नवी मुंबई:-माथाडी कामगार चळवळ कोणीही थांबू शकत नाही — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
माथाडी कामगार चळवळ कोणीही थांबू शकत नाही — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई दि : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीने वाटचाल करत महाराष्ट्र सरकारने समाजाच्या प्रत्येक घटकाच्या हिताचा विचार केला आहे. माथाडी कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी दिवंगत अण्णासाहेब पाटील यांची माथाडी चळवळ कोणीही थांबवू शकत नाही. माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतपेढी आणि अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी ग्राहक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी ए.पी.एम.सी. कांदा-बटाटा मार्केट येथे दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा मेळावा झाला . त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री गणेश नाईक, पणन मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. निरंजन डावखरे, आ. मंदाताई म्हात्रे, आ. प्रशांत ठाकूर, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, सरचिटणीस नरेंद्र पाटील, कार्याध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप तसेच माथाडी कामगार उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.
माथाडी कामगारांसाठी दिवंगत अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी संघटन उभी केली. मराठा समाजातील माथाडी कामगारांच्या विकासासाठी आपले घर-संसार पणाला लावणारे नेते इतिहासात कमीच आढळतात. त्यापैकी दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील एक होते. महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून मुंबईत येणाऱ्या कामगारांना चांगले राहणीमान मिळावे, त्यांचा विकास व्हावा यासाठी दिवंगत पाटील यांनी चळवळीला त्यांनी संघटित स्वरूप दिले. अण्णासाहेबांच्या त्यागामुळे आणि प्रयत्नांमुळे माथाडी कामगारांना आवाज मिळाला, सुरक्षा मिळाली आणि पुढील पिढ्यांना स्वप्ने पाहण्याचा अधिकार मिळाला. असे स्पष्ट करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मोठा लढा दिला. बलिदान दिले. त्यांच्या बलिदानातूनच मराठा आरक्षणाची चळवळ उभी राहिली. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही केला. पुराव्याअभावी आरक्षणापासून वंचित असलेला मराठा समाज आता आरक्षणासाठी पात्र ठरला आहे. त्याचबरोबर मराठा तरुणांसाठी शैक्षणिक प्रतिपूर्ती योजना सुरू केली आहे. शिक्षणासाठी शहरात राहण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भत्ता म्हणून दरवर्षी ६० हजार रुपये देण्यात येतात. एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी. परीक्षा देता याव्यात यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) स्थापन केली. आतापर्यंत सारथीच्या माध्यमातून ११२ तरुण आय.ए.एस. आणि आय.पी.एस .म्हणून नियुक्त झाले आहेत. १ हजार ४८ तरुण-तरुणी महाराष्ट्र शासनात एम.पी.एस.सी.द्वारे अधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत. आतापर्यंत सारथीच्या योजनांचा ८ लाख ३८ हजार ४७७ तरुण-तरुणींनी लाभ घेतला आहे, दीड लाख तरुण-तरुणी उद्योजक झाले आहेत. त्यांना कर्जाच्या स्वरूपात १३ हजार ५०० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील व आ. शशिकांत शिंदे यांनी भाषणात माथाडी कामगारांचे प्रश्न मांडले.
यावेळी माथाडी भूषण मानकरी दिनकर कृष्णा काटकर, विश्वास कृष्णराव पिसाळ, जनाबाई नारायण धुमाळ, वामन सिताराम वैद्य, मधुकर साहेबराव कदम, राजेंद्र खाशाबा लंभाते, प्रदीप गजानन भगत, अनिल सुरेश खताळ, दत्तात्रय ज्ञानदेव कवर, लक्ष्मण दिलीप पाटील, दीपक नारायण आहेर, भिमराव दशरथ चव्हाण, शशिकांत विष्णू यादव, शंकर भिकाजी शिंदे, संतोष गोणबा गाढवे, सुभाष बळवंत यादव, गौतम शनिचर भारती यांना गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच सोनल गुंजाळ, संभाजी शिवाजी बर्गे, सुनील धोंडे, मयूर मगर, अंकुश संकपाळ या लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेशांचे वाटप करण्यात आले.




