सिंधुदुर्ग:-दोडामार्ग:-दोडामार्ग मधील हत्ती प्रश्न जटिल.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
1) दोडामार्ग:-दोडामार्ग मधील हत्ती प्रश्न जटिल.

दोडामार्ग:-दोडामार्ग मधील हत्ती प्रश्न अजून जटिल होत चालला आहे. हत्तींकडून नुकसानीचे सत्र सुरू असतानाच काही महिन्यांपूर्वी मोर्ले येथील एकाचा बळीही हत्तीने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हत्ती पकड मोहिमेत उत्सुकता दाखवत दोडामार्ग तालुका हत्ती मुक्त करावा अन्यथा सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शेतकरी व यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन वनविभाग व महाराष्ट्र सरकारच्या विरोधात छेडले जाईल असा इशारा स्वराज्य संस्था सरपंच सेवासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी पत्रकार परिषदे मार्फत दिला आहे.
आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की मोर्ले येथे हत्तीने एका शेतकऱ्याचा निष्पाप बळी घेतल्यानंतर परिसरातील गावातील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावेळी वनविभागाकडून ३० जून पर्यंत ओंकार नामक हत्तीला पकडण्यात यावे असा आदेश काढला होता. मात्र दिलेली डेडलाईन ही संपली आहे मात्र पकड मोहीम राबविण्यात आलेली नाही. आता डिसेंबर अखेर पर्यंत हत्ती पकड मोहीम राबविली जाईल असे सांगण्यात येत आहे मात्र प्रत्यक्षात पकड मोहीम राबवावी हीच आमच्या शेतकऱ्यांची प्राधान्याने मागणी आहे.
2) कणकवली:- कलमठ बाजारपेठ येथील शाळेच्या परिसरात एका संकुलात एकाने बिअर बार व परमिट मागणी विरोधात उपोषण.

कणकवली : कलमठ बाजारपेठ येथील शाळेच्या परिसरात एका संकुलात एकाने बिअर बार व परमिट सुरू करण्यासाठी संबंधित विभागाकडे अर्ज केला आहे. शाळेच्या परिसरात बिअर बार व परमिट रुम सुरू करण्यास परवानगी देऊ नये या मागणीसाठी राजू कोरगावकर यांनी कलमठ ग्रा.पं.कार्यालयासमोर गुरुवार सकाळपासून उपोषणाला सुरुवात केली. कोरगावकर म्हणाले, कलमठमध्ये बिअर बार व परमिट सुरू करण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. कलमठ बाजारपेठ येथे शाळा असून या परिसरात विद्यार्थ्यांचा वावर असतो. या परिसरात दारू विक्रीचे दुकान सुरू झाल्यास लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या परिसरात पुरातन विठ्ठल रुखुमाई देवस्थान आहे. विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी दररोज भाविक येत असतात. या परिसरात दारु विक्रीचे सुरू झाल्यास सामाजिक वातावरण बिघडू शकते. धार्मिक स्थळाच्या अगदी जवळ दारू विक्रीचे दुकान सुरू झाल्यास धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता आहे. तसेच बाजारपेठ परिसरात पिंपळपारवर शिवतेजा मित्रमंडळाचे विविध कार्यक्रम दरवर्षी होतात.
3)मालवण:- शहरातील बोर्डिंग ग्राऊंड येथील एका कोल्ड्रिंक हाऊसमध्ये ऑनलाईन मोबाईलवर मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई.

मालवण:- शहरातील बोर्डिंग ग्राऊंड येथील एका कोल्ड्रिंक हाऊसमध्ये ऑनलाईन मोबाईलवर मटका जुगार घेत असताना मालवण पोलिसांनी धाड टाकून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या कारवाईत संशयिताकडून तब्बल ३१ हजार ५७० किमतीचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली आहे. ही कारवाई काल रात्री आठच्या सुमारास करण्यात आली.
या कारवाईत दिनकर दाजी खोबरेकर (वय ५१, रा. धुरीवाडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोबरेकर हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मोबाईलवर ऑनलाईन मटका जुगाराचे आकडे घेत होता आणि पैसे प्रत्यक्ष व बँकेच्या स्कॅनरद्वारे स्वीकारत असतानाच पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले.




