श्रीरामपूर:-चौथीच्या चिमुकल्या शिक्षकांनी सांभाळली शाळेची धुरा!
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपूर:-चौथीच्या चिमुकल्या शिक्षकांनी सांभाळली शाळेची धुरा!

चिंचविहिरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात; विद्यार्थ्यांनी साकारल्या शिक्षकांच्या भूमिका.
श्रीरामपूर / चिंचविहिरे (RpS स्टार न्यूज प्रतिनिधी) : भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा शिक्षक दिन चिंचविहिरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उत्साहपूर्ण आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे इयत्ता चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षिकांची भूमिका साकारत प्रत्यक्ष शाळेचे कामकाज आणि अध्यापनाची जबाबदारी सांभाळली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. नानासाहेब सोमवते यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची जबाबदारी स्वीकारत पहिली ते तिसरीच्या वर्गांमध्ये जाऊन विविध विषयांचे अध्यापन केले.
चिमुकल्या शिक्षकांनी वर्गात फळ्यावर विषयाचे मुद्दे लिहिणे, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे, गृहपाठ तपासणे तसेच वर्गात शिस्त राखणे आदी जबाबदाऱ्या अत्यंत आत्मविश्वासाने पार पाडल्या. नेहमी शिक्षकांकडून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीच शिक्षकाची भूमिका साकारल्याने शाळेतील वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, शिकविण्याची पद्धत आणि वर्ग हाताळण्याची त्यांची धडपड पाहून उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
यावेळी मुख्याध्यापक श्री. नानासाहेब सोमवते यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. विद्यार्थ्यांनीही शिक्षकांचा आदर राखत शिक्षणाच्या माध्यमातून भविष्यात उत्तम नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा, असा संदेश त्यांनी दिला.
या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या नियोजनासाठी तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शाळेच्या सहकारी शिक्षिका श्रीमती स्वाती अंबादास थोरात, श्री. प्रशांत पांडुरंग जवंजाळ आणि श्रीमती शीला रतन मुख्यदल यांनी विशेष परिश्रम घेतले.
दिवसभर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका यशस्वीपणे पार पाडल्यानंतर बात-शिक्षकांनी आपल्या अनुभवांचे मनोगतातून कथन केले. शिक्षकाची भूमिका साकारताना आलेले अनुभव, विद्यार्थ्यांना शिकविताना जाणवलेला आनंद आणि शिक्षकांच्या जबाबदारीची झालेली जाणीव याबाबत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि जबाबदारीची भावना विकसित करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.




