कराड:-कराडचा ‘सुसाईड पॉईंट’ आता होणार सुरक्षित; कृष्णा पुलावर संरक्षक जाळी बसवण्यास प्रारंभ!
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

1) कराड:-कराडचा ‘सुसाईड पॉईंट’ आता होणार सुरक्षित; कृष्णा पुलावर संरक्षक जाळी बसवण्यास प्रारंभ!

सातारा प्रतिनिधी सारिका गवते
कराड दि. २४ : कराडकरांची अनेक वर्षांची मागणी आणि ‘रक्षक प्रतिष्ठान’च्या सातत्यपूर्ण लढ्याला अखेर मोठे यश आले आहे. कराड-विटा रस्त्यावरील कृष्णा नदीच्या पुलावर संरक्षक जाळी बसवण्याच्या कामाला रविवारपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, यामुळे आता या पुलाला लाभलेली ‘सुसाईड पॉईंट’ ही ओळख पुसली जाणार आहे.
या कामासाठी ४० लाख ७९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून २ मीटर उंच आणि २ मीटर रुंद अशा विद्यानगर बाजूकडील पूर्व दिशेला ५ जाळ्या बसवून कामाचा श्रीगणेशा करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांत कृष्णा पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रमाण चिंताजनक वाढले होते. पुलाच्या कठड्यांची उंची कमी असल्याने येथे अपघात आणि आत्महत्येच्या घटना वारंवार घडत होत्या. तसेच, नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य आणि प्लास्टिक कचरा टाकला जात असल्याने प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर बनला होता. आता ही उंच जाळी बसवल्यामुळे आत्महत्या रोखण्यास मदत होईलच, शिवाय नदीपात्र स्वच्छ राहण्यासही मोठी मदत होणार आहे.
या जाळीसाठी रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोझर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी तहसील कार्यालयासमोर ४ दिवस लाक्षणिक उपोषण केले होते. या आंदोलनाची दखल घेत खा. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला लेखी पत्र देऊन जाळी बसवण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या. तसेच आ. डॉ. अतुलबाबा भोसले आणि नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनीही या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. हे काम युद्धपातळीवर पूर्ण करून पुलाच्या दोन्ही बाजू सुरक्षित केल्या जाणार आहेत.
2) लोणंद:-खेमावती नदी स्वच्छतेसाठी लोणंदमध्ये हजारो हात एकत्र; ‘प्रोजेक्ट अमृत’ने पर्यावरण जनजागृतीला नवा वेग!

लोणंद, दि. २३ : लोणंदच्या खेमावती नदीकाठी रविवारी स्वच्छता आणि वृक्षारोपणाचा भव्य उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या देशव्यापी ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत हा उपक्रम पार पडला.
लोणंद नगरपंचायत आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नदीपात्रातील प्लास्टिक व इतर कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. यासोबतच नदीकाठाच्या संरक्षणासाठी ११० बांबूच्या रोपांची लागवड करण्यात आली.
“भक्ती ही केवळ शब्दांत नव्हे, तर आचरणातून प्रकट व्हावी,” या सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शिकवणुकीचा प्रत्यय या मोहिमेतून आला. स्वच्छता मोहिमेनंतर झालेल्या सत्संगामध्ये बाह्य स्वच्छतेबरोबरच मनशुद्धीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
सासवड, निंबोडी, हिंगणगाव आणि सालपे येथील शेकडो स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी मोहिमेचे नियोजन केले.
या अभियानाला मुख्याधिकारी दत्तात्रेय गायकवाड, नगराध्यक्षा मधुमती गालींदे आणि उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील ९३० शहरांमध्ये १६०० हून अधिक ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला असून सुमारे १२ लाख स्वयंसेवकांनी श्रमदान केले आहे. तसेच बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या विचारांना या माध्यमातून कृतीरूप देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी लोणंद नगरपालिकेचे सर्व आजी-माजी नगरसेवक, कर्मचारी आणि निरंकारी अनुयायांनी विशेष परिश्रम घेतले.
3) कराड:-वीर बॅक अॅनिमल हेल्थ इंडियातर्फे मलकापूरच्या स्टार इंग्लिश मीडियम स्कूलला १०० बेंचेसची भेट.

कराड दि. २४ : सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून वीर बॅक अॅनिमल हेल्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मलकापूर येथील स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजला १०० बेंचेसची देणगी दिली आहे. या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या बसण्याची उत्तम सोय झाली असून परिसरातून या मदतीचे कौतुक होत आहे.
या विशेष कार्यक्रमासाठी वीर बॅक कंपनीचे प्रमुख पदाधिकारी आणि संस्थेचे चालक उपस्थित होते. तसेच सुहास मेंढे (एरिया बिजनेस मॅनेजर), अक्षय घोरपडे (बिझनेस ऑफिसर), शरद थोरात, तोफिक मुल्ला, संस्था प्रतिनिधी अशोकराव किसन थोरात (सचिव), डॉ. स्वाती थोरात (संचालिका व नगरसेविका, मलकापूर) आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम व पर्यवेक्षिका करंडे मॅडम यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सुहास मेंढे यांनी वीर बॅक कंपनीच्या सामाजिक कार्याची माहिती दिली, तर डॉ. स्वाती थोरात यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका चव्हाण यांनी केले, तर आभार मनीषा काळे यांनी मानले.
4) लोणंदमध्ये ‘द्वारका लेडीज गारमेंट’चा दिमाखदार शुभारंभ; महिलांसाठी फॅशनचा नवा पत्ता!

लोणंद दि. २४ : लोणंदच्या बाजारपेठेत सौंदर्याला नव्या फॅशनची जोड देण्यासाठी सज्ज झालेल्या ‘द्वारका लेडीज गारमेंट’ या भव्य दुकानाचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. अमोल ज्वेलर्सच्या वरच्या मजल्यावर असलेल्या या आकर्षक शोरूममुळे लोणंदमधील महिला ग्राहकांना आता एकाच छताखाली दर्जेदार वस्त्रांचा खजिना उपलब्ध झाला आहे.
या सोहळ्याचे शुभहस्ते उद्घाटन संत निरंकारी मंडळाचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने, लोणंद ब्रँचचे मुखी व नगरसेवक सागर शेळके यांची विशेष उपस्थिती लाभली.
व्यावसायिक प्रगतीसोबतच शहराच्या वैभवात भर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना नंदकुमार झांबरे म्हणाले की, “द्वारका लेडीज गारमेंट हे दुकान केवळ व्यवसायाचे केंद्र न राहता, लोणंद शहराच्या सौंदर्यात आणि प्रतिभेत भर घालणारे ठरेल. महिलांना हव्या असलेल्या उत्तम दर्जाच्या फॅशनसाठी आता इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही.”
लोणंद पंचक्रोशीतील नागरिक आणि संत निरंकारी मंडळाच्या सदस्यांनी मोठी गर्दी केली होती. शशिकांत कुंभार, मनोज ढमाळ, मोहन झगडे, गुलाबराव वाघुले, गोविंद धामणकर, सीमा धामणकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांनी दुकानाच्या अंतर्गत सजावटीचे कौतुक करत व्यवसायाला भरभराटी मिळो, अशी मंगलकामना व्यक्त केली.
लोणंद बाजारपेठेच्या मध्यवर्ती भागात सुरू झालेल्या या नव्या दालनामुळे स्थानिक व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे. सण-समारंभ आणि रोजच्या वापरासाठी लागणारे आकर्षक लेडीज गारमेंट आता नव्या स्वरूपात आणि रास्त दरात उपलब्ध झाल्याने महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
5) पाटण:-यवडजाईनगरमध्ये कर्तृत्वाचा जागर: प्रगती ट्रस्टतर्फे ‘मरणोत्तर समाजरत्न’ पुरस्काराने स्व. तात्यासाहेब माने यांचा गौरव.

पाटण दि. २४ : समाजासाठी निस्वार्थपणे झटणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेत, वडजाईनगर येथे प्रगती ट्रस्टतर्फे विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. यामध्ये निर्मल ग्राम मान्याचीवाडीचे शिल्पकार आणि पहिले आदर्श सरपंच स्व. तात्यासाहेब माने यांना मरणोत्तर ‘समाजरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मान्याचीवाडी गावाचा कायापालट करून गावाला ‘निर्मल ग्राम’ची ओळख मिळवून देण्यात स्व. तात्यासाहेब माने यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या या सामाजिक योगदानाची कृतज्ञता म्हणून हा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
स्व. तात्यासाहेब माने यांच्या वतीने त्यांच्या पत्नी आणि आदर्श मुख्याध्यापिका श्रीमती सुलभा तात्यासाहेब माने यांनी हा पुरस्कार अत्यंत भावूक वातावरणात स्वीकारला. यावेळी मान्याचीवाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यांनी आपल्या लाडक्या सरपंचांच्या आठवणींना उजाळा दिला.
प्रगती ट्रस्टने आयोजित केलेल्या या सोहळ्यात समाजातील विविध स्तरांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. “समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे,” अशी भावना ट्रस्टच्या वतीने व्यक्त करण्यात आली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रगती ट्रस्टचे पदाधिकारी आणि वडजाईनगरमधील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
6) वाई:-संत गाडगेबाबांचे विचार आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली!

वाईत १५० व्या जयंतीनिमित्त नगराध्यक्ष अनिल सावंत यांचे प्रतिपादन; समाजमंदिराच्या नूतनीकरणाचे दिले आश्वासन.
वाई दि. २४ : “संत गाडगेबाबा महाराजांनी स्वच्छता, सेवा आणि समाजजागृतीचा जो महान संदेश दिला, तो केवळ भाषणापुरता मर्यादित न ठेवता प्रत्येक नागरिकाच्या आचरणात उतरला पाहिजे. संतांच्या विचारांवर चालणारे शहरच खऱ्या अर्थाने प्रगत होते,” असे प्रतिपादन वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी केले.
संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वाई शहरातील परिट समाजाच्या वतीने संत गाडगेबाबा महाराज न.पा. शाळा क्र. ६ येथील समाज मंदिरात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
नगराध्यक्ष सावंत पुढे म्हणाले की, “गाडगेबाबांनी स्वतः हातात झाडू घेऊन समाजाला स्वच्छतेचा आदर्श घालून दिला. आज आपल्या शहरात स्वच्छता, शिक्षण आणि सामाजिक एकोपा जपण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. कृष्णाकाठावरील या समाजमंदिराची अवस्था सध्या काहीशी खराब असली, तरी येत्या काळात त्याची योग्य पद्धतीने डागडुजी करून एक सुंदर वास्तू तयार करण्यात येईल,” असे आश्वासनही त्यांनी यावेळी समाजबांधवांना दिले.
यावेळी उपनगराध्यक्ष घनशाम चक्के, नगरसेवक भारत खामकर, प्रसाद बनकर, नगरसेविका सौ. अपर्णा जमदाडे, सौ. पदमा पाडळे-जाधव, माजी नगरसेविका सौ. स्मिता हगीर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक भारत खामकर व प्रसाद बनकर यांनीही आपले विचार व्यक्त करताना, गाडगेबाबांच्या विचारातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
सकाळी समाजबांधवांच्या वतीने शाळा क्र. ६ येथील बाबांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी समाजाला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. लाखानगर भजनी मंडळाने सादर केलेल्या भजन सेवेबद्दल सर्व कलावंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्याचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमार पवार यांनी केले. कार्यक्रमासाठी अशोक दळवी, ज्ञानेश्वर वाघ, बंडू दळवी, प्रदीप दळवी, उमेश माने यांच्यासह परिट समाजातील महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
7) पाचगणी:-पाचगणीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षांची सक्तमजुरी
अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचा कठोर निर्णय; १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
पाचगणी, दि. २४ : पाचगणी येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने २० वर्षांची सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. वसीम अकबर हुसेन रजा (वय २९) असे दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सप्टेंबर २०२३ मध्ये ही घटना उघडकीस आली होती. आरोपीने अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला होता. त्यानंतर तिचे व्हिडिओ व छायाचित्रे काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली होती. पीडित मुलीने धैर्य दाखवत तक्रार नोंदवल्यानंतर पाचगणी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास महाबळेश्वर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक एस. के. भागवत यांनी केला व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांच्या न्यायासनासमोर खटल्याची सुनावणी पार पडली.
अतिरिक्त सरकारी वरिष्ठ वकील दयाराम एस. पाटील व सहायक सरकारी वरिष्ठ वकील महेश यु. शिंदे यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. एकूण १० साक्षीदारांची साक्ष व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत विविध कलमान्वये २० वर्षांची सक्तमजुरी व १५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
या प्रकरणाच्या तपासासाठी सातारा पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने काम केले.
न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी भुजंगराव काळे, कीर्तीकुमार कदम, सुधाकर संपकाळ, अविनाश ढेरे, हेमा कदम, शिवाजी पांब्रे व प्रीतम नाळे यांनी सहकार्य केले.
8) वाई:- २० वर्षांच्या प्रलंबित मागण्यांवरून वाई शासकीय मुद्रणालयात ठिय्या; उद्या राज्यभर लाक्षणिक संपाचा इशारा – मंत्री उदय सामंत यांना निवेदन सादर; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

वाई, दि. २४ : गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रेस फेडरेशनच्या वतीने वाई येथील शासकीय मुद्रणालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. २० ते २४ फेब्रुवारी दरम्यान दररोज दोन तास निदर्शने करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
या आंदोलनाची पुढील पायरी म्हणून २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व शासकीय मुद्रणालयांमध्ये एक दिवसाचा राज्यव्यापी ‘लाक्षणिक संप’ पुकारण्यात आल्याची घोषणा संघटनेने केली आहे.
प्रमुख मागण्या
शासकीय मुद्रणालयातील कामगारांचे अनेक प्रश्न गेल्या २० वर्षांपासून रखडलेले असल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये —
रिक्त पदांची तातडीने भरती
मुद्रण यंत्रसामग्रीचे आधुनिकीकरण
दुसरा व चौथा शनिवार सुटी लागू करणे
मुद्रण भत्त्यात वाढ व वेतनातील तफावत दूर करणे
नवीन सेवा प्रवेश नियम लागू करणे
रखडलेल्या पदोन्नती प्रक्रिया मार्गी लावणे
या मागण्यांचा समावेश आहे.
मंत्री उदय सामंत यांना निवेदन
आंदोलनादरम्यान मराठी भाषा व औद्योगिक विकास मंत्री उदय सामंत यांना कामगारांच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन देण्यात आले. राज्य सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत असून, सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
फेडरेशनचे प्रतिनिधी सुदन कांबळे आणि संघटनेचे अध्यक्ष सागर राणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी निलेश साळुंखे, शंकर इथापे, पिसाळ यांच्यासह सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“२० वर्षांपासून केवळ आश्वासने मिळत आहेत. आता ठोस निर्णयाची अपेक्षा आहे. उद्याच्या लाक्षणिक संपानंतरही दखल घेतली नाही, तर पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा कर्मचारी प्रतिनिधींनी दिला आहे.




