कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा; खरीप पिकांना एकरी १ लाखांची मदत द्या!

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 श्रीरामपूर:-अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा; खरीप पिकांना एकरी १ लाखांची मदत द्या!

कृत्रिम पाऊस पाडा, पशुधनासाठी चारा छावण्या सुरू करा; रात्रीचा १० तासांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची शेतकरी संघटनेची मागणी.

श्रीरामपूर | RpS स्टार न्यूज प्रतिनिधी :
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या ३५ ते ४० दिवसांपासून पावसाने मोठा खंड दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांतील पिके अक्षरशः जळून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी एकरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष आणि महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रांताधिकारी श्रीरामपूर किरण सावंत यांच्या हस्ते देण्यात आले.
पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. पिकांना आवश्यक वेळी पाऊस न मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम जवळपास निसटला आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
कृत्रिम पावसाची मागणी
खरीप हंगामातील पिके वाचविण्याची शक्यता कमी असली तरी शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्याची कार्यवाही करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. कृत्रिम पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढण्यास तसेच भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते. त्यामुळे आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, असा दावा संघटनेने केला आहे.
पशुधनासाठी चारा छावण्या सुरू करा
दुष्काळी परिस्थितीचा फटका केवळ पिकांनाच नव्हे, तर पशुधनालाही बसत आहे. चाऱ्याची उपलब्धता कमी होत असल्याने पशुपालकांसमोर जनावरे जगविण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यात तातडीने पशु व चारा छावण्या सुरू करून पशुधन वाचवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
रात्रीचा १० तासांचा वीजपुरवठा पूर्ववत करा
पिकांना संरक्षित पाणी देऊन कसेबसे वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांनाही वीजपुरवठ्यातील कपातीचा फटका बसत आहे. १ सप्टेंबरपासून रात्रीच्या वीजपुरवठ्यात चार तासांची कपात करण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट निर्माण झाले आहे, असा आरोप संघटनेने केला आहे.
त्यामुळे महावितरणने शेतकऱ्यांसाठी रात्रीचा वीजपुरवठा पूर्वीप्रमाणे १० तासांचा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शासनाने या सर्व मागण्यांची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी; अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या निवेदनावर शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष निलेश शेंडगे, उपाध्यक्ष नवनाथ दिघे, महिला आघाडीच्या सुनिता ताई वानखडे, तसेच बाळासाहेब घोगरे, मधुकर काकड, प्रकाश जाधव, मयूर भानगडे, श्रीराम त्रिवेदी, शांताराम महांकाळे, नामदेव घोगरे, राजेंद्र शिंदे, बाबासाहेब गायकवाड, आशा महांकाळे, कोमल वानखडे, पुष्पा घोगरे, मंदा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button