कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाईत अतिक्रमणांविरुद्ध ‘ऑपरेशन क्लीन’; फ्लेक्स-टपऱ्यांवर नगरपरिषदेचा हातोडा!

पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 वाई:-वाईत अतिक्रमणांविरुद्ध ‘ऑपरेशन क्लीन’; फ्लेक्स -टपऱ्यांवर नगरपरिषदेचा हातोडा!

रस्ते, चौक अन् बाजारपेठेतील अडथळे हटविले; बेशिस्त पार्किंगवरही कारवाईचा इशारा.

सातारा | वाई, दि. १२ :
शहरातील वाढती वाहतूक कोंडी, सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे आणि बेकायदा जाहिरात फलकांना आळा घालण्यासाठी वाई नगरपरिषदेने शुक्रवारी (दि. ११ सप्टेंबर) धडक मोहीम राबविली. नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त नियोजनातून झालेल्या या कारवाईत रस्ते, चौक आणि सार्वजनिक जागा व्यापून बसलेल्या अतिक्रमणांवर थेट कारवाई करण्यात आली. त्यामुळे शहरातील अनधिकृत व्यवसाय व जाहिरातबाजी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

किसनवीर चौक, गणपती आळी, भाजी मंडई, ब्राम्हणशाही, महागणपती मंदिर परिसर तसेच महामार्गाशी जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर नगरपरिषदेच्या पथकाने मोहीम राबविली. परवानगीविना उभारलेले फ्लेक्स, जाहिरात फलक व होर्डिंग्ज हटविण्यात आले. वाहतुकीच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या, हातगाड्या तसेच रस्त्यावर ठेवण्यात आलेले साहित्यही ताब्यात घेण्यात आले.

दुकानांच्या हद्दीबाहेर साहित्य मांडणे, रस्त्यालगत लोखंडी जाळ्या उभारणे, गटाराच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करणे, तसेच सार्वजनिक रस्त्याचा खासगी वापर करण्याचे प्रकार काही ठिकाणी आढळून आले. त्याचबरोबर रस्त्यावरच वाहने उभी करून वाहतुकीचा मार्ग अरुंद करणाऱ्यांवरही प्रशासनाने लक्ष केंद्रित केले.

कारवाईपूर्वी संबंधितांना अतिक्रमणे स्वतःहून हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शुक्रवारी सकाळी नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाच्या रिक्षावरील ध्वनिक्षेपकाद्वारे अनधिकृत फलक, हातगाड्या, फ्लेक्स व इतर साहित्य काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने प्रत्यक्ष कारवाई सुरू केली.

सार्वजनिक रस्त्यांवर कब्जा सहन केला जाणार नाही

सार्वजनिक रस्ते आणि जागा या सर्व नागरिकांच्या वापरासाठी असून, त्यांचा खासगी ताब्यासारखा वापर करता येणार नाही. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण अथवा विनापरवाना जाहिरात फलक यापुढे खपवून घेतले जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

छोट्या व्यावसायिकांसाठी हॉकर्स झोनचा पर्याय

अतिक्रमण हटविताना छोट्या व्यावसायिकांच्या उपजीविकेचा प्रश्नही विचारात घेतला जात आहे. हातगाडी, किरकोळ विक्री यांसारखे व्यवसाय करणाऱ्यांना नियमानुसार जागा उपलब्ध व्हावी, यासाठी हॉकर्स झोन उभारण्याच्या दृष्टीने नगरपरिषद नियोजन करीत असल्याचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी सांगितले. त्यामुळे कारवाईचा उद्देश कोणाची रोजीरोटी हिरावून घेणे नसून शहरातील वाहतूक व सार्वजनिक जागांचा योग्य वापर सुनिश्चित करणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बेशिस्त पार्किंगवरही कारवाईची तयारी

शहरातील वाहतूक कोंडीमध्ये बेशिस्त पार्किंगचा मोठा वाटा आहे. दुकानांसमोर, रस्त्याच्या कडेला अथवा वाहतुकीच्या मार्गात वाहने उभी केल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. नागरिकांनी उपलब्ध वाहनतळांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले असून, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवरही आगामी काळात कारवाई केली जाणार आहे.

वाईची ऐतिहासिक व पर्यटननगरी म्हणून असलेली ओळख लक्षात घेता शहरातील स्वच्छता, सौंदर्य आणि वाहतूक व्यवस्था राखण्याचे आव्हान नगरपरिषदेसमोर आहे. त्यामुळे अतिक्रमणविरोधी मोहीम एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता पुढील काळातही सातत्याने राबविण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

या कारवाईमुळे अनेक भागांतील रस्ते व सार्वजनिक जागा मोकळ्या झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अतिक्रमणांवर अधूनमधून नव्हे तर सातत्याने कारवाई व्हावी, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

कारवाईत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

या मोहिमेत कार्यालय अधीक्षक नारायण गोसावी, स्थापत्य नगर अभियंता व पथक प्रमुख कोमल साबळे, स्थापत्य अभियंता अनंत प्रभुणे, सहाय्यक पथक प्रमुख सर्वेश खाडे, मनोज बारटक्के, स्वच्छता निरीक्षक विजय मारोडा, चंद्रकांत अडसूळ, राहुल शिंदे, यश पवार, आदित्य कांबळे, प्रसाद पाटोळे, सागर लाड, कैलास लाड, रोहित गाढवे, राजेंद्र चौगुले, अमोल रोकडे, प्रमोद जाधव, रवींद्र काळोखे, आयुष लाड यांच्यासह आरोग्य, बांधकाम व वसुली विभागातील कर्मचारी सहभागी झाले.

नगराध्यक्ष अनिल सावंत : ‘वाईला अतिक्रमणमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त करू’

वाई शहराची ऐतिहासिक व पर्यटननगरी म्हणून असलेली ओळख जपण्यासाठी अतिक्रमणांवर नियंत्रण आवश्यक आहे. सार्वजनिक रस्ते किंवा जागा अडवून नागरिकांची गैरसोय करणाऱ्यांना मुभा दिली जाणार नाही. अनधिकृत फ्लेक्स, फलक आणि वाहतुकीतील अडथळ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल.

छोट्या व्यावसायिकांच्या उपजीविकेचा विचार करून त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न आहे. पार्किंगचा प्रश्न सोडविणे, वाहतूक सुरळीत करणे आणि शहराचे सौंदर्य अबाधित ठेवणे याला नगरपरिषदेचे प्राधान्य आहे. अतिक्रमणविरोधी मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून, वाईला स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button