पुणे :-“सीओईपी अभिमान अॅवॉर्डस्”चे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते वितरण.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे :-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
“सीओईपी अभिमान अॅवॉर्डस्”चे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते वितरण.
पुणे, दि. 20, (शफिक शेख) : अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा अभ्यास करताना देशविकासाचा, मानवतेचा आणि पर्यायाने विश्वकल्याणाचा मंत्र जपावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे अभियंता दिनानिमित्त आयोजित ‘सीओईपी अभिमान अवॉर्ड्स’ वितरण सोहळ्यात केले.
कार्यक्रमास राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, सीओईपीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, सीओईपी संचालक प्रा. डॉ. मुकुल सुतावने, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भारत गीते, मानद सचिव प्रा. एस.एस. परदेशी आदी उपस्थित होते.
सीओईपीच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख करताना राज्यपाल म्हणाले, येथून विश्वविख्यात अभियंता भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांच्यासह आपल्या क्षेत्रातील उच्च व्यक्तिमत्वे घडली. श्री. कोश्यारी पुढे म्हणाले, सध्याचे युग हे कृत्रिम प्रज्ञा (एआय), इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आणि सायबर क्षेत्राचे असल्याने या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी काम करावे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक तरतुदी आहेत. आंतर विद्याशाखीय अभ्यास रचना केल्यामुळे विद्यार्थ्यांना एका क्षेत्रात शिक्षण सुरू असताना मध्येच त्याच्या आवडीप्रमाणे वेगळ्या क्षेत्रातील शिक्षणाकडे वळता येईल. या तरतुदींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.
प्रतापराव पवार म्हणाले, या संस्थेचा मोठा इतिहास असून येथील विद्यार्थी शिक्षण घेत असताना ज्ञानाची निर्मिती करतात. संस्थेला शासनानेही मोठे सहकार्य लाभत असून १५० कोटी रुपयांचा निधी तसेच नवीन कॅम्पस साठी ३० एकर जागा दिली आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत अभ्यासरचनेद्वारे भविष्य घडवावे, असेही त्यांनी आवाहन केले. भारत गीते यांनी प्रास्तविकात कार्यक्रमाविषयी माहिती दिली. तत्पूर्वी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा या कार्यक्रमासाठीच्या शुभेच्छा संदेशाची चित्रफीत दाखवण्यात आली. गौर गोपाल दास यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय जीवनविद्या प्रशिक्षक गौर गोपाल दास, राज पथ इन्फ्राकॉन प्रा. लि. चे संस्थापक अध्यक्ष व संचालक जगदीश कदम, लडाख केंद्रशासित प्रदेशाचे पोलीस प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक सतीश खंदारे, टाटा प्रोजेक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक पै, ‘एस्सार ऑइल अँड गॅस’चे माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विलास तावडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे माजी विद्यार्थी, प्राध्यापक, विविध विद्याशाखांचे प्रमुख, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.