वाई:-एकतेचा धावता संदेश, व्यसनमुक्तीचा जागर! वाई पोलिसांची ‘रन फॉर युनिटी’ रॅली उत्साहात.
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-एकतेचा धावता संदेश, व्यसनमुक्तीचा जागर! वाई पोलिसांची ‘रन फॉर युनिटी’ रॅली उत्साहात.

सरदार पटेल जयंतीनिमित्त युवकांचा उत्स्फूर्त सहभाग; राष्ट्रीय एकात्मतेसोबत नशामुक्त समाजाचा दिला संदेश.
सातारा | वाई, दि. ३१ : राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्यासोबतच तरुणाईला व्यसनांच्या विळख्यातून दूर ठेवण्याचा जागर वाई पोलिसांनी केला. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून वाई पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘रन फॉर युनिटी’ आणि ‘वॉक फॉर युनिटी’ रॅली उत्साहात पार पडली. धावण्याच्या आणि चालण्याच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि नशामुक्तीचा प्रभावी संदेश देण्यात आला.
शनिवारी (दि. ३१) सकाळी ७ वाजता किसन वीर महाविद्यालय येथून रॅलीला प्रारंभ झाला. बसस्थानक मार्गे मार्गक्रमण करत ही रॅली वाई पोलीस ठाण्यात पोहोचली. हातात एकतेचा आणि व्यसनमुक्तीचा संदेश घेऊन सहभागी झालेल्या युवक-युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत नागरिकांचे लक्ष वेधले.
या उपक्रमात वाई पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह रॉयल अकॅडमीमध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अशा सुमारे ४० ते ५० जणांनी सहभाग घेतला. केवळ धावण्यापुरता मर्यादित न राहता युवकांमध्ये देशप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि निरोगी जीवनशैलीची जाणीव निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
राष्ट्रीय एकात्मता हीच देशाच्या सामर्थ्याची खरी ताकद असून, व्यसनमुक्त तरुणाई ही सक्षम राष्ट्रनिर्मितीची गरज आहे. हा विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर उतरून जनजागृतीचा उपक्रम राबविला.
या उपक्रमाला पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
2) भुईंज-(वाई)-भैरवनाथ यात्रेपूर्वी प्रशासनाचा प्रतिबंधात्मक बडगा! किकलीतील १० जणांना गावबंदी.

३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत प्रवेशास मनाई; कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तहसीलदार सोनाली मेटकरी यांचे आदेश.
सातारा | वाई, दि. ३० : किकली येथील भैरवनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. संभाव्य अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी किकली गावातील दहा जणांना ठरावीक कालावधीसाठी गावाच्या हद्दीत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यात्रा सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने कठोर पावले उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाईच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सोनाली मेटकरी यांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ (२) अन्वये हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. भुईंज पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
या आदेशानुसार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संबंधित दहा व्यक्तींना किकली गावाच्या हद्दीत प्रवेश करता येणार नाही.
प्रवेशबंदी लागू करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये साईल आदेश बाबर, यश आदेश बाबर, आदित्य जितेंद्र बाबर, तुषार भुजंग बाबर, संकेत राजेंद्र बाबर, निखिल भरत बाबर, विजय कृष्णराव बाबर, गणेश अरुण बाबर, कुलदीप दिलीप बाबर आणि अक्षय विजय बाबर यांचा समावेश आहे.
भैरवनाथ यात्रेदरम्यान सार्वजनिक शांतता भंग होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि यात्रा शांततेत पार पडावी, हा या कारवाईमागील प्रमुख उद्देश असल्याचे प्रशासनाने आदेशात स्पष्ट केले आहे. प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि महसूल प्रशासनाने सतर्कता वाढवली असून, संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. धार्मिक उत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




