फलटण:-‘कमवा आणि शिका’च्या माध्यमातून कर्मवीरांनी घडविली शिक्षणाची सामाजिक क्रांती.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) फलटण:-‘कमवा आणि शिका’च्या माध्यमातून कर्मवीरांनी घडविली शिक्षणाची सामाजिक क्रांती.

स्वावलंबी शिक्षण, श्रमप्रतिष्ठा आणि समतेचा विचार आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी : अनिलकुमार कदम.
फलटण :- महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीचे शिल्पकार कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरीब व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘स्वावलंबी शिक्षण’ आणि ‘कमवा आणि शिका’ या संकल्पनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. त्यांच्या या विचारांचे आजच्या बदलत्या शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थितीतही विशेष महत्त्व आहे, असे मत मुक्त पत्रकार, लेखक, कवी, साहित्यिक व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री. अनिलकुमार बुवासाहेब कदम यांनी व्यक्त केले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज येथे झाला. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणांच्या कार्याचा प्रभाव त्यांच्या विचारांवर होता. आर्थिक अडचणींमुळे अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी शिक्षण क्षेत्रात मूलभूत परिवर्तन घडवून आणण्याचा संकल्प केला.
‘कमवा आणि शिका’ ही संकल्पना ठरली मैलाचा दगड
गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचणी येऊ नयेत, यासाठी कर्मवीरांनी ‘कमवा आणि शिका’ योजना सुरू केली. विद्यार्थी श्रम करून आपल्या शिक्षणाचा, निवासाचा आणि भोजनाचा खर्च भागवू लागले. त्यामुळे शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, स्वाभिमान, जबाबदारी आणि स्वावलंबनाची भावना निर्माण झाली.
समता आणि श्रमप्रतिष्ठेला दिले प्राधान्य
कर्मवीरांच्या स्वावलंबी शिक्षणाच्या संकल्पनेत केवळ पुस्तकी ज्ञानाला महत्त्व नव्हते. शिक्षणासोबत श्रमाची प्रतिष्ठा, सामाजिक समता, स्वाभिमान आणि समाजसेवेची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या वसतिगृहांमध्ये विविध जाती-धर्मांचे विद्यार्थी एकत्र राहत आणि एकाच पंगतीत भोजन करत. त्यामुळे सामाजिक समतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला गेला.
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा विस्तार
४ ऑक्टोबर १९१९ रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून कर्मवीरांनी ग्रामीण व वंचित समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. लोकवर्गणी, धान्य आणि समाजाच्या सहकार्याच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाची चळवळ उभी केली. गावोगावी फिरून गरीब विद्यार्थ्यांसाठी मदत मागण्याचे काम त्यांनी केले.
आजच्या काळात शिक्षणासोबत कौशल्य विकास, रोजगाराभिमुख शिक्षण आणि स्वावलंबनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शंभर वर्षांपूर्वी मांडलेला ‘कमवा आणि शिका’ व स्वावलंबी शिक्षणाचा विचार आजच्या पिढीसाठीही मार्गदर्शक ठरतो.
कर्मवीरांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत भारत सरकारने १९५९ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. ९ मे १९५९ रोजी त्यांचे निधन झाले. मात्र, त्यांनी उभारलेली शिक्षणाची चळवळ आणि स्वावलंबी शिक्षणाचा विचार आजही समाजाला प्रेरणा देत आहे.
‘शिक्षण हा श्रीमंतांचा मक्ता नसून प्रत्येक गरीब आणि वंचित विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे,’ हा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विचार आजही तितकाच महत्त्वाचा आहे, असे श्री. अनिलकुमार कदम यांनी नमूद केले.
2) बामनोली:-नरवाडच्या चिमुकल्यांचा लोकनृत्यात ‘डबल धमाका’!

तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड.
बामनोली :-तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा क्रमांक २, नरवाडच्या चिमुकल्या कलाकारांनी आपल्या अप्रतिम कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी बामनोली येथे झालेल्या या स्पर्धेत इयत्ता पहिली ते पाचवीच्या गटात नरवाड शाळेच्या विद्यार्थ्यांनी दमदार सादरीकरण करत जिल्हास्तरीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले.
नृत्य, अभिनय, ताल आणि सुरेल गायन यांचा सुरेख मिलाफ असलेल्या या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. विधी वनमोरे, स्वरा काकडे, श्रीशा कुंभार, राशी पाटील, अमृता कानडे, त्रिशा वारके, राजमुद्रा शिंदे, अन्विता जमादार, आराध्या भिर्डे, निशा शेगणे, सायली कांबळे, सई कोल्हापुरे, हर्षु बन्ने आणि तन्वी कोल्हापुरे या विद्यार्थिनींनी आपल्या नृत्यकौशल्याची प्रभावी छाप पाडली.
तर केतकी परीट, आराध्या काटकर, रिचा बन्ने, सृष्टी माळी आणि अनन्या माळी यांनी आपल्या सुरेल आवाजाने गायनाची उत्तम साथ देत संपूर्ण सादरीकरणाला वेगळी रंगत आणली.
या यशामागे कोरिओग्राफर सुशांत जाधव यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. तसेच परशुराम कांबळे, निवास कांबळे आणि प्रवीण खोत यांनी दिलेली संगीत साथ विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे विशेष आकर्षण ठरली.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती कांबळे, केंद्रप्रमुख विजय नागरगोजे तसेच शिक्षक शंकर फुलारी, राजू शिकलगार, पद्मजा जाधव, दिलीप सुतार, राहुल कुंभार आणि धनश्री कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मोलाचे सहकार्य केले.
तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने नरवाड शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विजेत्या विद्यार्थ्यांचे, कोरिओग्राफर, संगीत साथीदार, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेतही नरवाडच्या या चिमुकल्या कलाकारांनी आपल्या कलेचा ठसा उमटवून शाळेचे, पालकांचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी त्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!




