शिरूर:-आनंद सोसायटीत पहाटे थरार: धाडसी लेक मानवी चोराशी भिडली; वडिलांच्या पायावर गोळी झाडून चोर फरार.
पत्रकार गणेश बोऱ्हाडे शिरूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिरूर:-आनंद सोसायटीत पहाटे थरार: धाडसी लेक मानवी चोराशी भिडली; वडिलांच्या पायावर गोळी झाडून चोर फरार.
शिरूर (प्रतिनिधी) :
शिरूरमधील उच्चभ्रू वस्ती मानल्या जाणाऱ्या आनंद सोसायटीत आज पहाटे एका बंदुकधारी चोराने धुमाकूळ घाकत थेट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरात घुसलेल्या चोराशी प्रतिकार करताना उमेश छाजेड (वय ४२) यांच्या पायावर गोळी झाडून चोराने पळ काढला. या संपूर्ण थरारात उमेश छाजेड यांच्या अवघ्या १२ वर्षांच्या कन्या मानवी छाजेड हिने दाखवलेल्या असामान्य धैर्याची आणि शौर्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
काय आहे नेमकी घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चोरटा रात्री सुमारे २:३० वाजेपासूनच आनंद सोसायटी परिसरात संशयितरीत्या फिरत होता. त्याने परिसरातील ३ ते ४ बंगल्यांची रेकी करून आत घुसण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास उमेश छाजेड हे आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन सोसायटीमध्ये फेरफटका मारून घरी परतले. घराचा दरवाजा उघडून आत जात असतानाच त्यांना घरात अज्ञात चोरटा दबा धरून बसल्याचे दिसले.
चिमुकली मानवी धावली वडिलांच्या मदतीला
उमेश छाजेड यांनी तात्काळ सावध होत चोराला पकडण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे दोघांमध्ये जोरदार झटापट सुरू झाली. वडिलांना संकटात पाहून त्यांची १२ वर्षांची मुलगी मानवी छाजेड हिने किंचितही न घाबरता प्रचंड हिंमत दाखवली. ती धावत जाऊन थेट चोरावर तुटून पडली आणि तिने वडिलांच्या साथीने चोराला रोखून धरण्याचा आक्रमक प्रयत्न केला.
एका १२ वर्षांच्या बालिकेचा हा अनपेक्षित आणि आक्रमक प्रतिकार पाहून चोर पूर्णपणे गांगरला. स्वतःची कोंडी झाल्याचे पाहून त्याने जवळील पिस्तूल बाहेर काढले आणि उमेश छाजेड यांच्या पायावर गोळी झाडली. गोळी लागल्याने छाजेड रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळताच, चोराने अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला. जखमी उमेश छाजेड यांना कुटुंबीयांनी व शेजाऱ्यांनी तातडीने उपचारासाठी हार्दे हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
चोरीच्या दुचाकीवरून आला होता आरोपी
प्राथमिक तपासात समोर आले की, हा चोरटा १३ ऑक्टोबरच्या रात्री खारे मळा परिसरातून महेश कोठारी यांच्या घरातून चोरीला गेलेल्या मोटारसायकलवरून आला होता. धक्कादायक म्हणजे, १५ ऑक्टोबर रोजी याच मोटारसायकलवरून आलेल्या आरोपीने एका महिलेवर पिस्तूल रोखून धमकावल्याची घटना घडली होती. तोच अट्टल गुन्हेगार आनंद सोसायटीत शिरल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांची कारवाई आणि सीसीटीव्ही फुटेज
सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हा संपूर्ण थरार स्पष्टपणे कैद झाला आहे. विशेष म्हणजे, पहाटे ४ वाजता पोलिसांचे गस्त पथक या भागात असतानाच ही गोळीबाराची घटना घडल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच शिरूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी (DySP) रवींद्र भोसले, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीच्या शोधमोहीम वेगाने सुरू आहे.
पोलीस प्रशासनाचे आवाहन:
“आनंद सोसायटीतील घटना अत्यंत गंभीर असून आरोपीचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.”
— रवींद्र भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP), शिरूर विभाग
”जखमी उमेश छाजेड यांची प्रकृती स्थिर असून आरोपीची ओळख पटवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शिरूर शहरात रात्रीची गस्त अधिक कडक करण्यात आली असून, आरोपीला लवकरात लवकर गजाआड केले जाईल.”
— विनोद पाटील, पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस ठाणे




