आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-एका ई-मेलने सातारा हादरले! जिल्हा न्यायालय बॉम्बच्या निशाण्यावर; परिसरात एकच धावपळ!

पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सातारा:-एका ई-मेलने सातारा हादरले! जिल्हा न्यायालय बॉम्बच्या निशाण्यावर; परिसरात एकच धावपळ!

अधिकारी, कर्मचारी, वकील आणि नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले; बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून संपूर्ण इमारतीची कसून तपासणी.

सातारा, दि. ०२ : सातारा जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोट घडवून उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याने सोमवारी न्यायालयीन परिसरात एकच खळबळ उडाली. धमकीचा ई-मेल प्राप्त होताच पोलीस प्रशासनासह सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या. संभाव्य धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला.

या घटनेमुळे न्यायालयात काही काळ मोठी धावपळ उडाली. न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी, वकील तसेच विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना तातडीने इमारतीबाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. दरम्यान, बॉम्ब शोधक व नाशक पथकही घटनास्थळी दाखल झाले असून न्यायालयाच्या संपूर्ण इमारतीची तसेच परिसरातील संशयास्पद ठिकाणांची कसून तपासणी सुरू करण्यात आली.

दरम्यान, धमकीचा ई-मेल नेमका कोठून पाठवण्यात आला, तो पाठविण्यामागे कोणाचा हात आहे आणि हा केवळ खोडसाळपणाचा प्रकार आहे की प्रत्यक्षात काही धोका आहे, याचा तपास पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे. ई-मेलचा तांत्रिक मागोवा घेऊन धमकी देणाऱ्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

न्यायदानाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या सातारा जिल्हा न्यायालयालाच बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क असून बॉम्ब शोधक पथकाच्या तपासणीनंतरच धमकीमागील नेमके वास्तव स्पष्ट होणार आहे.

2) वाई:-फुटपाथ अपूर्ण, रस्ता अर्धवट; ठेकेदाराचा टँकर मात्र रोज हजर! दुष्काळग्रस्त वाईत पाण्याची उधळपट्टी सुरूच!

किसनवीर कॉलेज रोडवर १० ऑक्टोबरपासून टँकरच्या पाण्याचा मारा; खड्डे कायम, विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर, ठेकेदाराच्या कामावर प्रशासनाचे नियंत्रण आहे का?

वाई, दि. ०२ :एका बाजूला दुष्काळाचे संकट, दुसरीकडे पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचे आवाहन आणि त्याच वेळी वाई शहरात रस्त्यावर हजारो लिटर पाण्याचा वापर! हा विरोधाभास नाही तर काय? दुष्काळग्रस्त यादीत समावेश झालेल्या वाई तालुक्यातील किसनवीर कॉलेज रोडवर दररोज १५ हजार लिटर क्षमतेच्या टँकरमधून पाणी आणून रस्त्यावर फवारले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. १० ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे ठेकेदाराच्या कामकाजासह प्रशासनाच्या देखरेखीवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. *रस्ता पूर्ण करण्याची जबाबदारी पार पडत नाही; मात्र टँकरमधून पाणी ओतण्याचा उपक्रम नियमित सुरू आहे. मग या कामाचा प्राधान्यक्रम नेमका ठरवतो तरी कोण? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

सुरूर-पोलादपूर मार्गावरील किसनवीर कॉलेज रोडवर टँकरने पाणी आणून रस्त्यावर फवारले जात असल्याचे चित्र दररोज दिसत आहे. रस्त्यावरील धूळ नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि फुटपाथवर पाणी मारण्यासाठी हा वापर होत असल्याचे टँकरचालकाकडून सांगण्यात येत असल्याची माहिती आहे. मात्र, दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापर करण्याची आवश्यकता काय? पाणी नेमके कोठून आणले जाते? त्यासाठी कोणाची परवानगी आहे? या प्रश्नांची उत्तरे संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने देणे गरजेचे आहे.

कामाचा वेग मंदावला, टँकरची मात्र रोजची फेरी!

सुरूर-पोलादपूर मार्गावरील रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असताना टँकरने पाणी फवारण्याचा प्रकार मात्र सुरूच आहे. कामाच्या गतीबाबत आणि दर्जाबाबत स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्याऐवजी पाणी फवारण्यावरच भर दिला जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. दररोजच्या पाण्याचा खर्च कोणाच्या निधीतून केला जातो? टँकरच्या पाण्याच्या वापराला कामाच्या अंदाजपत्रकात तरतूद आहे का? असल्यास त्याचे निकष काय आहेत? या बाबींची चौकशी होणे आवश्यक आहे.

फुटपाथवर खड्डे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा खेळखंडोबा!

वाई बसस्थानक ते किसनवीर कॉलेजदरम्यानचा फुटपाथ अद्याप पूर्ण झालेला नाही. ठिकठिकाणी खड्डे, असमान पृष्ठभाग आणि अपूर्ण बांधकामामुळे पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींची ये-जा सुरू असते. फुटपाथवरील खड्ड्यांमुळे विद्यार्थी घसरून पडल्याच्या घटनाही घडल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.

विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पादचारी मार्ग उपलब्ध करून देणे ही संबंधित यंत्रणेची प्राथमिक जबाबदारी असताना प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांना धोकादायक परिस्थितीतून मार्ग काढावा लागत आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? रस्त्यावर पाणी फवारण्यासाठी टँकरची व्यवस्था होते; मग फुटपाथ पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला कोण अडवत आहे? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

नागरिकांची निवेदने दुर्लक्षित; ठेकेदाराला जाब विचारणार कोण?

स्थानिक नागरिकांनी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, फुटपाथवरील त्रुटी दूर कराव्यात, यासाठी संबंधित ठेकेदाराकडे वारंवार तोंडी तसेच लेखी निवेदने दिल्याचे सांगितले जाते. मात्र, या तक्रारींवर ठोस कार्यवाही होत नसल्याची नागरिकांची नाराजी आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि अपूर्ण काम याकडे दुर्लक्ष होत असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार कधी? असा सवाल उपस्थित होत आहे.

पाण्याचा हिशेब द्या, कामाची मुदत सांगा!

दुष्काळग्रस्त वाईत दररोज १५ हजार लिटर क्षमतेच्या टँकरमधून पाणी वापरण्यामागील कारण, पाण्याचा स्रोत, परवानगी आणि खर्च याची प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी. संबंधित कामाची तातडीने पाहणी करून पाण्याच्या वापराची चौकशी करावी. फुटपाथवरील धोकादायक खड्डे बुजवून बांधकाम पूर्ण करावे आणि रस्त्याचे काम निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला ठोस निर्देश द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दुष्काळात सर्वसामान्यांनी पाणी जपून वापरायचे आणि ठेकेदाराने मात्र रस्त्यावर हजारो लिटर पाणी ओतायचे? जनतेला पाणी बचतीचे धडे देणाऱ्या प्रशासनाने आधी ठेकेदाराच्या पाण्याच्या वापराचा हिशेब तपासावा! टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत, पण फुटपाथचे काम पूर्ण होण्याचे नाव नाही. वाईकरांना आता कारणे नकोत; रस्ता पूर्ण हवा, सुरक्षित फुटपाथ हवा आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा!

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button