कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:- तारा मोबाईल क्रेशेस, पुणे संस्थेचा वार्षिक कौतुक सोहळा दिमाखात संपन्न.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पुणे:- तारा मोबाईल क्रेशेस, पुणे संस्थेचा वार्षिक कौतुक सोहळा दिमाखात संपन्न.

बांधकाम साईटवरील स्थलांतरित मजुरांच्या मुलांसाठी गेली ४५ वर्षे कार्यरत असलेल्या तारा मोबाईल क्रेशेस, पुणे (TMCP) संस्थेचा वार्षिक कौतुक सोहळा शुक्रवार, दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी सिम्बायोसिस ऑडिटोरियम, विमाननगर येथे उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्याचे उपआयुक्त (नियंत्रण मंडळ) श्री. राहुल मोरे आणि भारतीय हवाई दलाचे माजी एअर मार्शल सुनील सोमण सर उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षा सौ. मधुरा गोखले, संचालिका श्रीमती. शर्मिला ब्रह्मे, श्रीमती. निशा मेहता, श्री. समीर मेहता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. मंजुषा दोशी व्यासपीठावर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर संस्थेतील मुलांनी मल्लखांब, योग यांची प्रात्यक्षिके आणि देशभक्तीपर नृत्य सादर केले. प्रकल्प प्रमुख सौ. नेहा घाणेकर यांनी संस्थेचा इतिहास आणि सध्याच्या कामाविषयी माहिती दिली. मोबाईल क्रेश ची सुरुवात १९६९ साली दिल्ली येथे झाली त्याची शाखा १९८० मध्ये पुण्यात सुरु झाली. प्रत्येक मूल आनंदी, निरोगी, सुरक्षित आणि जबाबदार नागरिक व्हावे ही संस्थेची व्हिजन आहे.

संस्थेतर्फे ४ दशकांहून अधिक वर्षे पुणे आणि आसपासच्या भागात २१ डे-केअर सेंटर मार्फत बांधकाम साईटवर स्थलांतरित कुटुंबामधील जन्म ते १८ वर्षांच्या मुलांचे संगोपन, सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित वातावरण, पोषक आहार, शिक्षण यासाठी उपक्रम राबविले जातात आणि खेळ तसेच सर्वांगीण विकासाच्या संधी दिल्या जातात. मुलांच्या वयोगटाप्रमाणे विकासात्मक कृती प्रशिक्षित कार्यकर्त्यांकडून राबविल्या जातात. कुपोषित मुलांकडे विशेष लक्ष देऊन दर महिन्याला आरोग्य तपासणी करून औषधोपचार केले जातात. संस्था जन्म ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कार्य करताना मुलांची वयोगटानुसार विभागणी करून खेळ आणि अनुभवांद्वारे मुलांमध्ये विकास घडवून आणला जातो. कुपोषणासारख्या कळीच्या प्रश्नांना हाताळताना पुरेसा पोषक आहार, अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मुलांसोबत मुलांच्या पालकांबरोबरही कार्य केले जाते. बांधकाम मजुरांच्या स्थलांतरित मुलांचे संरक्षण, वाढ आणि विकास, शिक्षण, बालहक्क अशा एकात्मिक कार्यक्रमातून संस्थेचे कार्य निरंतर चालू आहे.

अधिक गरजू मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी संस्थेने २०२४-२५ पासून BRICKS (Building Resilience, Intelligence in Childhood Knowledge and Skills) हा प्रकल्प सुरू केला आहे. मावळ तालुक्यातील वीटभट्ट्यांवर ५ ठिकाणी १२५ मुलांसाठी शिक्षण, पोषण आणि आरोग्य विषयक उपक्रम राबवले जात आहेत.

सध्या अनेक प्रथितयश बिल्डरच्या साईटवर पाळणाघरे चालू आहेत. संस्थेला आर्थिक मदत करणारे देणगीदार, CSR पार्टनर, हितचिंतक यांच्यामुळे हे सर्व करणे शक्य होत आहे.संस्थेच्या कार्याला विविध तज्ज्ञ संस्था आणि व्यक्तींचे मोलाचे सहकार्य लाभते. आजच्या सोहळ्यालाही ते उपस्थित होते.याशिवाय शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, मुलांना दररोज सुरक्षितपणे शाळेत ने-आण करणारे वाहतूक सेवक, अनेक संस्थांच्या स्वयंसेवकांचे योगदानही अमूल्य आहे.

इयत्ता १० वी मध्ये उत्तम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘श्रीमती सिंधुताई सावर्डेकर पुरस्कार’ आणि १२ वी मधील विद्यार्थ्यांना ‘श्री. रामकुमार राठी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. याशिवाय इतर सर्व १० वी, १२ वी उत्तीर्ण आणि उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या ४ विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

श्री. राहुल मोरे म्हणाले, “फिल्डवर काम करणाऱ्या ताईंचा सन्मान महत्त्वाचा आहे. NGO आणि सरकारी योजना यांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. मुलांच्या हक्कांसाठी शासनाच्या योजना या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी एक अधिकारी म्हणून जिथे शक्य असेल तिथे नक्की मदत करेन.”

एअर मार्शल सुनील सोमण सर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, TMCP ने तुमचा हात धरला आहे, ही देवाने दिलेली संधी समजा, पण देव त्यांनाच मदत करतो जे स्वतः प्रयत्न करतात. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण, शिस्त, मेहनत आणि समर्पण हे चार स्तंभ लक्षात ठेवा. देणगीदारांनी तुमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर आशेची दारे उघडली आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना दररोज चिंतन, वाचन आणि व्यायाम करण्याचा सल्ला दिला.

अध्यक्षा सौ. मधुरा गोखले म्हणाल्या, “संस्था ही जगन्नाथाच्या रथासारखी आहे. एकट्याने रथ ओढता येत नाही. देणगीदार, पालक, संस्थेचा स्टाफ, बिल्डर, शिक्षक – सगळ्यांनी हातभार लावल्याशिवाय हा रथ पुढे जाणार नाही. पालक आणि संस्था एकाच दिशेने प्रयत्न करतील तरच मुलांच्या भविष्याला खरी गती मिळेल.” त्यांनी सर्व गुणवंत मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे कौतुक केले.

या कार्यक्रमात सर्व डे-केअर सेंटरवर काम करणाऱ्या ताईंचा मंचावर बोलावून विशेष सत्कार करण्यात आला. काही माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगून इतर मुलांना प्रेरणा दिली. सूत्रसंचालन डे-केअर सेंटरच्या ३ विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रोग्रॅम सपोर्ट टीम कोऑर्डिनेटर सौ. कीर्ती खंदारे यांनी केले.

या सोहळ्यास आजी-माजी विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, बिल्डर प्रतिनिधी, सहयोगी संस्थांचे प्रतिनिधी, देणगीदार आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button