशत निर्माण केली आहे. करंजे परिसरात सायंकाळच्या सुमारास एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले असून नागरिक संतप्त झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय रामदास गाडे (रा. करंजे पेठ नाका, सातारा) हा आपल्या कामात असताना अचानक काही हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढवला. अक्षयने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपींनी त्याला गंभीर जखमी केले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
जखमी अक्षय गाडे याने माध्यमांशी बोलताना सांगितले, “मी तिथे उभा होतो, अचानक त्यांनी माझ्यावर वार केला. कारण काय आहे, हे अजून समजलेले नाही.”
घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन मेटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून संबंधित टोळीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. साताऱ्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
2) वाई:-दिल्लीच्या कर्तव्यपथावर ‘वाई’चा डंका; अमरीन इनामदारचा वाई अर्बन बँकेतर्फे दिमाखदार गौरव!

वाई, दि. २५ : प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील कर्तव्यपथावर पार पडलेल्या भव्य संचलनात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चित्ररथाचे नेतृत्व करत अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या वाईची कन्या कु. अमरीन आजीम इनामदार हिचा दि वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड तर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
बँकेच्या संचालिका व नूतन नगरसेविका ज्योती गांधी यांच्या हस्ते अमरीनला सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. छोटेखानी परंतु दिमाखदार झालेल्या या सोहळ्याला बँकेचे अध्यक्ष अनिल देव, उपाध्यक्ष डॉ. शेखर कांबळे यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ उपस्थित होते.
यावेळी उपाध्यक्ष डॉ. शेखर कांबळे म्हणाले, “प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणे हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. अमरीनने केवळ सहभागच नोंदवला नाही, तर महाराष्ट्राच्या चित्ररथाचे नेतृत्व करून वाईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. देशभरात महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावणे ही अभिमानाची बाब असून, अमरीनचे योगदान मोलाचे आहे.”
अध्यक्ष अनिल देव यांनी अमरीनच्या जिद्दीचे विशेष कौतुक करत सांगितले, “किसनवीर महाविद्यालयात एम.ए.चे शिक्षण घेणारी अमरीन सामान्य कुटुंबातून पुढे आली आहे. अथक परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरेल.”
यावेळी संचालक रमेश ओसवाल, ॲड. बाळासाहेब पंडित, मकरंद मुळे, विवेक पटवर्धन, माधव कान्हेरे, काशिनाथ शेलार, महेश राजेमहाडिक, चंद्रकांत गुजर, प्रीतम भुतकर, स्वप्निल जाधव तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर काळे आणि सरव्यवस्थापक संतोष बागुल यांनी अमरीनचे अभिनंदन करून तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दिल्लीच्या कर्तव्यपथावर उमटलेली ‘वाई’ची मोहोर आणि त्यानंतर झालेला हा सन्मान सोहळा शहरासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
3) कराड:- मलकापुरात शिवशौर्याचा रंगोत्सव; रोटरी चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

कराड दि. २५ : कराड येथील Rotary Club of Malkapur आणि Rotaract Club of Malkapur यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली ‘भव्य रोटरी चित्रकला स्पर्धा २०२६’ उत्साहात पार पडली. “रंगांच्या माध्यमातून शिवविचार पेरूया, सेवाभावाने समाज घडवूया” या प्रेरणादायी घोषवाक्यासह शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातून शिवचरित्र जिवंत केले.
लहान गटापासून खुल्या गटापर्यंत विविध वयोगटातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी केवळ चित्रे रेखाटली नाहीत, तर स्वराज्याच्या इतिहासातील थरारक प्रसंगांना कागदावर आकार दिला. शिवजन्म सोहळा, प्रतापगडावरील अफझलखान वध, रायगडावरील सुवर्ण राज्याभिषेक, तसेच गड-कोट आणि मावळ्यांचे शौर्य अशा विषयांवरील कलाकृतींनी उपस्थितांची मने जिंकली. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या रंगसंगती, कल्पकता आणि ऐतिहासिक अचूकतेचे विशेष कौतुक केले.
स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र देत त्यांचा उत्साह वाढवण्यात आला.
या यशस्वी आयोजनासाठी क्लबचे अध्यक्ष रो. राहुल जामदार, सचिव रो. विजय दुर्गावळे आणि प्रोजेक्ट चेअरमन रो. उमेश यादव यांनी विशेष परिश्रम घेतले. क्लब सदस्यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे स्पर्धेला वेगळी उंची प्राप्त झाली.
मलकापूर परिसरातील पालक आणि शिक्षकांकडून या उपक्रमाचे मनापासून कौतुक होत असून, “सेवा आणि कला” यांचा सुंदर संगम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
4) कराड:-जिजाऊंच्या लेकीचा अपमान खपवून घेणार नाही! चिखला प्रकरणी कराडमध्ये भीमशक्तीचा एल्गार.

कराड, दि. २५ : बुलढाणा जिल्ह्यातील चिखला येथे एका शिवप्रेमी महिलेला करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेचे तीव्र पडसाद कराडमध्ये उमटले. या संतापजनक प्रकाराच्या निषेधार्थ भीमशक्ती सामाजिक संघटना आणि कराडमधील विविध सर्वपक्षीय संघटनांनी एकत्र येत प्रशासनाला निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
चिखला गावात एका शिवप्रेमी महिलेला निर्दयीपणे मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त होत आहे. या घटनेत संबंधित महिलेची विटंबना करण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकारामुळे समाजमन संतप्त झाले आहे. कराडमध्ये आज भीमशक्तीच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एकवटत प्रशासनाच्या दारात धडक देत निषेध नोंदवला.
“भीमशक्तीच्या महिला या रडणाऱ्या नव्हे, तर लढणाऱ्या रणरागिणी आहेत. माझ्या जिजाऊंच्या लेकीचा झालेला हा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही!” असा आक्रमक इशारा आंदोलकांनी दिला. महिलांच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. दोषींना कठोरात कठोर शिक्षा—फाशी किंवा जन्मठेप—दिली जावी, तसेच प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात संजय चव्हाण, प्रकाश काळे, लक्ष्मीताई काळे (मानव कल्याणकारी संघटना), दिपाली पुस्तके, अर्चना जाधव, सुवर्णाताई विटोळे (तालुकाध्यक्ष, भीमा कोरेगाव), जुबेदा मुजावर (सहारा फाउंडेशन), शबाना मुल्ला, उज्वला माळी, सहाना बागवान, वनिता कांबळे, दत्तात्रय पवार, संजय कांबळे, सलाम फकीर, संतोष बोलके, प्रशांत थोरवडे (वंचित बहुजन आघाडी), भागवत कांबळे, विकास लोंढे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा झाली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे. महिलांच्या सन्मानासाठी लढा सुरूच राहील, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.




