विटा:-शिवप्रताप मल्टीस्टेटच्या वतीने राजमाता जिजाऊ समाजरत्न महिला सन्मान पुरस्कार वितरण.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

शिवप्रताप मल्टीस्टेटच्या वतीने राजमाता जिजाऊ समाजरत्न महिला सन्मान पुरस्कार वितरण.

विटा (जि. सांगली) –
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., विटा यांच्या वतीने “राजमाता जिजाऊ समाजरत्न महिला सन्मान पुरस्कार सोहळा” अत्यंत उत्साहात, प्रेरणादायी आणि गौरवशाली वातावरणात पार पडला. महिलांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याचा सन्मान म्हणून प्रजापिता ब्राम्हकुमारीजच्या प्रशासिका नंदा बहीणजी , संस्थेचे व्हा .चेअरमन मा.हणमंतराव सपकाळ , कार्यकारी संचालक अॅड. मा.विठ्ठलराव साळुंखे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले .
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, राजमाता जिजाऊ व स्व .प्रतापशेठ दादा साळुंखे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना समाजरत्न महिला सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना संस्थेचे कार्यकारी संचालक अॅड. मा.विठ्ठलराव साळुंखे यांनी सांगितले की, राजमाता जिजाऊ यांच्या विचारांवर चालत महिलांच्या सक्षमीकरणासाठी असे उपक्रम राबविणे ही संस्थेची सामाजिक जबाबदारी आहे. महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान केल्यास समाज अधिक सक्षम आणि सुदृढ होतो. शिवप्रताप मल्टीस्टेट नेहमीच समाजहिताचे उपक्रम राबवत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
डॉ. कुमोदिनी नष्टे, अधिवक्ता शौर्या पवार, स्वाती शिंदे-पवार, पुष्मा निकम, मीनाताई फिरमे, सलोनी आडेकर, निकिता खाडे आणि शुभांगी सुर्वे यांनी आपल्या मनोगतातून राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा गौरव करत महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कायदा व व्यावसायिक क्षेत्रातील योगदानाचे महत्व अधोरेखित केले. महिलांनी आत्मनिर्भर, सक्षम व नेतृत्वक्षम बनणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे सांगितले.
या सोहळ्याच्या माध्यमातून संस्थेचे चेअरमन मा. शेखर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रताप मल्टीस्टेट समाजहिताचे, महिला-केंद्रित आणि प्रेरणादायी उपक्रम सातत्याने राबवत असल्याचे अधोरेखित झाले. तसेच संस्थेचे संस्थापक स्व. प्रतापशेठ दादा साळुंखे यांच्या दूरदृष्टीचा आणि सामाजिक बांधिलकीचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला. सहकार, सभासदहित, सामाजिक उत्तरदायित्व आणि महिलांप्रती आदर ही मूल्ये त्यांनी संस्थेत रुजवली असून, त्याच विचारांवर आजही संस्थेचा कारभार यशस्वीपणे सुरू असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
महिलांच्या कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ देणारा आणि राजमाता जिजाऊ यांच्या विचारांना कृतीत उतरवणारा हा समाजरत्न महिला सन्मान पुरस्कार सोहळा उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ प्रेरणा देणारा ठरेल. शिवप्रताप मल्टीस्टेटच्या या उपक्रमामुळे महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकले गेले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्वी पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुजाता भिसे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला ,सभासद ,ग्राहक व हितचिंतक उपस्थित होते.




