आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-वेलंगमध्ये उद्यापासून जनावरांचा जंगी बाजार.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

1) वाई:-वेलंगमध्ये उद्यापासून जनावरांचा जंगी बाजार.

 वाई प्रतिनिधी सारिका गवते

वाई दि. २० : सातारा जिल्ह्यातील पशुपालक व व्यापाऱ्यांची ‘पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या वेलंग (ता. वाई) येथे शनिवार, दि. २१ फेब्रुवारी २०२६ पासून भव्य ‘जनावरांचा वार्षिक बाजार’ भरत आहे. वाई शेती उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील हा बाजार पुढील सुमारे १५ दिवस चालणार असून, राज्यभरातून तसेच कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणावर व्यापारी व शेतकरी येथे दाखल होणार आहेत.

खिलारसह विविध नामांकित जातींच्या उत्कृष्ट जनावरांची खरेदी-विक्री होणार असून, कोट्यवधी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. बाजारातील प्रमुख आकर्षण असलेल्या ‘जनावरांच्या बक्षीस समारंभा’त उत्कृष्ट जनावरांची निवड करून दि. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते ४ दरम्यान मालकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
बाजारासाठी पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, स्वच्छता व वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करण्यात आली असून, शेतकरी व व्यापाऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाई शेती उत्पन्न बाजार समिती प्रशासन व वेलंग ग्रामस्थ मंडळ यांनी केले आहे.

2) कराड:-सूरांच्या लयीत मलकापूर न्हाऊन निघाले! २६ शाळांचा ‘ताल’; ४१० विद्यार्थ्यांचा जल्लोष.

कराड दि. १९ : मलकापूर येथे रंगलेल्या भव्य समूहगीत गायन स्पर्धेने संपूर्ण परिसर अक्षरशः सूरमयी केला. श्री मळाई देवी शिक्षण संस्था आणि समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत कराड तालुक्यातील तब्बल २६ शाळांमधील ४१० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या सुरेल सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शिक्षण विस्ताराधिकारी जमीला मुलानी यांनी अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळत असल्याचे सांगत भविष्यातील सक्षम कलावंत घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर शिंदे यांनी समूहगीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना, संवेदनशीलता आणि धर्मनिरपेक्षतेचे संस्कार दृढ होत असल्याचे नमूद केले. तर अशोकराव थोरात यांनी या स्पर्धेच्या तब्बल ३० वर्षांच्या अखंड परंपरेचे कौतुक करत हा उपक्रम “निखळ स्पर्धेची खरी पावती” असल्याचे गौरवोद्गार काढले.
स्पर्धेचे प्रास्ताविक जे. बी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सविता पाटील यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभार प्रदर्शन कोमल पवार यांनी केले. संगीत शिक्षक शरद तांबवेकर यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी केंद्रप्रमुख गणेश जाधव, सचिन शिंदे, पंडित शिर्के, सुलोचना भिसे, सुजाता भावके, जयंती पटेल, अभिजीत भोपते, शेखर शिर्के, एम. पी. फराळे यांच्यासह शिक्षक, पालक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🏆 स्पर्धेचा निकाल (विजेते संघ)
🔹 मोठा गट
🥇 प्रथम: कै. दत्तात्रय उत्तमराव यादव हायस्कूल, आरेवाडी
🥈 द्वितीय: श्री संत तुकाराम हायस्कूल (कराड), आत्माराम विद्यालय (ओगलेवाडी), केदार हायस्कूल (सुपने)
🥉 तृतीय: यशवंत हायस्कूल (कराड), जि. प. शाळा आगाशिवनगर नं. १
🌟 उत्तेजनार्थ: रोटरी प्राथमिक विद्यालय (मलकापूर), जि. प. शाळा नांदलापूर
🔹 लहान गट
🥇 प्रथम: जि. प. शाळा आगाशिवनगर नं. १
🥈 द्वितीय: रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल (मलकापूर), जि. प. केंद्रशाळा मलकापूर
🥉 तृतीय: जि. प. शाळा हौदमळा, जि. प. शाळा विश्रामनगर
🌟 उत्तेजनार्थ: जि. प. शाळा लाहोटी नगर, जि. प. शाळा कोयना वसाहत
🎼 एकूणच, सुरांच्या संगतीत रंगलेल्या या स्पर्धेने मलकापूरच्या सांस्कृतिक परंपरेला नवा आयाम देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उजाळा दिला.

3) कराड:- मूकबधिर विद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष; शिवविचारांचा प्रेरणादायी संदेश.

कराड दि. १९ : हजारमाची (कराड) येथील सदाशिव कॉलनीमधील मूकबधिर विद्यालय आज शिवमय झाले होते. जनहिताय फाउंडेशनच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिक प्रल्हाद ताटे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. “शौर्य, स्वराज्य आणि न्याय” या शिवविचारांचा जागर करत उपस्थितांनी महाराजांना अभिवादन केले.
या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांना लाडू व चिवडा वाटप करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद आणि उपस्थितांचा उस्फूर्त प्रतिसाद यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत चढली.
जनहिताय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे, सदस्य राजेंद्र ताटे, राजू गवार, पोपट केसरे, सागर कोळी, श्रेयस ताटे, आराध्या ताटे, विजय लांडगे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवजयंती निमित्ताने समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत शिवरायांचे विचार पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. विद्यालय परिसरात देशभक्तीचा जल्लोष आणि प्रेरणेची उर्जा अनुभवायला मिळाली.

4) वाई:- कळंभे गावातील ‘लालपरी’चा मुक्काम बंद; विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात!

आगार व्यवस्थापकांना निवेदन; दोन दिवसांत सेवा सुरू न झाल्यास आक्रमक पवित्र्याचा इशारा

वाई, दि. २० : कळंभे (ता. वाई) येथील ‘लालपरी’चा मुक्काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. बसअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, काही पालकांनी सुरक्षेच्या कारणास्तव मुलींना शाळेत पाठवणे थांबवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
गावातून धावणारी एसटी सेवा विस्कळीत झाल्याने विशेषतः परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना वेळेत केंद्रावर पोहोचणे कठीण झाले आहे. बस वेळेवर नसल्याने अनेकांना पायपीट करावी लागत असून, त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थांच्या मते, शाळा-कॉलेजच्या वेळेनुसार बसचे वेळापत्रक आखल्यास प्रवाशांची संख्या वाढून महामंडळालाही चांगले उत्पन्न मिळू शकते.
या पार्श्वभूमीवर कळंभे गावचे सुपुत्र व माजी उपसरपंच हणमंतराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी वाई आगार व्यवस्थापक युवराज कदम यांना निवेदन सादर करून तातडीने मुक्कामी बस सुरू करण्याची मागणी केली. “गावात मुक्कामी एसटी असणे ही चैनीची गोष्ट नसून विद्यार्थ्यांची अत्यावश्यक गरज आहे. दोन दिवसांत सेवा सुरू न झाल्यास ग्रामस्थ आक्रमक भूमिका घेतील,” असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असून, यावेळी यशवंत शिवथरे, डॉ. रणजीत गायकवाड, अनिल शिवथरे, मदन वाघ यांसह अनेक नागरिक उपस्थित होते.
आता विद्यार्थ्यांचे भविष्य आणि ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन प्रशासन तातडीने पावले उचलेल का? की कळंभेकरांना ‘लालपरी’साठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

5) वाई:-धोम जलपर्णीच्या विळख्यात! – पर्यटन मंत्र्यांच्या जिल्ह्यात ऐतिहासिक तीर्थक्षेत्राची दुर्दशा; प्रशासन झोपेतच?

वाई, दि. २० : प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे आणि धौम्य ऋषींच्या वास्तव्याने पावन झालेले धोम तीर्थक्षेत्र आज जलपर्णीच्या विळख्यात सापडले आहे. पाप धुणाऱ्या कृष्णामाईच्या डोहावर हिरव्या गालिच्याचे साम्राज्य पसरले असून भाविक-पर्यटकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
धोम धरणच्या पायथ्याशी वसलेली प्राचीन दगडी मंदिरे, नरसिंह मंदिर, शिवशंकर मंदिर आणि गायमुखातून वाहणारा कृष्णा प्रवाह हे या भागाचे ऐतिहासिक वैभव मानले जाते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण डोह जलपर्णीने झाकला गेला असून पवित्र स्नान करणेही अवघड झाले आहे.
काही वर्षांपूर्वी तत्कालीन सरपंचांनी स्वखर्चातून जलपर्णी हटवून डोह मोकळा केला होता. मात्र त्यानंतर प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नसल्याने पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे.
विशेष म्हणजे सातारा जिल्ह्याला शंभूराज देसाई यांच्या रूपाने पर्यटन मंत्री लाभले आहेत. पर्यटन खात्याची धुरा जिल्ह्याकडे असतानाही ऐतिहासिक स्थळाची अशी अवस्था असल्याने ‘दिव्याखाली अंधार’ असल्याची भावना ग्रामस्थांत व्यक्त होत आहे. “घोषणा नव्हे, कृती हवी,” अशी आक्रमक भूमिका आता स्थानिकांनी घेतली आहे.
प्रमुख मागण्या
कृष्णा डोहाची तातडीने स्वच्छता
घाट दुरुस्ती व सुरक्षितता
मंदिर परिसराचा विकास आराखडा
बोटिंग, पार्किंग व प्रकाशयोजना
मार्गदर्शक फलक व मूलभूत सुविधा
धोममध्ये पर्यटनाच्या मोठ्या संधी असतानाही दुर्लक्षामुळे हे तीर्थक्षेत्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आता प्रशासन जलपर्णी हटवून कृष्णामाईला मोकळा श्वास देणार की पुन्हा कागदी आश्वासनांची आतषबाजी करणार, याकडे संपूर्ण पश्चिम भागाचे लक्ष लागले आहे.

6) वाईत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची मागणी; तहसीलदारांना निवेदन.

वाई, दि. २० : राज्यात ‘लव्ह जिहाद व अवैध धर्मांतर विरोधी’ कठोर कायदा तातडीने संमत करावा, या मागणीसाठी आज वाई येथे हिंदु जनजागृती समिती आणि सकल हिंदु समाज यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. उत्तर प्रदेश व उत्तराखंडच्या धर्तीवर अजामीनपात्र तरतुदींसह कठोर कायदा करावा, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात राज्यातील महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. National Crime Records Bureau (NCRB) च्या आकडेवारीचा हवाला देत २०१९ ते २०२१ दरम्यान सुमारे १,७८,४०० महिला बेपत्ता झाल्याचे नमूद करण्यात आले. तसेच १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत ३७,६१५ महिला बेपत्ता झाल्याचा दावा करत दिवसाला सरासरी १०३ महिलांच्या बेपत्ता होण्याची नोंद असल्याचे सांगण्यात आले. यापैकी काही प्रकरणांमध्ये मानवी तस्करी किंवा ‘लव्ह जिहाद’चा संशय असल्याचे निवेदनात नमूद आहे.
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा होईल असा कठोर कायदा लागू करणे, प्रत्येक जिल्ह्यात DySP दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करणे, सहा महिन्यांत खटल्यांचा निकाल लावण्यासाठी विशेष न्यायालये उभारणे, तसेच आंतरधर्मीय विवाह किंवा धर्मांतरापूर्वी ६० दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज व पोलिस चौकशी अनिवार्य करणे, अशा प्रमुख मागण्या मांडल्या.
काही गाजलेल्या घटनांचा संदर्भ देत सरकारने या अधिवेशनात ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी वाई परिसरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

7) वाई:- मृत्यूचा सापळा बनलेला वाई-धोम मार्ग; नावेची वाडी येथे रस्ता खचला, प्रशासन झोपेत?

वाई दि. २० : वाई तालुक्याच्या पश्चिम भागाला जोडणारा महत्त्वाचा वर्दळीचा वाई-धोम रस्ता सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. नावेची वाडी येथे रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात खच पडल्याने अपघातांचा धोका वाढला असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरीही नगरपालिका बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे.
धोम धरण जलाशयाकडे जाणाऱ्या या प्रमुख मार्गावर दररोज पर्यटक, शेतकरी व स्थानिक नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, नावेची वाडी येथील रस्ता खचल्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या असून काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत. वाहनांचे नुकसान तर होतच आहे, पण या खड्ड्यांमुळे प्रवाशांना पाठीचे व मणक्याचे त्रासही सहन करावे लागत आहेत.
निवडणुकीच्या काळात याच रस्त्यावरून आश्वासनांची बरसात करणारे लोकप्रतिनिधी आता या समस्येकडे डोळेझाक करत आहेत का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. “प्रशासन नेमके कुणाच्या बळीची वाट पाहत आहे?” असा थेट प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
स्थानिकांच्या मते, नगरपालिका बांधकाम विभागाचे अधिकारी केवळ एसी कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवत आहेत. प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ दुरुस्ती न केल्यास भविष्यात होणाऱ्या मोठ्या अपघातास पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, नावेची वाडी येथील रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. आता प्रशासन जागे होणार की आणखी एखाद्या दुर्घटनेची वाट पाहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button