वाई:-बाप्पांचे विसर्जन झाले; कृष्णामाईची सेवा कोण करणार ?
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-बाप्पांचे विसर्जन झाले; कृष्णामाईची सेवा कोण करणार ?

कृष्णा नदी सेवाकार्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम; विसर्जित मूर्ती बाहेर काढण्यासाठी चिमुकल्यांचीही उत्स्फूर्त साथ.
वाई, दि. २२ : गणेशोत्सवातील श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत कृष्णा नदी सेवाकार्य फाउंडेशनच्या सेवेकऱ्यांनी आज सकाळी साडेसहा वाजता कृष्णा नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबविली. काल झालेल्या घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर नदीपात्रात राहिलेल्या मूर्ती बाहेर काढण्यात आल्या. विशेष म्हणजे झोपडपट्टी परिसरातील चिमुकल्यांनीही उत्स्फूर्तपणे या सेवाकार्यात सहभागी होत शेवटपर्यंत मदत केली.
काल रात्री आरतीच्या वेळी नदीपात्रात विसर्जित मूर्ती पडून असल्याचे सेवेकऱ्यांच्या निदर्शनास आले. श्रद्धेने पूजलेल्या मूर्ती विसर्जनानंतर नदीच्या प्रदूषणाचे कारण ठरू नयेत, या भावनेतून सकाळी सेवेकरी नदीपात्रात उतरले आणि मूर्ती बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी परिसरातील चिमुकलेही मदतीसाठी पुढे आले. त्यांच्या सहभागाने पर्यावरण संवर्धनाचा संस्कार कृतीतूनच रुजतो, हे अधोरेखित झाले.
या उपक्रमातून “विसर्जन म्हणजे नदीत मूर्ती सोडून देणे नव्हे, तर पर्यावरणाची जबाबदारी स्वीकारणे” हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. गणेशोत्सवाची भक्ती आणि परंपरा जपत असतानाच नदीचे प्रदूषण रोखणे, निर्माल्य व कचरा नदीपात्रात न टाकणे आणि विसर्जनानंतरची स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
निसर्ग संवर्धनासाठी केवळ भाषणे नकोत; प्रत्यक्ष कृती हवी, हे फाउंडेशनच्या सेवेकऱ्यांनी या उपक्रमातून दाखवून दिले. धार्मिक श्रद्धा आणि पर्यावरणीय जबाबदारी यांची सांगड घातली, तर उत्सव अधिक अर्थपूर्ण होऊ शकतो.
“कृष्णामाई ही आपल्या श्रद्धेची आणि जीवनाची वाहिनी आहे; कचराकुंडी नव्हे. बाप्पांवरील भक्ती जपताना नदीचे आरोग्य जपणे हीच खरी सामाजिक जबाबदारी,” असा पर्यावरणपूरक संदेश कृष्णा नदी सेवा कार्य फाउंडेशनच्या या उपक्रमातून देण्यात आला.




