कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-बिबट- मानव संघर्ष;एक राष्ट्रीय समस्या – श्री अमर मोकाशी वरिष्ठ पत्रकार

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सातारा:-बिबट- मानव संघर्ष;एक राष्ट्रीय समस्या – श्री अमर मोकाशी वरिष्ठ पत्रकार.

बिबट- मानव संघर्ष; एक राष्ट्रीय समस्या
(श्री. अमर मोकाशी, वरिष्ठ पत्रकार – ७३५००१०३०३)
गेल्या चार- पाच वर्षांपासून आपल्या देशात बिबट (बिबळ्या अथवा बिबट्या) हा प्राणी खूपच चर्चेत आला आहे. सन २०२४ च्या गणनेनुसार भारतात १३,८७४ एवढे बिबटे असल्याचे सांगण्यात येते पण, आज मितीला ढोबळ आकडेवारीनुसार बिबट्यांची संख्या २० हजारावर पोचल्याचे वास्तव असून इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्रात जास्त बिबटे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बिबट्यांची वाढती संख्या ही एक राष्ट्रीय समस्या झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांचा शहरी आणि ग्रामीण भागात म्हणजेच मानवी वस्तीमध्ये वावर खूपच वाढला असून त्याचा परिणाम म्हणजे ‘बिबट- मानव संघर्ष’ अटळ झाला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बिबट्याने मानवावर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत आणि आजही घडत आहेत. बिबट- मानव संघर्षात काही लोकांचा बळी सुद्धा गेला असून यामध्ये लहान मुलांचा जास्त समावेश आहे. बिबट्यांचा मानवी वस्तीतला वावर हा मानवासाठी अत्यंत धोकादायक झाला असून ही समस्या सोडवणे खूपच कठीण होऊन बसले आहे.
भारतातील वाढती लोकसंख्या, परिणामी होणारी जंगल तोड यामुळे नैसर्गिक वने कमी होत आहेत आणि त्यामुळे बिबट शिकारीसाठी मानवी वस्तीमध्ये घुसत असल्याचे निष्पन्न झाले असले तरी, ही बाब आता मानवासाठी चिंताजनक बनली आहे. अपुरे जंगल, वन्य प्राण्यांच्या शिकारीचे वाढते प्रमाण हेही बिबट- मानव संघर्षाचे कारण आहे. प्रामुख्याने भटक्या कुत्र्यांच्या शिकारीसाठी बिबट्या मानवी वस्तीत घुसत आहे. एकदा शिकार मिळाली की बिबट्या पुन्हा पुन्हा मानवी वस्तीत शिकारीसाठी येत आहे आणि त्याचा विपरीत परिणाम मानवी जीवनावर झाल्याचे पाहायला मिळत आहे.
भटके अथवा पाळीव कुत्रे, शेळ्या, मेंढ्या यासह इतर पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना बिबट्याने ठार मारल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत आणि घडत आहेत. बिबट एवढ्यावरच थांबला नसून आता तो थेट मानवावर हल्ले करू लागला आहे. दररोज अशा अनेक घटना घडत असून अनेक गावांमध्ये, शहरांमध्ये बिबट्यांची दहशत वाढली आहे. हे जर थांबले नाही तर, बिबट्या जंगल सोडून मानवी वस्तीतच आपला अधिवास निर्माण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बिबट- मानव संघर्ष रोखणे ही काळाची गरज आहे अन्यथा बिबट्यांचा वावर असलेल्या भागात मानवाला घराबाहेर पडणे मुश्किल होणार आहे, किंबहुना अनेक ठिकाणी अशी परिस्थिती निर्माणही झाली आहे.
ज्या भागात बिबट्यांची दहशत वाढली आहे त्या भागातील लोक भयभीत अवस्थेत, जीव मुठीत घेऊन जगत आहेत. बिबट्या थेट गळा अथवा मानेवर हल्ला करतो त्यामुळे काही ठिकाणी शेतात काम करणाऱ्या लोकांनी गळ्याभोवती टोकदार खिळे असलेले पट्टे बांधणे, हा उपाय शोधला आहे. त्याचपद्धतीने कुत्रे किंवा इतर पाळीव प्राण्यांच्याही गळ्यात तसे पट्टे बांधून त्यांना बिबट्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा उपाय काहीसा योग्य असला तरी तो कायमचा उपाय होऊ शकत नाही! ठीकठिकाणी बिबट्यांची दहशत वाढत असताना वन विभागाकडून मात्र कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. बिबट्या आला की सायरन वाजतो आणि त्याची कल्पना थेतील लोकांना होते,लोक सावध होतात, असा उपाय काही ठिकाणी अंमलात आणला जात आहे. बिबट्यांची नसबंदी करून त्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेण्याचाही उपाय करण्यात येत असला तरी, बिबट- मानव संघर्ष टाळण्यासाठी हे सर्व उपाय तोकडेच ठरणारे आहेत.
बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी सापळा लावून बिबट्याला पकडून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले जात आहे. हा उपाय सुद्धा तात्पुरता ठरत असून बिबट्या पुन्हा मानवी वस्तीत येणार नाही, यासाठी सर्वच उपाय फोल ठरत आहेत. बिबट्यापासून पाळीव प्राण्यांचे सोडाच दस्तुरखुद्द मानवाचे संरक्षण कसे करायचे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जंगलात हजारो शेळ्या, मेंढ्या सोडायच्या म्हणजे बिबट्या मानवी वस्तीत येणार नाही असे उपाय सुचवून काहीजण आपल्या अकलेचे तारे तोडत आहेत. बिबट्या त्याच्यापेक्षा कमी उंचीच्या प्राण्यावर हल्ला करतो, त्यामुळे बिबट्या दिसल्यास पळून न जात हात उंचावून आरडाओरडा केल्यास बिबट्या पळून जातो, हे जरी खरे असले तरी यातून मानव जाती समोरचा धोका टळणार आहे का? याचा गांभीर्याने विचार करणे अपेक्षित आहे. बिबट्या हा एकटाच राहतो आणि रात्रीचा फिरत असतो. तो चढाई करण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो आणि दिवसा झाडांच्या फांद्यावर विश्रांती घेतो, केलेली शिकार झाडावर नेतो आणि लटकवतो. तो खूप चपळ असतो आणि ५८ किमी/तास पेक्षा जास्त वेगाने धावू शकतो, ६ मीटर (२० फूट) पेक्षा जास्त लांब उडी मारू शकतो आणि ३ मीटर (उमरे १० फूट) पर्यंत उभी उडी मारू शकतो. तो अनेक आवाज काढतो, ज्यामध्ये गुरगुरणे, गर्जना, म्याऊ यांचा समावेश आहे. बिबट्या हा एक संधीसाधू शिकारी आहे आणि त्याचा आहार खूप विस्तृत आहे. त्याच्या प्रचंड कवटीच्या आणि शक्तिशाली जबड्याच्या स्नायूंमुळे तो त्याच्या वजनापेक्षा मोठी शिकार करण्यास सक्षम आहे, अशी बिबट्याची संपूर्ण माहिती आता लोकांना झाली आहे. त्यामुळे लोकांना हे समजून सांगत बसण्यापेक्षा बिबट्यापासून मानवाचे संरक्षण कसे करायचे? याचा विचार वन विभाग आणि सरकारने केला पाहिजे.
शेतीयोग्य जमिनीचा विस्तार, मानवाने आणि त्याच्या पशुधनाने वन संरक्षित क्षेत्रात केलेले अतिक्रमण हे वन्य प्राण्यांचा अधिवास नष्ट होण्यास आणि वन्य शिकार कमी होण्यास कारणीभूत ठरणारे मुख्य घटक आहेत. परिणामी, बिबटे मानवी वस्त्यांकडे जातात, जिथे त्यांना कुत्रे, डुक्कर आणि शेळ्या- पाळीव प्राणी शिकार म्हणून उपलब्ध होतात. त्यामुळे बिबटे मानवी वस्तीच्या परिघावर शिकार करण्यास प्रवृत्त होतात. त्यामुळे मानव-बिबट्या संघर्षाची परिस्थिती उद्भवली असून अलिकडच्या वर्षांत त्यात मोठी वाढ झाली आहे. बिबट्यापासून आपाले संरक्षण करा, लांब रहा, घराजवळील अडगळ, झुडपे तोडा हे सगळं ठीक आहे. लोक बिबट्यापासून सुरक्षित राहण्यासाठी त्यांच्या परीने काळजी घेतच आहेत पण, मानवी वस्तीत बिबट्यांची असणारी दहशत कशी मोडीत काढायची याचे कायमचे उत्तर शोधणे अपेक्षित आहे. वन्य प्राणी जगलेच पाहिजेत, यामध्ये कोणाचेही दुमत नाही. परंतु, एखाद्या विशिष्ट प्राण्याकडून मानव जाती धोक्यात येत असेल तर? हा केवळ एक प्रश्न नाही तर ही एक राष्ट्रीय समस्या आहे. या समस्येचे गांभीर्य ओळखून बिबट- मानव संघर्ष टाळण्यासाठी ठोस आणि योग्य उपाय तात्काळ न शोधल्यास मानवाला घराबाहेर फिरणे मुश्किल होऊन बसेल! त्यामुळे बिबट- मानव संघर्षावर योग्य तोडगा काढणे हे एक मोठे आव्हान बनले आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button