वाई:- ज्ञानवृद्धीसाठी वाचन महत्त्वाचे -प्रा.डॉ.सुभाष वाघमारे
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई: दि. १५ ज्ञानवृद्धीसाठी वाचन महत्त्वाचे -प्रा. डॉ. सुभाष वाघमारे

किसन वीर महाविद्यालयात वाचन प्ररणा दिन साजरा.
पुस्तक वाचनाने जगभरातील ज्ञान मिळते, त्यामुळे विविध भाषांतील ग्रंथ वाचून, ज्ञानाची वृद्धी केली पाहिजे, व जग समजून घेतले पाहिजे; असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले. येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील मराठी, ग्रंथालय, राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना या विभागांनी संयुक्तपणे घेतलेल्या *वाचन प्रेरणा दिन* या कार्यक्रमात *वाचन संस्कृतीचा विकास* या विषयावर ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. रमेश वैद्य व उपप्राचार्य प्रा. डॉ. विनोद वीर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, ग्रंथपाल प्रा. डॉ. शिवाजी कांबळे, प्रा. डॉ. संग्राम थोरात, एन. एस. एस. चे कार्यक्रम अधिकारी डॉ. भिमाशंकर बिराजदार यांची उपस्थिती होती.
डॉ. वाघमारे म्हणाले, भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले होते, ते वाचनाचे व लेखनाचे मोठे पुरस्कर्ते होते. त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस *वाचन प्रेरणा दिन* म्हणून देशभर साजरा केला जातो. इंग्लंड हा विकसित देश आहे, तर भारत हा विकसनशील देश आहे. इंग्लंडने पुरातन वस्तूंचे मोठ्या प्रमाणात जतन केले आहे. भारताला महान संस्कृती असून, ही परंपरा समजून घेण्यासाठी प्राचीन ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. भारतातील प्रत्येक राज्याची संस्कृती समजून घेण्यासाठी त्या – त्या भाषेतील साहित्य वाचले पाहिजे. कारण भारतीय संस्कृती ही संमिश्र आहे. भाषा ही समाजाची संपत्ती आहे. लहान मुले अनुकरणातून भाषा शिकतात. मराठी भाषेला प्राचीन परंपरा असल्यामुळे तिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. डॉ. कलाम हे शास्त्रज्ञ होते; तसेच ते महान साहित्यिकही होते. त्यांनी उत्तम कवितांचे लेखन केले आहे. यावेळी डॉ. वाघमारे यांनी त्यांच्या काही कवितांचे वाचन केले व त्याचा अर्थही समजून सांगितला. चिन्हांपासून ते मोबाईल पर्यंतचा वाचनाचा प्रवास त्यांनी उलगडून सांगितला. माणूस ही निसर्गाची श्रेष्ठ निर्मिती आहे त्यामुळे मानवाने एकमेकांवर प्रेम केले पाहिजे असे त्यांनी नमूद केले.
आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. वैद्य यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व सांगून, विद्यार्थ्यांनी वाचनाने आपले ज्ञानविश्व वृद्धिंगत करावे असे सांगितले. मराठी भाषेमध्ये फार मोठे सौंदर्य आहे. महापुरुषांची चरित्रे वाचल्याने आपण कसे जगावे हे कळते व मोठे होण्यासाठी परिश्रम करणे किती गरजेचे आहे हेही समजते. प्रत्येक गोष्ट वाचनाने व परिश्रमाने साध्य करता येते व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाचन हे प्रभावी साधन आहे; असे मत त्यांनी मांडले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. फगरे म्हणाले, वाचन केल्याने नवनवीन कल्पना व विचार सुचतात. वाचन हे माणूस घडविण्याचे काम करते. त्यामुळे जे-जे हातात पडेल; ते-ते वाचले पाहिजे. वाचनाने इतिहासाचा मागोवा व भविष्याचा कानोसा घेता येतो. चांगले लेखन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात वाचन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री मिलिंद सबनीस लिखित *समग्र वंदे मातरम् -खंड १- इतिहास, प्रकाशक’ साप्ताहिक विवेक संशोधन व लेखन* या पुस्तकातील मजकुराचे वाचन उपस्थितांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. डॉ.चंद्रकांत कांबळे यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करून, त्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्रा. डॉ. शिवाजी कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. भिमाशंकर बिराजदार यांनी आभार मानले. तर राहुल तायडे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेजर डॉ. समीर पवार, डॉ. शिवाजी ताटे, डॉ. अमोल कवडे, श्रीमती धनश्री भोसले, श्री. जितेंद्र चव्हाण, कार्यालयीन प्रमुख श्री. बाळासाहेब टेमकर, श्री. विशाल महांगडे, नितीन निकम, ऋषिकेश शिंदे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, एन. सी. सी. चे छात्र, एन. एस. एस. चे स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




