वाई:-हँडबॉलच्या मैदानात श्रेयाची दमदार भरारी! किसन वीरच्या श्रेया जाधवची महाराष्ट्र संघात निवड.
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-हँडबॉलच्या मैदानात श्रेयाची दमदार भरारी! किसन वीरच्या श्रेया जाधवची महाराष्ट्र संघात निवड.

पंजाबमध्ये रंगणाऱ्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी; राज्यस्तरीय कामगिरीच्या जोरावर मिळवला मान.
वाई दि. २३ : क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत वाईच्या किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयातील श्रेया कानिफनाथ जाधव हिने अभिमानास्पद यश संपादन केले आहे. १७ वर्षांखालील ज्युनिअर गटाच्या राष्ट्रीय शालेय हँडबॉल स्पर्धेसाठी तिची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. तिच्या या निवडीमुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
वाई येथील ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये १३ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राज्यस्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत श्रेयाने आपल्या कौशल्यपूर्ण खेळाने, चपळाईने आणि उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या खेळातील सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि प्रभावी कामगिरीच्या जोरावर निवड समितीने महाराष्ट्राच्या संघासाठी तिची निवड केली.
आता येत्या २५ ते २७ नोव्हेंबर २०२६ दरम्यान पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय हँडबॉल स्पर्धेत श्रेया महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. राज्यस्तरावरून राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारणाऱ्या श्रेयाच्या या यशामुळे वाईच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्रेया हिला महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक शिवराज तलवारे यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले. तिच्या या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले, सचिव डॉ. जयवंत चौधरी, सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य श्रावण पवार, पर्यवेक्षक डॉ. विलास खंडाईत यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे आणि मार्गदर्शक शिवराज तलवारे यांचे अभिनंदन केले. तसेच आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी श्रेयाला शुभेच्छा दिल्या.
2) वाई:-आनंदपूरकरांचा जलसंधारणासाठी एल्गार! १५ दिवसांच्या श्रमदानातून उभारला बंधारा; टँकरमुक्त गावाचा निर्धार.

महिला, पुरुष, चिमुकले अन् ज्येष्ठ नागरिकही उतरले कामाला; लोकसहभागातून डोंगरकुशीतील गावाने घालून दिला जलसंधारणाचा आदर्श.
वाई, दि. २३ : इच्छाशक्ती, एकजूट आणि लोकसहभागाच्या बळावर कोणतेही आव्हान पेलता येते, याचा प्रत्यय आनंदपूर (ता. वाई) येथील ग्रामस्थांनी घडवून दिला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या भीषण पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले असून, तब्बल १५ दिवसांच्या सामूहिक श्रमदानातून ग्रामस्थांनी बंधाऱ्याचे काम पूर्ण केले आहे. महिला, पुरुष, तरुण, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनीही हातभार लावत टँकरमुक्त गावाचा निर्धार केला आहे.
डोंगरकुशीमध्ये वसलेल्या आनंदपूर गावाला दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागतात. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ ग्रामस्थांवर येते. ही परिस्थिती बदलण्यासाठी केवळ शासकीय मदतीची वाट न पाहता गावकऱ्यांनीच जलसंधारणाचा विडा उचलला. त्यातूनच लोकसहभागातून बंधारा उभारण्याचा संकल्प करण्यात आला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
या बंधाऱ्याची लांबी १६० फूट, उंची २६ फूट आणि रुंदी ४० फूट आहे. तसेच बंधाऱ्याच्या आऊटलेटचे काम ७० फूट लांबी, ९ फूट रुंदी आणि ४.०५ फूट खोलीचे करण्यात आले आहे. गावाच्या पाणीप्रश्नावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रमदानात गावातील प्रत्येक घटकाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महिला आणि पुरुषांसोबतच लहान मुले व ज्येष्ठ नागरिकही कामाच्या ठिकाणी उतरले. सलग १५ दिवस कोणताही भेदभाव न ठेवता सर्वांनी एकदिलाने श्रमदान केले. गावाच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी दाखवलेली ही सामूहिक इच्छाशक्ती विशेष कौतुकास्पद ठरत आहे.
आनंदपूरमधील जलसंधारणाच्या कामाचा हा पहिला टप्पा असून, यापुढेही अशाच प्रकारचे उपक्रम लोकसहभागातून राबविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. गावातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करून भविष्यात आनंदपूरला टँकरमुक्त आणि दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट ग्रामस्थांनी समोर ठेवले आहे.
प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी संपूर्ण गाव एकत्र आले, तर परिवर्तन घडू शकते, हे आनंदपूरकरांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. श्रमदानातून उभा राहिलेला हा बंधारा केवळ जलसंधारणाचे काम नसून गावाच्या एकजुटीचे आणि सामूहिक इच्छाशक्तीचे प्रतीक ठरला आहे.




