अकोला :-एसटी सवलतींच्या गैरवापराला लगाम अकोला विभागाचा थेट इशारा : पूर्ण तपासणीशिवाय सवलतीचं तिकीट नाही.
पत्रकार सूर्यनारायण दहिरे हवेली तालुका सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

अकोला :-एसटी सवलतींच्या गैरवापराला लगाम
अकोला विभागाचा थेट इशारा : पूर्ण तपासणीशिवाय सवलतीचं तिकीट नाही.

अकोला:-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागाने सवलतीच्या तिकिटांबाबत कडक, निर्भीड आणि तडजोड न करणारा निर्णय घेतला असून, यापुढे पूर्ण व खात्रीशीर तपासणी झाल्याशिवाय कोणत्याही प्रवाशाला सवलतीच्या दरात तिकीट देण्यात येणार नाही, असे स्पष्ट आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. मात्र सवलतीच्या नावाखाली बनावट ओळखपत्रे, खोटे दाखले आणि फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून प्रामाणिक प्रवाशांवर अन्याय होत आहे. या पार्श्वभूमीवर अकोला विभागाने गैरवापर करणाऱ्यांविरोधात थेट युद्ध पुकारले आहे.
आता नियम नाही तर शिस्त चालणार
सवलतीसाठी मूळ व वैध ओळखपत्राशिवाय तिकीट नाही
संशयास्पद कागदपत्र आढळताच सवलत रद्द करून पूर्ण दर आकारला जाईल
बनावट ओळखपत्र वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
वाहक व निरीक्षकांवरही तडजोड केल्यास विभागीय कारवाई
अकोला विभागातील सर्व वाहक, निरीक्षक व अधिकाऱ्यांना कोणतीही सबब न ऐकता नियमांची अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान राजकीय दबाव, ओळखी किंवा शिफारशींना शून्य महत्त्व दिले जाणार असल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.
हा निर्णय म्हणजे इशारा आहे
एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सवलतीचा गैरवापर म्हणजे थेट सार्वजनिक मालमत्तेवर डल्ला आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही. प्रामाणिक प्रवाशांचे संरक्षण आणि महामंडळाच्या उत्पन्नाची शिस्तबद्ध वाढ हाच या निर्णयाचा उद्देश आहे.
अकोला विभागाने प्रवाशांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, नियम पाळा, वैध कागदपत्रे बाळगा; अन्यथा कारवाई अटळ आहे.




