श्रीरामपूर:-सीमेवरील जवानांसाठी गुरुकुलच्या विद्यार्थिनींचा अनोखा रक्षाबंधन उपक्रम!
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपूर:-सीमेवरील जवानांसाठी गुरुकुलच्या विद्यार्थिनींचा अनोखा रक्षाबंधन उपक्रम!

स्वहस्ते राख्या तयार करून माजी विद्यार्थी जवानांना पाठवला प्रेमाचा संदेश; ‘बाबाजींचा आशीर्वाद सदैव पाठीशी’
श्रीरामपूर / माळेवाडी | RPS स्टार न्यूज प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथील श्री संत जनार्दन स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (गुरुकुल) येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय सैन्य दलातील माजी विद्यार्थी जवानांसाठी अनोखा आणि भावनिक उपक्रम राबविला.
दि. २० ऑगस्ट रोजी गुरुकुलमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने सुंदर राख्या तयार केल्या. तसेच जवानांसाठी आकर्षक ग्रीटिंग कार्ड तयार करून त्यावर रक्षाबंधनाच्या शुभेच्छा आणि देशसेवेबद्दल कृतज्ञतेचा संदेश स्वहस्ताक्षरात लिहिला. या राख्या व शुभेच्छापत्रे पोस्टाद्वारे संबंधित जवानांपर्यंत पोहोचविण्यात आली.
विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री भागिनाथ अधाने गुरुजी यांनी भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असलेल्या गुरुकुलच्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून राख्या वेळेत संबंधित जवानांपर्यंत पोहोचतील, याचे नियोजन केले. रक्षाबंधनापूर्वीच राख्या जवानांना मिळाव्यात, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली.
‘अंगावर फक्त वर्दी नाही, हृदयात मायभूमी आहे!’
राख्यांसोबत जवानांना पाठविण्यात आलेल्या संदेशात म्हटले आहे की, “अंगावर फक्त वर्दी नाही, हृदयात मायभूमी आहे. देशासाठी त्याग करणे ही बाबाजींची शिकवण आहे. भारतीय भूमी ही संतांची, शौर्याची, त्यागाची, बलिदानाची आणि पराक्रमाची भूमी आहे. त्याग व समर्पणाची भावना आपल्या ठिकाणी आहे. आनंदी राहा, काळजी घ्या. बाबाजींचा आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी आहे.”
हा संदेश जवानांप्रती असलेला आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारा ठरला.
देशाच्या विविध सीमांवर कार्यरत माजी विद्यार्थ्यांना राख्या
गुरुकुलमध्ये शिक्षण घेतलेले व सध्या भारतीय सैन्य दलात विविध ठिकाणी सेवा बजावत असलेले शुभम मगर (उत्तर प्रदेश), राहुल चव्हाण (पंजाब), संतोष थोरात (छत्रपती संभाजीनगर), गणेश गायकवाड (श्रीनगर), योगेश मालोदे (काश्मीर), समाधान शेलार (पंजाब), अनिल गोरे (पश्चिम बंगाल), हरिप चव्हाण (धुळे), बाबू पवार (आसाम), पंढरीनाथ पायगव्हाण (उधमपूर, जम्मू-काश्मीर), अर्जुन वाघ (छत्रपती संभाजीनगर), वाल्मिक धुळे (उत्तर प्रदेश), शाम मगर (लडाख, जम्मू-काश्मीर), भीमराव मालोदे (राजस्थान), शंकर काळे (अंदमान-निकोबार, नेव्ही), निलेश माने, मोहन कापसे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांना राख्या व शुभेच्छापत्रे पाठविण्यात आली.
महिला शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन
विद्यार्थिनींना राख्या तयार करण्यासाठी गुरुकुलमधील सर्व महिला शिक्षक ताईंनी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने राख्या तयार करून या उपक्रमात सहभाग घेतला.
विशेष म्हणजे हा उपक्रम गुरुकुलच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने राबविला जात आहे. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, त्याग, समर्पण आणि राष्ट्रसेवेची भावना रुजविण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
या उपक्रमाच्या प्रसंगी प्राचार्य श्री. दिनकर ढोबळे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक तथा पर्यवेक्षक श्री. भागिनाथ अधाने गुरुजी, श्री. मुळे गुरुजी, श्री. कोटकर गुरुजी, श्री. भोसले गुरुजी, श्री. भराडे गुरुजी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
🇮🇳 सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या मनगटावर गुरुकुलच्या विद्यार्थिनींच्या प्रेमाची राखी — देशभक्तीचा अनोखा संदेश!





