वाई:-बावधनमध्ये किल्ले स्पर्धेचा ऐतिहासिक जल्लोष! मोठ्या गटात अजिंक्य गणेशोत्सव मंडळाची बाजी; लहान गटात रुद्र पिसाळ प्रथम.
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-बावधनमध्ये किल्ले स्पर्धेचा ऐतिहासिक जल्लोष! मोठ्या गटात अजिंक्य गणेशोत्सव मंडळाची बाजी; लहान गटात रुद्र पिसाळ प्रथम.

शिवकालीन इतिहास अन् गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतींमधून विद्यार्थ्यांनी दाखविली कल्पकता; पुढील वर्षी विजेत्यांना ऐतिहासिक किल्ल्याची सफर घडविणार!
वाई | दि. १८ : छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास, स्वराज्याच्या शौर्यगाथा आणि गड-किल्ल्यांचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने बावधन येथे आयोजित करण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारत शिवकालीन वैभवाला उजाळा दिला. मोठ्या गटात अजिंक्य गणेशोत्सव मंडळ, शिवबा ग्रुप (बावधन) यांनी साकारलेल्या प्रतापगडाच्या प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटकावत स्पर्धेवर आपले नाव कोरले, तर लहान गटात रुद्र पिसाळ याने प्रथम क्रमांक मिळवून बाजी मारली.
ॲड. दीप्तीताई पिसाळ युवा सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विजयसिंह पिसाळ युवा मंचाच्या वतीने बावधन पंचक्रोशीतील गावांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी प्रतापगड, सिंहगड, राजगड, लोहगड, तोरणा, पुरंदर अशा ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारून इतिहासाविषयीची आवड आणि कलात्मक कौशल्याचे दर्शन घडविले.
मोठ्या गटातील निकालात अजिंक्य गणेशोत्सव मंडळ, शिवबा ग्रुप (बावधन) यांनी प्रतापगडाच्या प्रतिकृतीसाठी प्रथम क्रमांक पटकावला. ओंकार चव्हाण (बावधन) याने लोहगडाच्या प्रतिकृतीसाठी द्वितीय, धर्मवीर संभाजीराजे मित्र मंडळ (बावधन) यांनी सिंहगडाच्या प्रतिकृतीसाठी तृतीय, आराध्य राजपुरे (कनूर) याने तोरणा किल्ल्याच्या प्रतिकृतीसाठी चतुर्थ, तर अभिमन्यू सुशांत शेंडे (व्याजवाडी) याने पुरंदर किल्ल्याच्या प्रतिकृतीसाठी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.
लहान गटात रुद्र पिसाळ (बावधन) याने लोहगडाच्या प्रतिकृतीसाठी प्रथम क्रमांक मिळविला. तन्मय व आर्यन गहिण (बावधन) यांनी राजगडाच्या प्रतिकृतीसाठी द्वितीय, तर सार्थक वेदपाठक याने प्रतापगडाच्या प्रतिकृतीसाठी तृतीय क्रमांक पटकावला.
मोठ्या गटासाठी पाच, तर लहान गटासाठी तीन पारितोषिके ठेवण्यात आली होती. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन प्रोत्साहित करण्यात आले. जठार सर आणि पंकज सुतार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
यावेळी ॲड. दीप्तीताई पिसाळ, विजयसिंह पिसाळ, माजी पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे, ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार रासकर, किशोर भोसले, तेजस मांढरे, पृथ्वीराज कचरे, अमोल किर्दत, विराज कदम, अथर्व पिसाळ, श्रेयस पिसाळ, प्रशांत पिसाळ, प्रथमेश कुंभार यांच्यासह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि बावधनचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बक्षिसांपेक्षा ऐतिहासिक अनुभवाला प्राधान्य!
या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे पुढील वर्षी सहभागी विद्यार्थ्यांना केवळ बक्षिसे न देता छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्याची प्रत्यक्ष सफर घडवून आणण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकातील इतिहासासोबत प्रत्यक्ष गड-किल्ल्यांचा अनुभव घेता येणार आहे.
ॲड. दीप्तीताई पिसाळ यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. मनोरंजनासोबत इतिहासाची गोडी, सर्जनशीलता आणि शिवकालीन वारशाविषयी अभिमान जागविणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली. आयोजकांचे उपस्थितांनी अभिनंदन करून आभार मानले.



