सांताक्रुझ:-मुंबईकरांच्या आरोग्यासाठी कलिना येथे भव्य मल्टीस्पेशालिटी शासकीय रुग्णालय उभारण्याची मेहुल जाधव यांची मागणी!
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सांताक्रुझ:-मुंबईकरांच्या आरोग्यासाठी कलिना येथे भव्य मल्टीस्पेशालिटी शासकीय रुग्णालय उभारण्याची मेहुल जाधव यांची मागणी!
एमएमआरडीएच्या मैदानावर आधुनिक रुग्णालय उभारण्याबाबत मुख्यमंत्री, महापौर आणि मुंबई महापालिका आयुक्तांना निवेदन.
मुंबई |
मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने उत्तर मध्य मुंबईतील कलिना विद्यापीठ परिसरालगत असलेल्या एमएमआरडीएच्या मैदानावर भव्य मल्टीस्पेशालिटी शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मेहुल जाधव यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मुंबईच्या महापौर तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सविस्तर निवेदन सादर केले आहे.
व्ही.एन. देसाई रुग्णालयाच्या मर्यादांमुळे नागरिकांची गैरसोय निवेदनात नमूद केल्यानुसार, सांताक्रूझ पूर्व येथील व्ही. एन. देसाई सर्वसाधारण रुग्णालयाच्या दुरुस्तीमुळे ते पुढील काळात बंद राहणार असल्याने कलिना विधानसभा क्षेत्र, सांताक्रूझ पूर्व, वाकोला आणि खार परिसरातील गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांसमोर आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.
सध्या परिसरातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी असून, गंभीर आजारांवरील उपचार, आपत्कालीन सेवा, शस्त्रक्रिया तसेच आधुनिक वैद्यकीय तपासणी सुविधांचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयांचा महागडा खर्च सहन करावा लागतो किंवा उपचारांसाठी दूरवर जावे लागते.
कलिना येथील एमएमआरडीए मैदान आरोग्यसेवेसाठी उपयुक्त कलिना कॅम्पस परिसरातील एमएमआरडीएचे विस्तीर्ण मैदान हे मुंबईच्या मध्यवर्ती आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी आहे. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, बीकेसी कनेक्टर आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या जवळ असल्यामुळे पूर्व व पश्चिम उपनगरांतील नागरिकांना या ठिकाणी सहज पोहोचता येऊ शकते. आपत्कालीन रुग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार मिळण्याच्या दृष्टीनेही हे ठिकाण महत्त्वाचे ठरू शकते.
नवीन रुग्णालयामुळे मुंबईकरांना होणार मोठा फायदा
कलिना येथे आधुनिक मल्टीस्पेशालिटी शासकीय रुग्णालय उभारल्यास केईएम, सायन आणि जे.जे. रुग्णालयांवरील रुग्णांचा ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच आपत्कालीन विभाग, ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, आधुनिक वैद्यकीय तपासणी यंत्रणा आणि मोफत किंवा परवडणाऱ्या दरात उपचार उपलब्ध होऊ शकतील. या रुग्णालयामुळे डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.
निवेदनातील प्रमुख मागण्या –
१. राज्य शासन, एमएमआरडीए आणि मुंबई महानगरपालिका यांनी समन्वय साधून कलिना विद्यापीठ परिसरालगतचे एमएमआरडीए मैदान सार्वजनिक रुग्णालयासाठी आरक्षित करून महापालिकेकडे हस्तांतरित करावे.
२. केईएम, सायन किंवा जे.जे. रुग्णालयांच्या धर्तीवर अत्याधुनिक सुविधा असलेले भव्य शासकीय मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यास मंजुरी द्यावी.
३. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि स्थानिक नागरिकांची शांतता लक्षात घेऊन सदर मैदानावरील व्यावसायिक व ध्वनिप्रदूषण करणाऱ्या खासगी कार्यक्रमांना तात्काळ बंदी घालावी.
जनहितासाठी प्रशासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा
भारतीय संविधानातील कलम २१ नुसार प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचा भाग म्हणून आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित करत, सार्वजनिक जमिनीचा वापर व्यावसायिक मनोरंजनाऐवजी जनतेच्या आरोग्यासाठी व्हावा, अशी भूमिका मेहुल जाधव यांनी मांडली आहे.
मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि कलिना येथे भव्य शासकीय रुग्णालय उभारण्याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
मेहुल जाधव यांच्या या मागणीमुळे कलिना परिसरात शासकीय रुग्णालय उभारण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
RPS STAR NEWS




