क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोलापूर:-अकलूज पोलिसांची मोठी कारवाई; १७ देशी बनावटीचे पिस्टल, ४७ जिवंत काडतुसे जप्त.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सोलापूर:-अकलूज पोलिसांची मोठी कारवाई; १७ देशी बनावटीचे पिस्टल, ४७ जिवंत काडतुसे जप्त.

अवैध अग्निशस्त्रांच्या तस्करीचा पर्दाफाश! अकलूज पोलिसांचा धडाका; ६ आरोपी अटकेत, १८.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त.

सोलापूर / अकलूज : अकलूज पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व त्यांची विक्री करणाऱ्या आरोपींविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १७ देशी बनावटीचे पिस्टल, ४७ जिवंत काडतुसे आणि टाटा नेक्सॉन कार असा एकूण १८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, आणखी दोन आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकलूज पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, विकास कैलास वनाळे (वय ३१, रा. परीते, ता. माढा, जि. सोलापूर) हा देशी बनावटीची अग्निशस्त्रे विक्री करण्यासाठी टाटा नेक्सॉन कारमधून अक्कलकोट-टेंभुर्णी रोडवरील संगम परिसरातील पतंगे मटन हॉटेलजवळ येणार आहे.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यानंतर अक्कलकोट पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता पोलिसांनी कारवाई करत विकास वनाळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ पिस्टल, ४ जिवंत काडतुसे आणि टाटा नेक्सॉन कार जप्त करण्यात आली.
या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियमातील कलम ३, ५, २५ तसेच बीएनएस कलम ३(५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासात अवैध शस्त्रांचे जाळे उघड
विकास वनाळे याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने ही अग्निशस्त्रे राहुल सतीश माने (रा. मिरज, जि. सांगली) याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेतला.
तपासादरम्यान महादेव बाळासाहेब कोरके (वय ३०, रा. कोरकेवस्ती, करकंब, ता. पंढरपूर), विजय सदाशिव किरणगी (वय ३४, रा. शिवणूर, ता. अथणी, जि. बेळगाव, कर्नाटक), अनिल पंचलाल मेहता (वय ३२, रा. रांजणगाव, ता. वरला, जि. बडवानी, मध्य प्रदेश) आणि सुमित नाना लवटे (वय १९, रा. भुईटे वस्ती, सांगोला) यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
तसेच, राहुल सतीश माने यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तपासामध्ये आरोपींकडून वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवण्यात आलेली अग्निशस्त्रे व काडतुसे हस्तगत करण्यात आली. आरोपींच्या घरांची झडती तसेच त्यांच्या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत पिस्टल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
आठ आरोपींपैकी सहा अटकेत; दोघांचा शोध सुरू
या प्रकरणात पोलिसांनी एकूण आठ आरोपींची नावे निष्पन्न केली आहेत. त्यापैकी विकास कैलास वनाळे, राहुल सतीश माने, महादेव बाळासाहेब कोरके, विजय सदाशिव किरणगी, अनिल पंचलाल मेहता आणि सुमित नाना लवटे यांना अटक करण्यात आली आहे.
तर प्रदीप पांडुरंग माने (रा. चिकमहुद, ता. सांगोला) आणि शनी भारत बनसोडे (रा. अकोले खुर्द, ता. माढा) हे सध्या फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.
१८ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त
या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी १० लाख रुपये किमतीची देशी बनावटीची १७ पिस्टल (अग्निशस्त्रे), ४७ हजार रुपये किमतीची ४७ जिवंत काडतुसे आणि ८ लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची नेक्सॉन कार क्रमांक एमएच ४५ एई ७००२ असा एकूण १८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सोलापूर जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे, शस्त्रे बाळगणाऱ्या तसेच शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या व्यक्तींविरोधात प्रभावी कारवाई करण्याची मोहीम पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक पंढरपूर विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके तसेच अक्कलकोट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे करीत आहेत.
अवैध अग्निशस्त्रांची विक्री व तस्करी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यातील अवैध शस्त्रांच्या नेटवर्कवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button