वाई:-ना कुणाची दांडी, ना कुणाची माघार! वाईत १४२ पैकी १४२ मतदान; शंभर टक्क्यांचा विक्रम!
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-ना कुणाची दांडी, ना कुणाची माघार! वाईत १४२ पैकी १४२ मतदान; शंभर टक्क्यांचा विक्रम!

मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार धैर्यशील कदम यांच्यासह सर्व मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; किसन वीर महाविद्यालय केंद्रावर शतप्रतिशत मतदान.

वाई, दि. ०१ : मतदानाचा हक्क बजावण्यात वाईकरांनी शंभर टक्के सहभागाची मोहर उमटवली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत किसन वीर महाविद्यालयातील मतदान केंद्रावर १४२ पैकी १४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत शतप्रतिशत मतदानाची नोंद केली. एकही मतदार मतदानापासून वंचित न राहिल्याने या केंद्रावरील मतदानाची विशेष चर्चा सुरू झाली आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच शंभर टक्के मतदानाचे उद्दिष्ट साध्य झाले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाई तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता. या निवडणुकीत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्यसभा खासदार नितीन पाटील आणि विधानपरिषदेचे आमदार धैर्यशील कदम यांनीही किसन वीर महाविद्यालयातील याच केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची वर्दळ सुरू होती. मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. दिवसभरात मतदानाचा आकडा वाढत गेला आणि अखेर सर्व १४२ मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावत शंभर टक्के मतदानाची नोंद केली. सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदारांनी दाखविलेला हा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला.
*कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया निर्विघ्न!*
मतदानादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली होती. केंद्रावर एक पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक महिला पोलीस उपनिरीक्षक, ४० पोलीस अंमलदार आणि २० होमगार्ड असा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पोलीस प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत आणि कोणत्याही अनुचित प्रकाराविना पार पडली. राजकीय दिग्गजांची उपस्थिती, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि १४२ पैकी १४२ मतदानाची नोंद यामुळे किसन वीर महाविद्यालय मतदान केंद्राने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वेगळी छाप उमटवली. **मतदानात ना गैरहजेरी, ना दांडी; वाईत लोकशाहीच्या सहभागाचा शंभर नंबरी ठसा उमटला!*
2) वाई:-शेड उभारणी पूर्ण, शेडनेटचे काम अंतिम टप्प्यात; विक्रेत्यांसाठी आखले जाणार पांढरे पट्टे, अनामत रक्कम व भाड्याचा तिढा कायम

वाई, दि. ०१ :वाईच्या भाजी मंडईला आधुनिक रूप देण्याच्या कामाने आता वेग घेतला आहे. मंडईतील शेड उभारणी पूर्ण झाली असून शेडनेटचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. विक्रेत्यांना स्वतंत्र जागा निश्चित करून देण्यासाठी मंडई परिसरात पांढरे पट्टे आखण्याचे कामही सुरू झाले आहे. मात्र, मंडईचा कायापालट होत असतानाच नव्या जागेसाठी आकारण्यात येणारी अनामत रक्कम आणि मासिक भाडे किती असणार, याबाबत विक्रेत्यांमधील संभ्रम अद्याप दूर झालेला नाही. त्यामुळे ‘मंडई सुंदर होणार, पण विक्रेत्यांना किती मोजावे लागणार?’ असा सवाल उपस्थित होत आहे.
या कामासाठी रविवारी भाजी मंडई बंद ठेवण्यात आली होती. सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामाची नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पाहणी केली. यावेळी उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के, नगरसेवक, नगरसेविका आणि नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी शेड उभारणीचे काम पूर्ण झाल्याचे सांगून शेडनेटचे कामही लवकरच पूर्ण केले जाईल, अशी माहिती दिली. मंडई परिसर स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध करण्यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील असून विक्रेते, शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, पाहणीवेळी काही शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी नव्याने उभारलेल्या शेडमधील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. यावर नगराध्यक्ष, नगरसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देत सूचनांची दखल घेतली.
उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के यांनीही भाजी मंडईसह शहरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
सुशोभीकरणाला गती, पण अनामत-भाड्याचा प्रश्न ऐरणीवर!
एकीकडे मंडईच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असताना दुसरीकडे विक्रेत्यांच्या आर्थिक गणिताचा प्रश्न निर्माण झाला आहे. नव्या शेडमध्ये जागा मिळविण्यासाठी किती अनामत रक्कम भरावी लागणार? मासिक भाडे किती असेल? जागावाटपाचे निकष काय असतील? याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता नसल्याने विक्रेते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
छोट्या विक्रेत्यांच्या व्यवसायावर अतिरिक्त आर्थिक बोजा पडू नये, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन सर्व बाबी स्पष्ट कराव्यात, अशी मागणी होत आहे. मंडईचे सुशोभीकरण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच तेथील विक्रेत्यांचे आर्थिक हित जपणेही आवश्यक आहे.
*मंडईचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सुरू झाले आहे; आता विक्रेत्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याची वेळ नगरपरिषद प्रशासनावर आली आहे.* त्यामुळे सुंदर मंडईच्या स्वप्नासोबत विक्रेत्यांना परवडणाऱ्या अटींची अंमलबजावणी होणार का, याकडे वाईकरांचे लक्ष लागले आहे.




