वाई:-शिक्षकांच्या कार्याचा गौरव; मौलाना आझाद आणि फातिमा शेख स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार वितरण!
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-शिक्षकांच्या कार्याचा गौरव; मौलाना आझाद आणि फातिमा शेख स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार वितरण!

मौलाना आझाद विचार मंचचा स्तुत्य उपक्रम; खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते गुणवंत शिक्षकांचा सन्मान.
वाई, दि. १६ : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विद्यार्थी घडविण्यासाठी घेतलेले परिश्रम आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी वाई येथे मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने विशेष पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मौलाना अबुलकलाम आझाद यांच्या जयंतीचे औचित्य साधून मौलाना आझाद आणि क्रांतीज्योती फातिमा शेख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते गौरवचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन पुरस्कारार्थी शिक्षकांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, किसन वीर कारखान्याचे संचालक संदीप चव्हाण आणि सचिन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्यात शिवाजी निकम, गुरुनाथ राठोड, ताजुद्दीन सय्यद, नसीमा बेद्रेकर, कृष्णा कांबळे, नम्रता गायकवाड, सबिहा पटेल, श्रीगणेश शेंडे, संभाजी लावंड आणि प्रशांत थोरवे या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जयवंत आवटे यांनी शिक्षकांच्या विद्यार्थीभिमुख दृष्टिकोनाचे आणि समाजशील कार्याचे कौतुक केले. समाज घडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या शिक्षकांसारख्या जबाबदार घटकाचा सन्मान करून मौलाना आझाद विचार मंचने प्रेरणादायी उपक्रम राबविल्याचे त्यांनी नमूद केले.
संस्थापक अध्यक्ष प्रा. महंमद शेख यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले, तर कार्याध्यक्ष मोअज्जम इनामदार यांनी आभार मानले.
कार्यक्रमास दिलेरखान शिकलगार, संजय बागुल, रियाज काझी, संजय सकटे, जुबेर बागवान, प्रदीप नेवसे यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
छायाचित्र ओळ : वाई येथे मौलाना आझाद आणि फातिमा शेख स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षक पुरस्कार वितरणप्रसंगी खासदार नितीन पाटील, जयवंत आवटे, बापूसाहेब शिंदे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, विठ्ठल माने, प्रा. महंमद शेख आणि मोअज्जम इनामदार.
2) वाईत अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

रांगोळी आळीतील सारथी अपार्टमेंटमध्ये खळबळ; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, सुदैवाने जीवितहानी नाही.

वाई, दि. १६ : वाई शहरातील रविवार पेठेतील रांगोळी आळी परिसरात असलेल्या सारथी अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये घडलेल्या या घटनेमुळे अपार्टमेंटमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, वाई नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
फ्लॅटमधून धुराचे लोट आणि आग दिसू लागताच परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत वाई नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान बंबासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आग विझविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. त्यांच्या तत्पर कारवाईमुळे आग इतर फ्लॅटमध्ये पसरण्यापूर्वीच आटोक्यात आणण्यात आली.
अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याने ती इतर मजल्यांवर पसरण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या उपाययोजनांमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, फ्लॅटमधील साहित्याचे नेमके किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
3) वाईच्या वैभवात शिवस्मारकाची भर; शिवरायांचा भव्य पुतळा लवकरच उभारणार!

स्मारकाच्या चौथऱ्याचे काम अंतिम टप्प्यात; मंत्री मकरंद पाटील यांनी कोल्हापुरात जाऊन शिल्पकामाची केली पाहणी, दर्जा आणि वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना.
वाई, दि. १६ :ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा अभिमान मिरवणाऱ्या दक्षिण काशी वाई नगरीच्या वैभवात लवकरच आणखी एका मानाच्या शिरपेचाची भर पडणार आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे काम वेगाने सुरू असून, स्मारकाच्या चौथऱ्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. दरम्यान, शिवरायांच्या मुख्य पुतळ्याच्या निर्मितीला गती देण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी कोल्हापूर येथील शिल्पकारांच्या कार्यशाळेला भेट देऊन सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक वाई शहरात उभारावे, ही वाईकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. स्वराज्याच्या इतिहासाशी नाते सांगणाऱ्या या ऐतिहासिक नगरीत महाराजांचे स्मारक उभे राहणे, ही वाईच्या दृष्टीने अभिमानाची बाब मानली जात आहे. न्यायालयासमोरील मोक्याच्या जागेवर साकारत असलेले हे स्मारक शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच भावी पिढीला स्वराज्याचा इतिहास, शौर्य आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणारे ठरणार आहे.
दरम्यान, पुतळा निर्मितीसाठी आवश्यक कच्चा माल आणि काही तांत्रिक अडचणींमुळे कामाच्या प्रगतीला विलंब झाला होता. मात्र, शिल्पनिर्मितीसाठी आवश्यक निधी यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री मकरंद पाटील यांनी कोल्हापुरातील कार्यशाळेत जाऊन पुतळ्याची रचना, कलात्मक बारकावे आणि निर्मितीच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. शिवरायांचे स्मारक असल्याने पुतळ्याच्या कलात्मकतेत, भव्यतेत आणि दर्जात कोणतीही तडजोड होता कामा नये. तसेच निर्धारित वेळेत काम पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी शिल्पकारांना दिल्या.
सध्या स्मारकाच्या चौथऱ्याचे काम पूर्णत्वाकडे जात असून, मुख्य पुतळ्याच्या निर्मितीचाही पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे वाईच्या प्रवेशद्वारावर लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा दिमाखात उभा राहण्याची आशा निर्माण झाली आहे. हे स्मारक केवळ एक शिल्प न राहता वाईच्या ऐतिहासिक अस्मितेचे आणि शिवविचारांचे प्रेरणास्थान ठरणार आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी वाई पंचायत समितीचे सभापती विक्रांत डोंगरे, माजी नगरसेवक चरण गायकवाड, नगरसेवक भारत खामकर, डॉ. अमर जमदाडे, संग्राम पवार, संदीप जावळे, गुरुप्रसाद चव्हाण, सुशील खरात, संदीप नायकवडी, शब्बीर पठाण, पप्पू हागीर, महेश काळे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
4) वाई:-राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत भंडाराचा विजयी डंका!

४८ व्या ज्युनिअर मुलींच्या अजिंक्यपद स्पर्धेत भंडारा संघाने मारली बाजी; यजमान साताऱ्याला उपविजेतेपद, नागपूर तृतीय क्रमांकावर.
वाई, दि. १६ : राज्यभरातील महिला खेळाडूंच्या कौशल्याचा, जिद्दीचा आणि क्रीडासामर्थ्याचा प्रत्यय देणाऱ्या ४८ व्या राज्यस्तरीय ज्युनिअर मुलींच्या अजिंक्यपद हॅण्डबॉल स्पर्धेत भंडारा जिल्हा संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. अंतिम टप्प्यापर्यंत रंगलेल्या या स्पर्धेत यजमान सातारा संघाने उपविजेतेपद मिळवत दमदार कामगिरी केली, तर नागपूर संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
महाराष्ट्र हॅण्डबॉल असोसिएशनच्या मान्यतेने तसेच सातारा जिल्हा हॅण्डबॉल असोसिएशन आणि ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने वाई येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानदीप स्कूलच्या क्रीडांगणावर सलग तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यांच्या संघांनी सहभाग घेतला. विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांना अनेक चुरशीच्या लढतींची पर्वणी दिली.
स्पर्धेचे उद्घाटन सातारा जिल्हा हॅण्डबॉल असोसिएशनचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तीन दिवसांच्या स्पर्धेनंतर विजेत्या व उपविजेत्या संघांना विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एकनाथ जगताप, संचालक दिलीप चव्हाण, महाराष्ट्र हॅण्डबॉल असोसिएशनचे सचिव रणधीर सिंग, प्राचार्या शुभांगी पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सतीश डोंढगे आणि मिलिंद शिंदे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी प्रा. डॉ. समीर पवार, अमर धापते, विक्रम निकम, हरेश चव्हाण, अक्षय करपे, संतोष चौधरी, वजीर शेख, प्रा. शिवराज तलवारे, शुभम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्याच्या विविध भागांतून आलेल्या खेळाडू व प्रशिक्षकांसाठी मैदान, निवास, भोजन तसेच अन्य आवश्यक सुविधांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. आयोजनातील शिस्तबद्ध नियोजन आणि पाहुणचाराबद्दल सहभागी संघांनी ज्ञानदीप स्कूल व सातारा जिल्हा हॅण्डबॉल असोसिएशनचे विशेष कौतुक केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पंच म्हणून अमित वाघांबरे, निलेश साळोखे, संतोष पाटील, शुभम इंग्लजकर, राकेश बनसोडे, आकाश चौगुले, शंभू देवकर, सुशांत साळवी, दर्शन रोकडे, साहिल इनामदार, जय झांबरे, अन्वय चावरे, सुमित पोतेकर, आशुतोष साळुंखे आणि सचिन कुदळे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातारा हॅण्डबॉल असोसिएशनचे सचिव तथा क्रीडा विभाग प्रमुख सचिन लेंभे यांनी केले, तर विक्रम निकम यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवराज वरे, विक्रांत पोळ, गणेश निकम, सागर डेरे, अमोल खडसरे, श्रुती मांढरे, विजय चव्हाण, अर्जुन जाधव, ओम लेंभे यांच्यासह ज्ञानदीप स्कूलचे खेळाडू, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि हॅण्डबॉल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
फोटो ओळ : राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंसमवेत एकनाथ जगताप, दिलीप चव्हाण, रणधीर सिंग, प्राचार्या शुभांगी पवार, सतीश डोंढगे, मिलिंद शिंदे व अन्य मान्यवर.



