आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ वाईत मराठा समाजाचा एल्गार!

पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ वाईत मराठा समाजाचा एल्गार!

शिवतीर्थावर जोरदार घोषणाबाजी; वाई-महाबळेश्वर मार्ग तासभर ठप्प, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात.

सातारा | वाई, दि. ५ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वाईत मराठा समाज आक्रमक झाला. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस सुरू असताना त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त होताच वाई तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी एकत्र येत जोरदार आंदोलन केले.
वाई येथील शिवतीर्थावर सकाळी ११ वाजता वाई तालुका मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, समन्वयक आणि मराठा सेवक मोठ्या संख्येने जमा झाले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाच्या मागणीला ठाम पाठिंबा दर्शविला. वातावरण घोषणांनी दणाणून गेले होते.
त्यानंतर आंदोलकांनी वाई-महाबळेश्वर मार्गावर रास्ता रोको केला. तब्बल तासभर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वाई पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. रास्ता रोको संपल्यानंतर काही वेळातच त्यांची सुटका करण्यात आली.
दरम्यान, आंतरवाली सराटी येथेही जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असून समर्थकांची गर्दी वाढत आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त होत असल्याने राज्यातील विविध भागांत आंदोलनाची तीव्रता वाढताना दिसत आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनामुळे आता शासन आणि प्रशासनासमोर कायदा-सुव्यवस्था तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. शासन या मागणीवर कोणती भूमिका घेते आणि आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी पुढील पाऊल काय उचलते, याकडे मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

2) वाई:-बावधनच्या महिलांचा खाण-क्रशरविरोधात रणसंग्राम!

“मुलांच्या जीवाशी खेळून रोजगार नको!”; तहसीलदारांकडे धडक, परवानगीपूर्वी ग्रामस्थांची सुनावणी घेण्याचा इशारा.

सातारा | वाई, दि. ०५:
खाण-क्रशरला परवानगी देणार असाल, तर आधी आमच्या मुलांच्या सुरक्षिततेची हमी द्या! असा संतप्त सवाल करत बावधन, कणूर, देरेवाडी, अनपटवाडी, म्हातेकऱवाडी, वाघजाईवाडी, पांढरेचीवाडी परिसरातील महिला ग्रामस्थांनी प्रस्तावित खाण व क्रशर प्रकल्पाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. महिलांनी थेट वाई तहसीलदारांकडे धडक देत निवेदन सादर केले असून, ग्रामस्थांच्या हरकतींचा विचार होईपर्यंत प्रकल्पासंदर्भातील पुढील कार्यवाही थांबवावी, अशी ठाम मागणी केली आहे.
प्रस्तावित प्रकल्पामुळे परिसरातील अरुंद रस्त्यांवर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढणार असल्याने अपघाताचा धोका डोक्यावर घेऊन गावकऱ्यांनी जगायचे कसे? असा सवाल महिलांनी उपस्थित केला. धनगरवाडा, नदीचा स्टॉप, एस.टी. स्टँड आणि शाळांच्या परिसरातून दररोज विद्यार्थी, महिला व नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
“आधीच एक कुटुंब उद्ध्वस्त झाले; आता आणखी किती बळी हवेत?”
अवजड वाहनाच्या अपघातात यापूर्वी एका कुटुंबाने आपला आधारवड गमावल्याचा दाखला देत महिलांनी प्रशासनाला धारेवर धरले. दुर्घटना घडल्यानंतर पंचनामे आणि मदतीची भाषा करण्यापेक्षा, आजच वाहतूक सुरक्षेचा गांभीर्याने विचार करा, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.
खाणकाम आणि क्रशरमुळे निर्माण होणारी धूळ, प्रदूषण, पाण्याचा प्रश्न, शेतीवरील संभाव्य परिणाम आणि पर्यावरणाची हानी याबाबतही ग्रामस्थांनी तीव्र चिंता व्यक्त केली. विशेषतः “शाळेत गेलेली आमची मुले संध्याकाळी सुखरूप घरी परततील का?” हा प्रश्न महिलांनी प्रशासनासमोर ठामपणे मांडला.
“काहींचा रोजगार; पण संपूर्ण गावाची शिक्षा का?”
काही व्यक्तींना रोजगार मिळण्याच्या नावाखाली संपूर्ण गावाची सुरक्षितता पणाला लावणे मान्य नसल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. रोजगाराला विरोध नाही; मात्र रोजगाराच्या बदल्यात गावाचा जीव, पाणी, शेती आणि पर्यावरण गहाण ठेवण्यास तीव्र विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिका महिलांनी घेतली.
प्रकल्पाला परवानगी देण्यापूर्वी सर्व ग्रामस्थांची सविस्तर सुनावणी घ्यावी, वाहतूक, धूळ, प्रदूषण, पाणी, शेती आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास करावा, अशी मागणी करण्यात आली.
तसेच शाळा, एस.टी. स्टँड, वस्ती आणि अरुंद रस्त्यांच्या सुरक्षेची स्वतंत्र पाहणी करावी. प्रकल्पाच्या सर्व शासकीय परवानग्या, पर्यावरणीय अटी आणि वाहतूक सुरक्षेचे निकष तपासल्याशिवाय कोणतीही पुढील कार्यवाही करू नये, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
“हा विरोध कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही; हा आमच्या गावाच्या सुरक्षित भविष्यासाठीचा लढा आहे. ग्रामस्थांच्या हरकती डावलून प्रकल्प पुढे रेटला तर लोकशाही मार्गाने संघर्ष अधिक तीव्र करू,” असा इशारा महिला ग्रामस्थांनी दिला.

3) भुईंज:-सहकाराची मुहूर्तमेढ ते विकासाचा महामार्ग; किसन वीर आबांचे कर्तृत्व अजोड!
कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांचा गौरव; १२१ व्या जयंतीनिमित्त भुईंज येथे अभिवादन.

सातारा | भुईंज, दि. ०५ : सातारा जिल्ह्याच्या मातीतून राज्याच्या आणि देशाच्या सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्राला दिशा देणारे अनेक दिग्गज नेतृत्व घडले. त्यामध्ये देशभक्त किसन महादेव तथा किसन वीर आबांचे योगदान अढळ आहे. सहकाराची मुहूर्तमेढ रोवून त्याला ग्रामीण विकासाची भक्कम चळवळ बनविण्याचे ऐतिहासिक कार्य आबांनी केले. त्यांच्या दूरदृष्टीने उभ्या राहिलेल्या संस्था आजही विकासाचा मार्ग दाखवत आहेत. त्यामुळे किसन वीर आबा हे सहकार क्षेत्रातील खरे ‘मेरूमणी’ होते, असे गौरवोद्गार कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी काढले.
किसान वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक देशभक्त किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन ना. मकरंद पाटील यांनी आबांच्या कार्याचा गौरव केला. स्वातंत्र्यलढ्यात यशवंतराव चव्हाण, क्रांतिसिंह नाना पाटील आणि किसन वीर आबांनी बजावलेली भूमिका अतुलनीय आहे. स्वातंत्र्यानंतर स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी आबांनी दूरदृष्टीने संस्थात्मक उभारणी केली. सहकारी साखर कारखाना, धोम धरणातून शेतीसाठी पाणी आणि जनता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षणाचा विस्तार ही त्यांच्या दूरदृष्टीची ठोस उदाहरणे असल्याचे त्यांनी सांगितले.
“आबांनी ज्या ध्येयाने संस्था उभारल्या, त्याच ध्येयाने आम्ही पुढील वाटचाल करीत आहोत. अडचणीत आलेला कारखाना शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठीच आम्ही ताब्यात घेतला. त्याचे पुनरुज्जीवन करण्यात आम्हाला यश मिळाले. गेल्या चार हंगामांत शेतकऱ्यांचा एकही रुपया थकवलेला नाही, याचा आम्हाला अभिमान आहे,” असे ना. मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले.
कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी संचालक मंडळाच्या कामकाजाची भूमिका मांडली. ना. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचा कारभार पारदर्शकपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. काही अपप्रवृत्तींकडून कारखान्याबाबत गैरसमज पसरविण्याचे प्रयत्न होत असले तरी सुज्ञ सभासद त्याला बळी पडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी गळीत हंगामात सभासदांनी आपला संपूर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात देशभक्त किसन वीर आबांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, बाळासाहेब सोळसकर, राजेंद्र तांबे, प्रतापराव पवार, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम, दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, कार्यकारी संचालक उत्तम पाटील, पंचायत समिती सभापती विक्रांत डोंगरे, मार्केट कमिटी सभापती मोहनराव जाधव यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती पदाधिकारी, कारखान्याचे संचालक, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

4) वाई:-शाहीर साबळेंच्या स्मृतींना ‘हिरवाई’ची मानवंदना!

जन्मदिनानिमित्त एकसर येथे सफरचंदांच्या रोपांची लागवड; शाहीर साबळे प्रतिष्ठानचा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम.

सातारा | वाई, दि. ०५ : महाराष्ट्राच्या लोककलेला आपल्या दमदार शाहिरीने नवी उंची मिळवून देणारे पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत एकसर येथे त्यांच्या स्मृतींना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. शाहीर साबळे प्रतिष्ठानच्या वतीने प्रस्तावित स्मारक परिसरात सफरचंदाच्या रोपांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
शाहीर साबळे यांनी आपल्या बुलंद आवाजातून महाराष्ट्राची लोकपरंपरा, संस्कृती आणि सामाजिक जाणीवा जनमानसापर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या शाहिरीतून केवळ मनोरंजन नव्हे, तर समाजप्रबोधन, राष्ट्रभक्ती आणि परिवर्तनाचा विचार प्रभावीपणे मांडला गेला. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून ‘विचारांची जपणूक आणि निसर्गाचे संवर्धन’ असा दुहेरी संदेश देण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानने केला.
या उपक्रमास सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुभाष चावरे, नामांकित आर्किटेक्ट रवी गद्रे, अभियंता प्रशांत माने, प्रतिष्ठानच्या मुख्य विश्वस्त राधाबाई साबळे, अध्यक्ष राजाराम निकम, उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, सचिव संजय साबळे, कोषाध्यक्ष श्रीधर जगताप, संचालक नारायण वरे, जनसंपर्क अधिकारी अशोक इथापे, उद्योजक बाबा जाधव, राजेंद्र भिलारे, संपत वरे, संदीप आंबवले, ईश्वर तरडे, प्रकाश साबळे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, शाहीर साबळे यांच्या जन्मभूमीत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित स्मारक परिसराला केवळ स्मृतिस्थळ न ठेवता लोककला, संस्कृती, सामाजिक उपक्रम आणि पर्यावरण संवर्धनाचे प्रेरणास्थान बनविण्याचा मानस प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
शाहीर साबळे यांच्या कर्तृत्वाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवतानाच स्मारक परिसर हिरवाईने नटविण्यासाठी भविष्यातही विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. शाहीरांच्या विचारांचा वारसा आणि निसर्ग संवर्धनाची जबाबदारी यांचा सुरेख संगम घडविणारा हा उपक्रम ठरला.

5) उंब्रज:-अमित ठाकरे यांच्यावरील गुन्हा मागे घ्या, अन्यथा राज्यभर आंदोलनाचा भडका!

सातारा | उंब्रज, दि. ०५ : पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कथित गैरप्रकारांविरोधात आवाज उठविल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राजसाहेब ठाकरे यांच्यासह मनसैनिकांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा तातडीने मागे घ्यावा, अशी आक्रमक मागणी मनविसेने केली आहे. यासंदर्भात उंब्रज पोलीस ठाण्यात निवेदन देत दोषींवर कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
पुण्यातील घटनेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यातही उमटले असून, उंब्रज पोलिसांकडे देण्यात आलेले निवेदन पुणे पोलीस आयुक्त तसेच गृह विभागाकडे तातडीने पाठवावे, अशी मागणी मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात महापुरुषांच्या प्रतिमांबाबत आवश्यक शिष्टाचार पाळला गेला नसल्याचा आरोप मनविसेने केला आहे. महापुरुषांच्या प्रतिमांच्या रांगेत अनधिकृतपणे फोटो लावल्याप्रकरणी संबंधित प्राचार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या कॅन्टीनमधून विद्यार्थ्यांना निकृष्ट व सडलेले अन्न दिले जात असल्याचा आरोप करत संबंधित कॅन्टीन ठेकेदारावरही तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
‘महापुरुषांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांचे हक्क यावर तडजोड नाही’
महापुरुषांचा सन्मान ही महाराष्ट्राच्या अस्मितेची बाब असून विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी आवाज उठविणाऱ्या अमित ठाकरे यांच्यावरच गुन्हा दाखल होणे अन्यायकारक असल्याची भूमिका मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. दोषींवर कारवाई करण्याऐवजी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवरच कारवाई होत असेल, तर हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
अमित ठाकरे यांच्यावरील गुन्हा तातडीने मागे घेऊन पुण्यातील कथित गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करावी, अन्यथा मनविसेच्या माध्यमातून राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
निवेदन देताना मनविसेचे सातारा जिल्हा सचिव अमोल सुभाष कांबळे, कराड तालुका अध्यक्ष रणजित कदम, शहर अध्यक्ष विजय वाणी यांच्यासह संतोष किरतकर्वे, समीर दुधाणे, विजय पवार, प्रवीण चव्हाण, शुभम राठोड, आशुतोष धावरे, सचिन चव्हाण तसेच मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

6) वाई डाक उपविभागाचा दणका! ‘महालॉगिन डे’ला १.५८ कोटींची विक्रमी कमाई.

सातारा | वाई, दि. ०५ :
डाक विभागाच्या विविध विमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत वाई डाक उपविभागाने ‘PLI-RPLI महालॉगिन डे’मध्ये तब्बल १ कोटी ५८ लाख रुपयांचा विमाहप्ता जमा करून उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. या यशाची दखल घेत महाराष्ट्र व गोवा डाक परिमंडळाचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांनी वाई डाक उपविभागाच्या संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन केले.
वाई येथील किसनवीर महाविद्यालयाच्या सभागृहात ३० ऑगस्ट रोजी ‘ग्रामीण डाक सेवक संवाद व गौरव समारंभा’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जायभाये म्हणाले की, भारतीय डाक विभागाकडून नागरिकांना अत्यंत वाजवी दरात डाक जीवन विमा (PLI) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) यांसारख्या उपयुक्त योजना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. नागरिकांनी या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
वाई उपविभागाने अल्पावधीत साध्य केलेल्या १.५८ कोटी रुपयांच्या विमाहप्त्याचा उल्लेख करत त्यांनी वाई डाक उपविभागाची कामगिरी अभिमानास्पद असल्याचे सांगत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा डाक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक प्रसूनना रेड्डी होते. किसनवीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, डाक उपअधीक्षक मयूरेश कोळे, सहाय्यक डाक अधीक्षक हितेश पाठक, सातारा (प.) डाक उपविभागाचे निरीक्षक धनेश यादव तसेच वाई डाक उपविभागाचे निरीक्षक ज्ञानेश्वर डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन आणि स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
१९ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या PLI-RPLI महालॉगिन डेमध्ये वाई उपविभागाने १.५८ कोटी रुपयांचा विमाहप्ता जमा केला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल निरीक्षक ज्ञानेश्वर डोंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा व्यासपीठावर विशेष गौरव करण्यात आला.
दरम्यान, महालॉगिन डे तसेच संपूर्ण आर्थिक वर्षात विविध उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामीण डाक सेवक, सब पोस्ट मास्तर्स आणि कर्मचाऱ्यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रवर डाक अधीक्षक प्रसूनना रेड्डी यांनी, “सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकसंघ टीम म्हणून केलेल्या प्रयत्नांमुळेच अल्प कालावधीत मोठे उद्दिष्ट साध्य झाले,” असे सांगत वाई डाक उपविभागाच्या कामाचे कौतुक केले.
डाक उपअधीक्षक मयूरेश कोळे यांनीही वाई टीमच्या कामगिरीचे अभिनंदन केले. पुरस्कारप्राप्त काही कर्मचाऱ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. वाई उपविभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button